Panama Withdraws From BRI Project : ट्रम्पच्या धमकीपुढे पनामा झुकले !

पनामाची चीनच्या बी.आर्.आय. प्रकल्पातून माघार !

पनामाचे राष्ट्राध्यक्ष जोस राऊल मुलिनो व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

पनामा सिटी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पनामा कालवा कह्यात  घेण्याच्या वारंवार धमक्या दिल्यानंतर पनामाने एक मोठे पाऊल उचलले आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’मधून (बी.आर्.आय.मधून) माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पनामाचे राष्ट्राध्यक्ष जोस राऊल मुलिनो म्हणाले, ‘‘आम्ही चीनच्या ‘बी.आर्.आय.’ प्रकल्पासोबतच्या कराराची मुदत संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करणार नाही.’’ अशाप्रकारे पनामा हा चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ उपक्रमातून माघार घेणारा पहिला लॅटिन अमेरिकी देश बनला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर राष्ट्राध्यक्ष मुलिनो यांनी ही घोषणा केली.

१. चीन त्याच्या ‘बी.आर्.आय.’ प्रकल्पाच्या अंतर्गत पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांना प्रोत्साहन देतो आणि निधी देतो. तथापि टीकाकारांचे म्हणणे आहे की, यामुळे गरीब सदस्य देश कर्जबाजारी झाले आहेत. अशा देशांवर चीन दबाव आणून त्याच्याकडून हवे ते साध्य करून घेतो. भारताचा शेजारी श्रीलंका हे याचे एक उदाहरण आहे.

बी.आर्.आय. प्रकल्प काय आहे ?

चीन राबवत असलेला ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ तथा ‘बी.आर्.आय.’ प्रकल्प हा व्यापार, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा यांच्याद्वारे आशिया, आफ्रिका आणि युरोप या खंडातील विविध देशांना चीनशी जोडणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे जगभरात चीनचा जगात दबदबा वाढणार आहे.

२. मुलिनो म्हणाले की, त्यांचे सरकार पुढील १-२ वर्षांत हा करार संपुष्टात आणण्याची शक्यता अभ्यासणार आहेत. पनामाच्या तत्कालीन सरकारने वर्ष २०१७ मध्ये चीनच्या उपक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.

३. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी कालव्याचे नियंत्रण अमेरिकेकडे परत देण्याची मागणी केली आहे.