प्रयागराज कुंभपर्व २०२५
श्री. यज्ञेश सावंत, विशेष प्रतिनिधी

प्रयागराज, ३१ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्री काही मार्ग बंद करण्यात आल्याने दूध वितरणासाठी दूध वितरकांना मोठ्या समस्या भेडसावत आहेत. यामुळे दूध आणि दूग्धजन्य पदार्थ मिळण्यास अडचणी येत आहेत. याविषयी महाकुंभक्षेत्री प्रतिदिन ३ सहस्र लिटर दूध वितरण करणारे श्री. पंकज नावाचे वितरक आणि अन्य वितरक यांनी ‘सनातन प्रभात’ला त्यांच्या समस्या सांगितल्या. दूध आणि दूग्धजन्य पदार्थांच्या वितरणाचे अनेक कक्ष ३१ जानेवारी या दिवशी बंद असल्याचे आढळले. त्याचप्रमाणे भाविकांना प्रतिदिन अखंड चहा-अल्पहार देणार्या श्री झंडेवालादेवी मंदिराचे कक्षही बंद असल्याचे आढळले. त्यांना प्रतिदिन ५ सहस्र ५०० लिटर दूध लागते.
रस्ते बंद केल्यामुळे दूध वितरकांना अडचण
श्री. पंकज यांनी सांगितले, ‘महाकुंभक्षेत्री आम्हा दूध वितरकांना सेक्टर वाटून दिले आहेत. मी सेक्टर ४ आणि ६ येथे दुधाचे वितरण करतो. असे अनेक वितरक महाकुंभक्षेत्री दूध वितरण करत आहेत. दूध वितरण करणारे कक्ष, साधू-संतांचे मंडप यांना आम्हाला त्यांच्या मागणीनुसार काही सहस्र लिटर दूध वितरित करावे लागते. दूध वितरकाच्या एका गाडीत (टँकमध्ये) ७ सहस्र लिटर दूध वितरण करण्याची क्षमता आहे. अशा अनुमाने २५ ते ३० गाड्या कुंभक्षेत्री कार्यरत आहेत. तेवढे दूध प्रतिदिन कुंभक्षेत्री वितरित होते. प्रचंड गर्दीमुळे आणि काही क्षेत्रातील रस्ते बंद केल्यामुळे आमच्या गाड्या सेक्टरपर्यंत पोचू शकत नाहीत. त्यामुळे अडचण येत आहे. याविषयी कृपया आवाज उठवावा.’
सेक्टर क्रमांक ६ येथील ६ए असा क्रमांक दिलेल्या ‘अमूल’च्या कक्षाच्या मालकाने सांगितले की, आमच्याकडून प्रशासनाने सहस्रो रुपये भाडे घेतले आहे; मात्र आता दूध पोचत नसल्यामुळे दुकान बंद ठेवावे लागत आहे. १ लिटर दूध ९० रुपयांना मिळते. गाड्या पोचत नसल्यामुळे तीच पिशवी आम्हाला १५० रुपये देऊन विकत घ्यावी लागत आहे.
कुंभक्षेत्री रस्ते बंद केलेले नाहीत, तात्पुरती वाहतूक थांबवली ! – प्रयागराज जिल्हाधिकारी
आम्ही ४ फेब्रुवारीपर्यंत रस्ते बंद केल्याविषयी सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत असलेली माहिती चुकीची असून ३० जानेवारीला वाहतूक पूवर्वत चालू केली आहे. मौनी अमावास्येच्या निमित्ताने आम्ही वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याची योजना लागू केली होती. ३१ जानेवारी, १ आणि ४ फेब्रुवारी या दिवशी कोणत्याही मार्गावर बॅरिकेड्स (अडथळे) लावण्यात येणार नाहीत. केवळ २ आणि ३ फेब्रुवारी या दिवशी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात येईल, अशी माहिती प्रयागराजचे जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांनी व्हिडिओ प्रसारित करून सांगितले.