‘वर्ष १९८९ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला कविता करण्यास प्रोत्साहन दिले. तेव्हापासून ‘मी त्यांच्या कृपेमुळेच लहान-सहान कविता आणि लेख लिहू शकत आहे’, याची मला पूर्ण जाणीव आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ‘हे मजचिस्तव जाहले । परी म्या नाही केले ।’ म्हणजे, ‘हे माझ्यामुळे झाले; पण मी नाही केले’, असे परात्पर गुरु डॉक्टरांचे वर्तन असते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य आणि त्यांची कृपा यांमुळे संपूर्ण जगभरात सनातनच्या कार्याचा वटवृक्ष दिवसेंदिवस वाढत आहे. सनातनच्या या वटवृक्षाचा मी एक लहानसा घटक आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे मला मनुष्यजन्म मिळाला आणि मी साधना करू शकलो. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य आणि संकल्पशक्ती यांमुळे आधी सुचलेल्या कवितेमध्ये पुढील कडवी सुचणे

८.६.१९९१ या दिवशी विरंगुळा म्हणून मला कविता करावीशी वाटली. कुलदेवतेच्या नामस्मरणाविषयी कवितेची २ कडवी लिहून मी ती परात्पर गुरु डॉक्टरांंना दाखवली. ते म्हणाले, ‘‘कविता आणखी थोडी वाढवा.’’ त्या वेळी ‘आरंभीपासूनच मला मराठी भाषा आणि इतिहास आवडत नव्हता. मला कविता, गाणे, काव्य किंवा संगीत यांमध्येही रुची नाही. त्यामुळे ‘आणखी ओळी कशा वाढवायच्या ?’, असा मला प्रश्न पडला. परात्पर गुरु डॉक्टरांचे चैतन्य आणि संकल्पशक्ती यांमुळे मी त्या कवितेच्या पुढे आणखी ३ कडवी वाढवू शकलो. त्यानंतर त्यांनी मला ‘‘नवीन कडवी पुष्कळ छान आहेत’’, असे म्हटले. त्या वेळी मी केलेली कविता पुढे दिली आहे.
बोलून बोलून दमणार्याने ।
बोलता बोलता एक दिवस ।
ऐकणार्याचे मौन घ्यावे ॥ १ ॥
ऐकून ऐकून दमणार्याने ।
ऐकता ऐकता एक दिवस ।
कुलदेवतेचे नाम घ्यावे ॥ २ ॥
चुका करून दमणार्याने ।
शिकता शिकता एक दिवस ।
अध्यात्माचे धडे घ्यावेत ॥ ३ ॥
जगून जगून दमणार्याने ।
जगता जगता एक दिवस ।
समाधीचे अमरत्व घ्यावे ॥ ४ ॥
मरून मरून मरणार्याने ।
मरता-मरता एक दिवस ।
नामस्मरण करावे ॥ ५ ॥
२. वर्ष १९९१ मध्ये स्फुरलेले काव्य अर्धवट असल्याचे लक्षात येऊन वर्तमान स्थितीत त्यापुढील ओळी स्फुरणे
‘वर्ष १९९१ मध्ये केलेली कविता नामस्मरणापर्यंतच झालेली आहे’, हे १८.५.२०२० या दिवशी माझ्या लक्षात आले. त्यानंतर गुरुदेवांनी मला ‘गुरुकृपायोगानुसार साधने’मधील पुढील ७ टप्पे शिकवले. ते शब्दबद्ध करून पुढे दिले आहेत.
कुलदेवतेचे नाम जपणार्याने ।
नाम जपता जपता एक दिवस ।
सत्संगाला जावे ॥ ६ ॥
सत्संगाला सतत जाणार्याने ।
सत्संग ऐकता ऐकता एक दिवस ।
स्वतःचे स्वभावदोष निर्मूलन करावे ॥ ७ ॥
स्वभावदोष निर्मूलन करणार्याने ।
स्वभावदोष घालवता घालवता एक दिवस ।
अहंचेही निर्मूलन करावे ॥ ८ ॥
अहं निर्मूलन प्रक्रिया करणार्यानेे ।
प्रक्रिया करता करता एक दिवस ।
सत्सेवेचे व्रत घ्यावे ॥ ९ ॥
सत्सेवा करणार्याने ।
सेवा करता करता एक दिवस ।
सत्साठी तन-मन-धन त्यागावे ॥ १० ॥
त्यागातील आनंद घेणार्याने ।
त्याग करता करता एक दिवस ।
जगाला निरपेक्ष प्रेम अर्पावे ॥ ११ ॥
सर्वांवर प्रेम (प्रीती) करणार्याने ।
प्रेम करता करता एक दिवस ।
भक्तीभाव वाढवून देवाला अनुभवावे ॥ १२ ॥
गुरुकृपायोगांतर्गत नेमाने करावे अष्टांगसाधन ।
गुरुचरणी कृतज्ञताभावाने जावे शरण ।
गुरुकृपेने मोक्षप्राप्तीचा येईल तो क्षण ॥ १३ ॥
३. करावी तळमळीने गुरुकृपायोगानुसार सुलभ साधना !
संत कबीरदास यांनी म्हटले आहे की,
यह तन विष की बेलरी, गुरु अमृत की खान ।
शीश दियो जो गुरु मिले, तो भी सस्ता जान ॥
अर्थ : मानवी शरीर विषाने (स्वभावदोष आणि अहं यांनी) व्यापलेल्या झाडासमान आहे आणि ते विष केवळ गुरुरूपी अमृतानेच स्वच्छ होऊ शकते. हे गुरुरूपी अमृत मिळवण्यासाठी आपले जीवन त्यागावे लागले, तरी तो व्यवहार स्वस्त आणि अधिक लाभदायक आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांंनी प्रथमच ‘गुरुकृपायोग’ हा गुरुप्राप्तीचा मार्ग सांगितला. सध्याच्या कलियुगात हा अत्यंत सोपा आणि सहज साध्य होणारा योगमार्ग आहे; म्हणूनच गुरुकृपाप्रसादे सनातनचा साधक म्हणेल,
करा तळमळीने गुरुकृपायोगाची सुलभ साधना ।
सत्वर होईल तुम्हा गुरुप्राप्ती अन् गुरुकृपा ॥ १ ॥
मग गुरुच वहातील जीवनाचा भार सारा ।
वाहील तुमच्या जीवनी अखंड आनंदाचा झरा ॥ २ ॥
कृतज्ञता
अशा रितीने परात्पर गुरु डॉक्टरांनी गुरुकृपायोगानुसार साधना सांगून ती माझ्याकडून करून घेतली आणि माझी प्रगतीही करून घेतली. माझ्यासारख्या सर्वसाधारण, अज्ञानी आणि रुक्ष जिवाला साधनेसह कविता करण्याचे वेड लावून त्यांना अपेक्षित अशी कविता माझ्याकडून करून घेतली. हे करतांना त्यांनी मला घडवले आणि जीवनात आनंद अन् शांती दिली. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो !’
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित झालेल्या विशेषांकात प्रसिद्ध झालेली कविता परात्पर गुरु डॉक्टरांना पुष्कळ आवडणे आणि त्यांनी खाऊ पाठवून भावानंद देणे
‘१३.५.२०२० (वैशाख कृष्णपक्ष सप्तमी) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व साधकांसाठी ‘ऑनलाईन’ भावसत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांंकामध्ये माझी ‘तुज परम पूज्य म्हणू कि भगवंत रे । परम पूज्य असती एक भगवंत रे ॥’ ही कविता प्रकाशित झाली होती. ती वाचून मला परात्पर गुरु डॉक्टरांचा निरोप आला, ‘‘कविता पुष्कळ आवडली.’’ त्यासाठी त्यांनी मला भरपूर खाऊसुद्धा पाठवला. कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगात सर्वत्र हाहाःकार चालू असतांना माझ्यासारख्या सर्वसाधारण साधकाला त्यांनी भावानंदात डुंबवून टाकले.’
– (पू.) शिवाजी वटकर , सनातन आश्रम, देवद, पनवेल.