रायगड जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ साहाय्यक लिपिकाकडून १ कोटी १९ लाख रुपयांचा घोटाळा !

घोटाळा ४ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता !

अलिबाग – जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा अलीबाग उपविभागातील वरिष्ठ साहाय्यक लिपीक नाना कोरडे याने १ कोटी १९ लाख रुपयांचा घोटाळा केला. वेगवेगळ्या कर्मचार्‍यांच्या नावावर हे पैसे काढल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा घोटाळा ४ कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. एका साधारण कर्मचार्‍याच्या खात्यावर सरकारी खात्यातून १० लाखांपेक्षा जास्त रक्कम वळवली गेल्याचे लक्षात आले. तेव्हा हा प्रकार उघड झाला.

वेतनाच्या व्यतिरिक्त कर्मचार्‍यांना देण्यात येणारी रक्कम परस्पर रायगड जिल्हा बँकेतील स्वतःच्या खात्यात कोरडे याने वळती केली. तसेच काही रक्कम पत्नी सोनाली कोरडे हिच्या खात्यात वळती केली. (या प्रकरणी पत्नीची चौकशी व्हायला हवी ! – संपादक) घोटाळा समोर आल्यावर नाना कोरडे याने ६८ लाख रुपये जिल्हा परिषदेला परत केले.

संपादकीय भूमिका

लिपिकाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणे यावरून भ्रष्ट वृत्ती किती प्रमाणात मुरलेली आहे, हे लक्षात येते ! अशांवर कठोर कारवाई करून बडतर्फ करायला हवे ! फसवणूक केल्याप्रकरणीची सर्व रक्कम सव्याज वसूल करायला हवी !