नामजप करतांना सूक्ष्मातून प्रयागराज येथे गेल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. सकाळी नामजप करण्यासाठी आरंभ केल्यावर ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप आपोआप चालू होणे आणि ‘मी प्रयागराज येथे गेले आहे’, असे साधिकेला सूक्ष्मातून दिसणे

श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी

‘१७.१.२०२५ या दिवशी मी सकाळी नामजप करण्यासाठी आरंभ केला. तेव्हा माझा ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप आपोआप होऊ लागला. त्या वेळी ‘मी प्रयागराज येथे गेले आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले. मी गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर स्नान केले आणि जवळच असलेल्या पायरीवर बसले.

२. नद्यांच्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी शिवाची मूर्ती दिसणे आणि शिवाच्या एका हातात त्रिशूळ असून मूर्ती भव्य दिसणे

काही क्षणांत मला गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी शिवाची मूर्ती दिसू लागली. ती मूर्ती पाण्यावर अधांतरी असून स्थिर होती. दक्षिणामूर्ती शिवाप्रमाणे एक पाय खाली सोडलेला आणि एका पायाची मांडी घातलेली असा तो शिव होता. त्याच्या एका हातात त्रिशूळ होते. ती मूर्ती एवढी भव्य आणि देखणी होती की, मी तिच्याकडे पहातच राहिले.

३. शिवाच्या मूर्तीजवळ दिवंगत आजोबा दिसणे आणि आजोबांनी साधिकेला आशीर्वाद देऊन तिथून निघून जाणे

मला शिवाच्या चरणांजवळ २ कावळे दिसू लागले. ते काहीतरी खात होते. त्या वेळी तेथे मला माझे दिवंगत आजोबाही (माझ्या वडिलांचे वडील लक्ष्मण वामन दर्भे) दिसले. आजोबांना पाहून माझ्या मनात विचार आला, ‘एवढ्या वर्षांनंतर मला आज आजोबा का दिसत आहेत ?’ मी तेथे असलेल्या एका साधिकेला आजोबांविषयी सांगायला लागले. तेव्हा मला माझ्या आजोबांनी आशीर्वाद दिला आणि ते तिथून निघून गेले.

४. शिवाच्या उजव्या बाजूला प.पू. डॉक्टर, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या तिन्ही गुरूंचे दर्शन होणे आणि त्यांच्या कृपेमुळे त्रिवेणी संगमात स्नान करता येणे अन् मन हलके होऊन शांत होणे

शिवासमोर पुष्कळ मोठ्या आकारातील शिवपिंडही दिसत होती. मी शिवपिंडीवर बेलपत्र आणि एक पांढरे फूल वाहिले. शिवाच्या उजव्या बाजूला प.पू. डॉक्टर, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हेही होते. त्यानंतर तिन्ही गुरूंनी वाकून नदीच्या पाण्यात पांढरी फुले अर्पण केली. मी तिन्ही गुरूंना नमस्कार करून प्रार्थना केली. ‘तुमच्या कृपेनेच मला या त्रिवेणी संगमात स्नान करता आले आणि तुमचे दर्शन झाले.’ तेव्हा शिवाने तेथील कलशातील दूध माझ्या डोक्यावर ओतले आणि त्यानंतर मी पुन्हा नदीत स्नान केले. तेव्हाही माझा ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप चालू होता. मला माझ्या ‘तिन्ही गुरूंचे दर्शन झाले’, याबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. माझी भावजागृती होत होती. त्या वेळी माझे मन हलके होऊन शांत झाले.

‘प.पू. डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कृपेमुळेच मला त्रिवेणी संगमात स्नान करण्याची संधी मिळाली’, याबद्दल त्यांच्या आणि गंगा, यमुना, सरस्वती यांच्या प्रती मी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७५ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा. (३१.१.२०२५)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक