शिवी देणार्या मित्राची हत्या !
मुंबई – शिवी दिल्याचा राग आल्यामुळे एका मित्राने दुसर्या मित्राची हत्या केली. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सुजित सिंग (३९ वर्षे) याची हत्या सुनील कोकाटे (५२ वर्षे) यांनी चाकूच्या साहाय्याने केली. सुजितने शिवी दिली होती. सुनीलच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कचर्याला भीषण आग
कांजूरमार्ग – येथील डंपिंग ग्राऊंडमधील (कचरा टाकला जातो ती जागा) कचर्याला दुपारी भीषण आग लागली. धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अपघातग्रस्त वाहनात ३ किलो अफू !
नागपूर – येथील सावनेर तालुक्यात वाहनाचा अपघात झाला. अपघातग्रस्त वाहनाची पहाणी केल्यावर त्यात ३ किलो अफू सापडली. या अपघातात एक पुरुष मृत झाला आहे.
तरुणाकडून ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार !
अमरावती – येथे ४ वर्षांच्या मुलीवर राजेश भाऊराव मरकाम (वय २३ वर्षे) याने बलात्कार केला. राजेश दोन दिवसांपूर्वीच कारागृहात शिक्षा भोगून बाहेर आला होता. (अशा वासनांधांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा द्यायला हवी ! – संपादक) पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली आहे. त्याने मुलीला जंगलात पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
समय रैना याला दुसर्यांदा समन्स !
मुंबई – यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याने पालकांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने यूट्यूबर समय रैना आणि रणवीर अलाहबादियासह ३० जणांविरोधात गुन्हा नोंदवला होता. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी समय रैनाला दुसर्यांदा समन्स बजावले. तो परदेशात असल्यामुळे त्याच्या अधिवक्त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाकडे चौकशीला उपस्थित रहाण्यासाठी अवधी मागितला होता; पण पोलिसांनी दुसर्यांदा समन्स बजावल्याने त्याला १७ फेब्रुवारीला उपस्थित रहावे लागेल.
‘स्वीपिंग’ वाहनाद्वारे रस्त्यांची स्वच्छता !
सातारा, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – स्वच्छतेचे काम अधिक गतिमान करण्यासाठी सातारा नगरपालिकेने नुकतेच नवीन ‘स्वीपिंग’ (स्वच्छता करणारे) वाहन खरेदी केले आहे. याद्वारे शहरातील रस्ते स्वच्छ करण्यात येत आहेत. यामुळे शहरातील रस्ते धूळमुक्त होऊन धूलिकणांचे प्रमाणही अल्प होत आहे. यंत्राने शहर स्वच्छ करणारी सातारा जिल्ह्यातील एकमेव नगरपालिका आहे.