‘मला वाईट शक्तीचा तीव्र त्रास आहे. वाईट शक्ती स्वप्नात येऊन मला घाबरवतात. त्यामुळे मला ‘निरुत्साही वाटणे, अंग दुखणे, हाडे दुखणे, सकाळी लवकर उठता न येणे आणि थकवा असणे’, अशा प्रकारचे त्रास होतात. त्यामुळे माझ्या सेवेत अडथळे येऊन मी साधना करू शकत नाही.
११ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘वाईट शक्तीमुळे साधिकेला झालेले त्रास आणि देवता स्वप्नात आल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती’ पाहिल्या. आता या भागात आपण ‘संत आणि देवता स्वप्नात आल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती’ पाहूया.
(भाग ३)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/883567.html

१४. ९.२.२०१६
१४ आ. स्वप्नात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ खोलीचा दरवाजा उघडून आत येणे आणि त्यांनी खोलीतच सेवा करणे : स्वप्नात मला मी झोपलेल्या खोलीच्या बाहेर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दिसल्या. त्या खोलीचा दरवाजा उघडून खोलीत त्यांचा भ्रमणसंगणक घेऊन आल्या आणि म्हणाल्या, ‘आज मी इथेच खोलीत बसून सेवा करणार आहे.’ मी जेथे झोपले होते, त्या खोलीच्या एका भागात बसून त्या सेवा करू लागल्या. (त्या वेळी आश्रमात महर्षींनी सांगितल्याप्रमाणे यज्ञ चालू होता आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ त्या यज्ञाला उपस्थित होत्या.)

१४ इ. स्वप्नात विश्वकर्मादेवाचे दर्शन होणे आणि त्या दिवशी ‘विश्वकर्मा जयंती’ असल्याचे लक्षात येणे : नंतर मी जागी झाले आणि काही वेळाने पुन्हा झोपले. तेव्हा मला पुन्हा एक स्वप्न पडले. त्या वेळी स्वप्नात मला एका देवाचा मुकूट आणि त्याचा हनुवटीपर्यंतचा चेहरा दिसला. त्या देवाच्या मुकुटाची रचना पायर्यांप्रमाणे होती. त्या वेळी ‘तो देव म्हणजे विश्वकर्मा आहे’, असे मला वाटले. त्या दिवशी ‘विश्वकर्मा जयंती’ होती.
१५. १०.२.२०१६
१५ अ. स्वप्नात शेवंतीच्या पिवळ्या फुलांनी भरलेली थाळी दिसणे आणि प्रत्यक्षातही आश्रमातील यज्ञस्थळी एका साधिकेच्या हातांत तशीच थाळी असणे : दुपारी पडलेल्या स्वप्नात मला शेवंतीच्या पिवळ्या फुलांनी भरलेली थाळी काही क्षण दिसली आणि नंतर ती अदृश्य झाली. दुसर्या दिवशी आश्रमात महर्षीनी सांगितल्याप्रमाणे यज्ञ होता. त्या वेळी मी यज्ञासाठी गेले होते. तेथे एका साधिकेकडे मला पिवळ्या फुलांची थाळी होती. ती थाळी मला स्वप्नात दिसलेल्या थाळीसारखी होती. साधिका थाळी घेऊन माझ्याकडे आली आणि आणि तिने मला त्या थाळीतील एक फूल प्रसाद म्हणून दिले.’
१६. २०.९.२०१९
१६ अ. बुबुळाच्या आकाराचा नारंगी रंगाचा गोळा उजव्या डोळ्याच्या आत गेल्याचे जाणवणे आणि त्यानंतर त्या डोळ्याच्या ठिकाणी त्रास न जाणवणे : या दिवशी मला त्रास होत होता. खोली झाडत असतांना मी खोलीतील बेसिनच्या खाली बसले होते. त्या वेळी मला माझ्या उजव्या डोळ्याच्या समोर १ फूट अंतरावर डोळ्यातील बुबुळाएवढा नारंगी रंगाचा एक गोळा दिसला. नंतर तो माझ्या उजव्या डोळ्याच्या दिशेने आला आणि माझ्या डोळ्याच्या आत गेला. काही वेळाने मी माझा चेहरा आरशात पाहिला. त्या वेळी माझ्या उजव्या डोळ्याच्या ठिकाणी मला त्रास जाणवत नव्हता. माझ्या डाव्या डोळ्याच्या ठिकाणी मला त्रासदायक जाणवत होते. माझ्या उजव्या डोळ्यात सकारात्मकता जाणवत होती, तर डाव्या डोळ्यात नकारात्मकता जाणवत होती.
१७. दोन वर्षांपासून प्रकाशाचा एक रंगीत गोळा दिसणे आणि त्याच्या अस्तित्वामुळे स्वतःत सकारात्मक पालट होणे
या दोन वर्षांत मला त्रास होत असतांना खोलीत प्रकाशाचा गोळा दिसतो. तो कधी निळसर, कधी लाल, तर कधी चंदेरी रंगाचा असतो. त्याच्या अस्तित्वामुळे मला माझ्यात ‘त्रास न्यून होणे, मनाला आलेली मरगळ अत्यल्प होऊन कृतीप्रवीण होता येणे, मन सकारात्मक होणे’ इत्यादी सकारात्मक पालट जाणवतात. त्यामुळे ‘सूक्ष्मातून दैवी शक्ती माझ्या सभोवती असून ती माझे रक्षण करत आहे’, असे मला जाणवते.
१८. पूर्वी त्रासाचे प्रमाण अधिक असल्याने वाईट शक्तींचेच अस्तित्व अधिक जाणवणे आणि आता वाईट शक्तींचा त्रास न्यून झाल्याने देवतांचे अस्तित्वही अनुभवता येणे
दैवी शक्ती, दैवी चिन्हे आणि दैवी नाद यांद्वारे वाईट शक्तींशी सूक्ष्मातील युद्ध होत आहे. पूर्वी मला झोपेत वाईट शक्ती दिसत आणि स्वप्नांतील दृश्यात वाईट शक्तींचेच अस्तित्व असायचे अन् त्या त्रास देत असल्याने त्यांचा त्रासदायक अनुभव यायचा. वाईट शक्तींची शक्ती अधिक असल्याने आणि त्यांचा वातावरणातील प्रभाव अन् संचार अधिक असल्याने मला त्यांचेच अस्तित्व जाणवायचे.
आता या युद्धात वाईट शक्ती हरत असल्याने त्यांचा प्रभाव न्यून होत आहे. त्यामुळे आता मला चांगल्या अनुभूतीही येत आहेत. पूर्वी वाईट शक्तींची शक्ती अधिक असल्याने देवता साहाय्य करत असूनही मला त्यांचे अस्तित्व जाणवत नसे; परंतु काळानुरूप आता वाईट शक्तींचा त्रास न्यून होत असल्याने ‘दैवी शक्ती साहाय्याला येत आहेत’, असे मला अनुभवायला मिळत आहे. ही सूक्ष्मातील अंतिम टप्प्यातील लढाई आहे. पुढे पुढे या वाईट शक्तींचा प्रभाव आणखी न्यून होऊन देवतांचे साहाय्य वाढत जाईल.
१९. आध्यात्मिक त्रासाच्या स्थितीनुसार स्वप्नांच्या माध्यमातून साहाय्य करणार्या आणि वाईट शक्तींपासून रक्षण करणार्या देवाच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !
देवाने माझ्या आध्यात्मिक त्रासाच्या स्थितीनुसार मला टप्प्याटप्प्याने साहाय्य केले आहे. ‘स्वप्नांच्या माध्यमातून देव मला आधार आणि धीर देत आहे, तसेच तो समवेत असून मोठ्या वाईट शक्तींपासून माझे रक्षण करत आहे’, असे मला जाणवते. स्वप्नांच्या माध्यमातून मला देवाच्या सूक्ष्म जगताचे दर्शनही झाले. ‘देवाने निर्माण केलेले हे विश्व किती अफाट आणि ते सूक्ष्मातीसूक्ष्म आहे !’, याची मला जाणीव झाली. अशा या सर्वांगसुंदर आणि प्रीतीमय देवाच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(समाप्त)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |