प्रयागराज, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – कुंभमेळ्यात सेक्टर १९ मध्ये मोरी मार्गावरील अयोध्या धाम येथील ‘लव-कुश आश्रमा’ला आग लागून या आश्रमाचे पूर्ण शिबीर आगीत भस्मसात् झाले. १५ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५.४५ वाजता ही आग लागली. आग ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागल्याची माहिती आश्रमाच्या प्रतिनिधींनी ‘सनातन प्रभात’ला दिली. आग लागल्यावर १५ मिनिटांत अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी पोचली. आग नियंत्रित करण्यात यश आले असून आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
१. कुंभक्षेत्रातून निघण्यासाठी सायंकाळी आश्रमातील साहित्य ट्रकमध्ये ठेवण्यात येत होते. साहित्याची आवराआवर चालू असतांना विद्युत्चे काम करणारे काही कर्मचारी आश्रमाची वीजवाहिनी काढण्याचे काम करत होते. त्या वेळी शॉर्ट सर्किट होऊन आग लागली.
२. गवताच्या तंबूमुळे आग भडकली. आगीचा भडका इतका मोठा होता की, आश्रमाच्या वर जवळजवळ १५० फूट उंच असलेल्या रेल्वेच्या पुलापर्यंत आगीच्या ज्वाळा पोचल्या.
३. कुंभक्षेत्रातून जाणारी भारतीय रेल्वे आणि उत्तरप्रदेशाची स्थानिक रेल्वे यांचे २ स्वतंत्र रेल्वेपूल आहेत, तसेच रस्ता वाहतुकीसाठी शास्त्री पूल आहे. या तीनही पुलांच्या खाली कुंभमेळ्यातील शिबिरे वसवण्यात आली आहेत.
४. लव-कुश आश्रम भारतील रेल्वे पुलाच्या खाली आहे. सुदैवाने आग लागलेल्या वेळेत कोणतीही रेल्वे तेथून गेली नाही. अन्यथा आगीच्या ज्वाळांमुळे रेल्वे आणि त्यामधील प्रवासी यांना आगीचा फटका बसू शकला असता.
व्हिडिओ बनवण्यासाठी नागरिकांची गर्दी !
शिबिराला आग लागल्यावर त्याचे चित्रीकरण आणि छायाचित्रे काढण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे त्यांना पांगवण्यात पोलिसांचा वेळ गेला. पोलिसांनी हटकूनही अनेक नागरिक छायाचित्रे आणि चित्रीकरण करण्यासाठी आगीच्या ठिकाणी गर्दी करत होते. (समाजभान नसलेला समाज ! – संपादक)