राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला दिली सोडचिठ्ठी

मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार राजन साळवी यांनी १३ फेब्रुवारीला पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. ठाणे येथील आनंद मठ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी असंख्य पदाधिकार्‍यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या वेळी शिवसेनेचे आमदार किरण सामंत, मंत्री उदय सामंत यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांपासून माजी आमदार साळवी यांच्याविषयी विविध चर्चा चालू होत्या. त्यातच साळवी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेते पदाचे त्यागपत्र दिले आणि शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे साळवी यांच्याविषयी चालू असलेल्या चर्चांना आता
पूर्णविराम मिळाला आहे.

‘एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते. मागच्या काळात त्यांच्यासमवेत मी जाऊ शकलो नाही; पण जाण्यासाठी निमित्त लागते. ते निमित्त मिळाले आणि मी या ठिकाणी आलो’, असे साळवी यांनी या वेळी सांगितले. राजापूर विधानसभा मतदारसंघातून साळवी ३ वेळा आमदार झाले होते. भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ झाला होता.