देवता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले स्वप्नात आल्यावर वाईट शक्तींचा त्रास न्यून होऊन स्वतःत सकारात्मक पालट झाल्याच्या साधिकेला आलेल्या अनुभूती !

‘मला वाईट शक्तीचा तीव्र त्रास आहे. वाईट शक्ती स्वप्नात येऊन मला घाबरवतात. त्यामुळे मला ‘निरुत्साही वाटणे, अंग दुखणे, हाडे दुखणे, सकाळी लवकर उठता न येणे आणि थकवा असणे’, अशा प्रकारचे त्रास होतात. त्यामुळे माझ्या सेवेत अडथळे येऊन मी साधना करू शकत नाही.

लेखाच्या १०.२.२०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘वाईट शक्तीमुळे साधिकेला झालेले त्रास आणि परात्पर गुरु डॉ. आठवले स्वप्नात आल्यावर साधिकेत झालेले सकारात्मक पालट’ पाहिले. लेखाच्या या भागात आपण ‘वाईट शक्तीमुळे साधिकेला झालेले त्रास आणि देवता स्वप्नात आल्यावर तिला आलेल्या अनुभूती’ पहाणार आहोत. 

 (भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/883308.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

८.  ९.४.२०१९

८ अ. स्वप्नात मानवी रूपातील ४ चांगल्या शक्ती दिसणे आणि त्यांनी मारुतिस्तोत्र म्हटल्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाल्याचे जाणवून जाग येणे : सकाळी मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मी झोपलेल्या ठिकाणापासून ४ फूट उंचीवर अधांतरी मानवी रूपातील ४ चांगल्या शक्ती उभ्या असलेल्या मला दिसल्या. ‘त्या माझ्यासाठी मारुतिस्तोत्र म्हणत आहेत’, असे मला दिसले. याआधी सकाळी जाग येऊनही ग्लानी आल्यामुळे मी उठू शकत नव्हते; पण त्या दिवशी चांगल्या शक्तींनी सूक्ष्मातून म्हटलेल्या मारुतिस्तोत्रामुळे माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाले आणि मला जाग आली. त्यामुळे मी लवकर उठू शकले आणि माझे नामजपादी उपायही लवकर पूर्ण झाले.

९.  २४.२.२०२०

९ अ. झोपेत ‘स्वतःच्या देहात दैवी स्पंदने जात असून त्यामुळे आध्यात्मिक त्रास उणावला आहे’, असे जाणवणे : मी एका खोलीत झोपले होते. तेव्हा सकाळी जाग येऊनही मी उठले नाही. त्यानंतर मला मी झोपलेल्या ठिकाणीच ‘माझ्या देहात दैवी स्पंदने जात आहेत’, असे जाणवले. त्यामुळे माझ्या शरिरातील त्रासदायक स्पंदने न्यून झाली. त्या वेळी ‘माझा आध्यात्मिक त्रासही उणावला आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे माझ्या शरिरात एक प्रकारची स्फूर्ती आणि शक्ती आली.

सौ. रंजना गडेकर

९ आ. स्वप्नात महालक्ष्मीचे चित्र असलेले चांदीचे नाणे दिसणे, त्यानंतर प्रत्यक्षातही महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन होणे आणि मन शांत अन् आनंदी होणे : त्यानंतर मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात मला एक चांदीचे नाणे दिसले. नाण्याच्या एका बाजूला महालक्ष्मीदेवीचे चित्र होते आणि दुसर्‍या बाजूला प्रचलित शिक्का होता. ते नाणे माझ्या डोक्यावर अधांतरी असल्याचे मला दिसले.

त्यानंतर झोपेतून उठल्यावर मी खोलीचे दार उघडले. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ एका सेवेसाठी बाहेर उभ्या असलेल्या दिसल्या. त्या वेळी सकाळी उठल्या उठल्याच ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष देवीचे दर्शन झाले’, असा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मला पहाटेच देवीच्या अस्तित्वाची प्रचीती आली.

त्यानंतर मी सेवेला गेले. नेहमीप्रमाणे माझ्या मनाला मरगळ न जाणवता उत्साह जाणवत होता. स्वप्न पडल्यानंतर त्रास न्यून झाल्याने माझे मन शांत, स्थिर आणि आनंदी झाले.

देव वेगवेगळ्या माध्यमांतून उपाय करत असतो. आपल्याला ते कधी कळते, तर कधी कळत नाही. ‘देवाने स्वप्नाच्या माध्यमातूनही माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले’, असे मला जाणवले.

१०.  २६.३.२०२० 

१० अ. स्वप्नात एका देवीने तिच्या मुकुटाद्वारे चैतन्य दिल्याचे जाणवणे आणि त्याच दिवशी आश्रमात देवीचे आगमन होणे : सकाळी मला स्वप्न एक पडले. स्वप्नात मला एका देवीचा मुकुट दिसला. तेव्हा मला देवीच्या मुकुटाचे वेगवेगळे भाग जवळून दिसत होते. देवीच्या मुकूटाचा वरचा टोकदार भाग मला माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी फिरतांना दिसला. पुष्कळ दिवसांपासून मला माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी पुष्कळ दाब आणि त्रास जाणवत होता. त्या दिवशी प्रत्यक्षातही एका देवीच्या मुर्तीचे रामनाथी आश्रमात आगमन झाले.

१० आ. वरील अनुभूतीचे टंकलेखन करत असतांना आलेली अनुभूती : या अनुभूतीचे संगणकावर टंकलेखन करत असतांना ‘देवीने स्वप्नात येऊन मला चैतन्य दिले’, या विचाराने माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. त्या वेळी मला वाटले, ‘देवी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आपल्यावर किती प्रीती आहे !’ हे वाक्य टंकलिखित करत असतांनाच परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र माझ्या संगणकाच्या पडद्यावर आले.

११.  १४.५.२०२० 

११ अ. स्वप्नात सेवेच्या संगणकासमोर पूजासाहित्य ठेवलेले दिसणे, त्यानंतर ग्लानी दूर होऊन उठता येणे आणि या अनुभूतीचा उमगलेला अर्थ : रात्री माझा थकवा वाढला होता. सकाळीही मला थकवा होता. त्या वेळी झोपेत वाईट स्वप्ने पडत होती, तसेच मला उठवतही नव्हते. त्यानंतर मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मला मी सेवेसाठी वापरत असलेला संगणक दिसला. त्या संगणकासमोर हळद, कुंकू, उदबत्तीचे घर, ताम्हण, घंटा, थोडीशी फुले इत्यादी पूजासाहित्य ठेवलेले दिसले. त्यानंतर मला जाग आली. माझी ग्लानी दूर होऊन मी उठून बसले.

२६.३.२०२० या दिवशी देवी सूक्ष्मातून मला म्हणाली, ‘मी तुझ्या संगणकावर आहे.’ त्यानंतर मला दिसायचे, ‘माझ्या संगणकाचा पडदा म्हणजे देवीचे रूप आहे.’ जेव्हा मला वरील स्वप्न पडले, तेव्हा मला वाटले, ‘स्वप्नातील हळद-कुंकू इत्यादी साहित्य देवीच्या पूजेसाठी आहे.’

१२.  १.६.२०२०

१२ अ. स्वप्नात आश्रमातील दुसर्‍या माळ्यावरून तळमजल्यावरील गणपतीच्या पाषाणी मूर्तीवर जलधारांचा अभिषेक होत असल्याचे दिसणे : मी सासरी असतांना सकाळी मला स्वप्न पडले. स्वप्नात मी रामनाथी आश्रमाच्या दुसर्‍या माळ्यावरून तळमजल्यावर पहात होते. त्या वेळी तेथील भिंतीवर धबधब्याप्रमाणे पाण्याच्या धारा दिसत होत्या आणि त्या पाण्याच्या धारा गणपतीच्या पाषाणी मूर्तीवर पडत होत्या. त्या मूर्तीवर जलधारांचा अभिषेक होत होता. गणपतीच्या मूर्तीची स्थापना पाण्यातच झाली होती. त्या वेळी ‘एका छोट्या तळ्यावर गणपतीची मूर्ती आहे’, असे दृश्य दिसत होते. तेव्हा ‘हे पाणी म्हणजे मानससरोवराचे पाणी आहे आणि तेथे देवतांचे वास्तव्य आहे’, असे मला जाणवले.

१२ आ. तळमजल्यावरील सर्व भिंतींवर चारही बाजूंनी विविध देवतांच्या मोठ्या पाषाणी मूर्ती कोरल्या होत्या.  त्या मूर्तींकडे पाहिल्यावर ‘त्या स्वयंभू देवतांच्या मूर्तीच आहेत’, असे मला जाणवले. 

१२ इ. ‘परात्पर गुरु डॉक्टर वापरत असलेल्या ‘कूलर’मधील पाण्याचा आवाज आणि स्वप्नातील पाषाणी मूर्तीवरून पडत असलेल्या पाण्याचा आवाज’, हा एकसारखाच असल्याचे लक्षात येणे : नंतर मी घरून रामनाथी आश्रमात आल्यावर एक दिवस अभ्यासिकेत सेवा करत होते. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टर वापरत असलेल्या ‘कूलर’मधील पाण्याचा आवाज ऐकला. तेव्हा मला वरील स्वप्नाचे स्मरण झाले. ‘त्या कूलरमधील पाण्याचा आवाज आणि स्वप्नातील पाषाणी मूर्तीवरून पडत असलेल्या पाण्याच्या धारांचा आवाज’, हा एकसारखाच अन् दैवी आहे’, असे मला जाणवले.’

१३.  ९.२.२०१६ 

१३ अ. स्वप्नात वनराई दिसणे आणि वनदेव अन् वनदेवी यांचे दर्शन होणे : या दिवशी माझा तिथीप्रमाणे वाढदिवस होता. त्या दिवशी मला शारीरिक त्रास होत असल्याने मी दुपारी खोलीतच झोपले होते. त्या वेळी मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मला एक वनराई दिसली. वनराईत एका डोंगरावरील सपाट भागावर एक काळा खडक दिसला. त्याच्या सभोवती हिरवळ होती. त्या खडकावर गुलाबी रंगाची आणि हिरवा काठ असलेली साडी नेसलेली एक स्त्री अन् पुरुष बसलेले दिसले. त्या दोघांनी डोक्यावर गोल मुकूट धारण केला होता. त्यांचा मुकूट चांदीचा होता. त्यांचा पेहराव बघून ते देवतांप्रमाणे वाटत होते. त्यांच्या देहावर उच्च देवतांप्रमाणे पुष्कळ दागिने नव्हते, तर कनिष्ठ देवतांप्रमाणे मोजकेच दागिने दिसत होते. त्या वेळी ते दृश्य मला काही क्षण दिसून नाहीसे झाले. ते दृश्य बघून माझ्या मनात विचार आला, ‘स्वप्नात आलेले वनदेव आणि वनदेवी असावेत.’

आईने तिची फार वर्षांपूर्वीची नवीन साडी मला दिली होती. तिचा रंग, काठ आणि नक्षी इत्यादी स्वप्नातील देवीच्या साडीसारखीच होती.

(क्रमशः)

– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  •  येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/883754.html