संपादकीय : चेंगराचेंगरीच्‍या घटना टाळा !

१५ फेब्रुवारीच्‍या रात्री झालेल्‍या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्‍यू

नवी देहली येथील रेल्‍वेस्‍थानकावर १५ फेब्रुवारीच्‍या रात्री झालेल्‍या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्‍यू झाला असून अनेक जण घायाळ झाले आहेत. फलाट क्रमांक १४ आणि १५ यांवर झालेल्या या चेंगराचेंगरीच्या घटनेने पुन्हा एकदा रेल्वेस्थानके अन् तेथील प्रचंड गर्दी यांचे सूत्र पुढे आले आहे. फलाटावर उपस्थित हमाल आणि काही प्रत्यक्षद़र्शी यांच्यानुसार ‘प्रयागराजला जाणारी विशेष रेल्वेगाडी आधी एका फलाटावर येणार’, असे सांगण्यात येत होते; मात्र नंतर ती वेगळ्या फलाटावर आल्यामुळे प्रवाशांची पळापळ झाली, त्यामध्ये चेंगराचेंगरी झाल्याचे समजते. सध्या महाकुंभाला जाण्यासाठी हिंदु भाविकांमध्ये पुष्‍कळ उत्‍सुकता आहे. त्यामुळे प्रयागराजसह बिहार, उत्तरप्रदेशातील स्थानके आणि आता नवी देहली येथे फलाटांवर गर्दी ओसंडून वहात आहे. गर्दीचे नियंत्रण करणे कोणत्याही प्रशासनाला सध्या शक्य होत नाही, असे लक्षात येते. मुंबई आणि देहली येथील महत्त्वाच्या स्थानकांवर फलाटांवरील गर्दी एरव्हीही असते. या वेळी देहलीच्या रेल्वेस्थानकावरील गर्‍दी मात्र अभूतपूर्व अशी होती. ‘एवढी गर्दी कधीही पाहिली नव्हती’, असे हमाल आणि स्थानकावरील दुकानदार यांनी सांगितले आहे. अशा वेळी इच्छित रेल्वेगाडीचा फलाट पालटल्यास केवढी गडबड होईल, याचे काही अनुमान लावू शकत नाही.

हाती आलेल्‍या अन्‍य एका माहितीनुसार १ घंट्यात १ सहस्र ५०० सामान्‍य वर्गाची तिकिटे वाटण्‍यात येत होती. प्रत्‍यक्षात सामान्‍य वर्गात केवळ ४०० प्रवासी प्रवास करू शकतील, एवढीच डब्‍यांची क्षमता होती. ही तिकीटे भरमसाठ वाटल्‍यामुळे फलाटावर प्रवाशांची गर्दी उसळली. अशाही प्रकारच्‍या चुका झालेल्‍या आहेत. कुंभनगरीत प्रयागराज येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर कुंभमेळ्याच्या संदर्भातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत मुंबई येथे वर्ष २०१७ मध्ये एलफिन्स्‍टनरोड स्थानकावर मुसळधार पावसाच्या वेळी अरुंद रेल्वे पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत २३ हून अधिक प्रवासी मृत्यूमुखी पडले होते, वर्ष २०२४ मध्ये दिवाळीच्या कालावधीत वांद्रे टर्मिनस येथून गोरखपूर येथे जाणार्‍या रेल्वेमध्ये चढतांना झालेल्या चेंगराचेंगरीत काही प्रवासी गंभीररित्या घायाळ झाले होते.

गर्दीवर नियंत्रण का नाही ?

काही अपवादात्‍मक परिस्‍थितीत असे अपघात घडून प्रवाशांचा मृत्‍यू होत आहे, असे असले, तरीही फलाटावरील प्रवाशांच्‍या गर्दीवर नियंत्रण का रहात नाही ? सध्‍याच्‍या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात एका फलाटावर अथवा स्थानकावर गर्दी नियंत्रित करण्यासाठी, लोकांची संख्या नियंत्रित करण्यासाठी काही तंत्रज्ञानाचा उपयोग करता येत नाही का ? एका फलाटावर अथवा स्थानकावर असलेल्या प्रवाशांची संख्या फिरती असली, तरी ज्या वेळी रेल्वेगाड्या विलंबाने धावतात, रेल्वेगाड्यांचा अपघात होतो, तेव्हा फलाट अथवा स्थानक येथे अधिकाधिक किती लोक विशिष्ट घंटे अथवा कालावधीसाठी राहू शकतात ? याचे ठोकताळे बांधलेले असल्यास त्यापुढील लोकांना फलाटावर प्रवेश वर्ज्य केला जाऊ शकत नाही का ? त्याच वेळी तिकीटघरांतून तिकीट विक्री बंद करणे, प्रवाशांना गर्दी न करता स्थानक सोडण्यासाठी ध्वनीक्षेपकावरून सूचना देणे, वयोवृद्ध, महिला, मुले यांना स्वयंसेवकांच्या करवी सुरक्षित ठिकाणी नेणे अशा अनेक उपाययोजना करता येऊ शकतात. या उपाययोजना राबवून प्रवाशांना संभाव्य धोक्यापासून वाचवता येणे शक्य आहे.

भारतातील एकूण लोकसंख्‍येचा विचार करता रेल्‍वेतून प्रवास करणार्‍यांची संख्‍या सर्वाधिक आहे. अल्‍प खर्चात, विविध वर्गांतून प्रवास करण्‍याची सुविधा, सुरक्षित प्रवास यांमुळे रेल्‍वेच्‍या प्रवासाला प्राधान्‍य दिले जाते. रेल्‍वेच्‍या डब्‍यामध्‍ये प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे थांबवण्यासाठी साखळी ओढणे, आपत्कालीन परिस्थितीत डब्यातून बाहेर उडी मारण्यासाठी आपत्कालीन खिडकी, काही डब्यांमध्ये सीसीटीव्ही छायाचित्रक इत्यादी सुरक्षेच्या उपाययोजना असतात. गर्दी एकदा प्रमाणाबाहेर झाली की, या गर्दीला नियंत्रित करणे हाताबाहेर जाते. गर्दीच्या वेळी ‘जमावाची मानसिकता’ तत्त्व कार्यरत होते. जमावाने शांतपणे जायचे ठरवले, तर तो शांतपणे पुढे जातो, घाई-गडबड करायची ठरवली, तर घाई-गडबड होऊन, धक्काबुक्की होऊन अपघात होण्याची शक्यता असते. आता शांतपणे जाणारा जमाव काही अफवा पसरली, तर मात्र हा शांत जमावही वाट मिळेल तेथे सैरावैरा धावू लागतो. जमावात स्त्रिया, मुली, लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती अशा सर्वांचाच समावेश असल्याने काही सूचना दिल्या, तर त्या समजून त्यानुसार कृती करणेही कठीण होऊन बसते. त्यात चुकीच्या सूचना गेल्यास आणखी गडबड होऊ शकते. त्यामुळे गर्दीचे सातत्याने व्‍यवस्थापन करणे, नियंत्रण करणे अत्यावश्यक सूत्‍र बनते. नवी देहली येथील रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीची काही कारणे पुढे आली असली, तरी सखोल कारणे पुढे येऊन याविषयी परिणामकारक उपाययोजना करणे आवश्यक आहे. महाकुंभासारख्या भव्य-द़िव्य आयोजनात सहभागी होणार्‍या भाविकांची संख्या पहाता यापुढे गर्दी नियंत्रण न झाल्यास असे अपघात पुन:पुन्हा घडू शकतात.

मेट्रोस्‍थानकावर धर्मांधांची दादागिरी !

नवी देहलीतील आणखी एका घटनेत तेथील मेट्रो स्‍थानकावरील काही व्हिडिओ आणि छायाचित्रे सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित होत आहेत. देहलीतील मेट्रो स्थानके अथवा अन्य कुठल्याही ठिकाणची मेट्रो स्थानके असोत, तेथे तिकीट काढल्याविना फलाटावर प्रवेश करता येत नाही. मुसलमानांच्या ‘शब-ए-बारात’च्या सणाच्या द़िवशी रात्री नमाजानंतर शेकडो धर्मांध तरुण टवाळक्या करत, काहीतरी घोषणा देत या स्थानकावर तिकीट न काढता शिरले आणि हुल्लडबाजी करू लागले. त्या वेळी त्यांना तेथून हुसकावून लावण्यास कुणी पोलीस उपस्थित नव्हता. याविषयी मेट्रो प्रशासनाने मात्र त्या रात्री पुष्कळ गर्दी वाढल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगून उत्तरदायित्व झटकले आहे. भारतात धर्मांधांची वाढती संख्या आणि त्यांचा उद्दामपणा पहाता देहलीतील मेट्रो स्थानकावर घडलेला प्रकार केव्हाही अन्य स्थानके, सार्वजनिक ठिकाणे येथे घडू शकतो. धर्मांध अधिक संख्येत असले, तर ते तोडफोड करतात, महिलांची छेड काढतात, यातून महिला पोलीसही सुटत नाहीत. प्रसंगी पोलिसांना मारहाण करतात, त्यांची शस्त्रास्‍त्रे सहज खेचून घेऊन पळवतात, लूटमार करतात, प्रसंगी आग लावतात, धमक्या देतात अशा प्रकारे दहशत निर्माण करतात. पोलीस घटना घडत असतांना आणि नंतरही काही करणार नाहीत, याची त्यांना निश्चिती असते. या घटनेमुळे भारतातील धर्मांधबहुल भागांची, तेथील नागरिकांची सुरक्षा धोक्यात असल्‍याचे लक्‍षात येते. एकूणच भारताचा भीषण भविष्यकाळ लक्‍षात घेता हिंदुत्वनिष्ठांनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे.

रेल्‍वेस्‍थानकांवर होणार्‍या चेंगराचेंगरीच्‍या घटना टाळण्‍यासाठी प्रशासन कठोर उपाययोजना केव्‍हा करणार ?