परिपत्रक प्रसिद्ध : इयत्ता ६ वी ते १० वी आणि १२ वी या वर्गांसाठी केवळ एप्रिल मासात सकाळी ११.३० वाजेपर्यंत चालणार वर्ग

पणजी, ३० जानेवारी (वार्ता.) – इयत्ता ६ वी ते १० वी आणि १२ वी या वर्गांसाठी नवीन शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून चालू होणार आहे. एप्रिलमध्ये सकाळी ११.३० वाजेपर्यंत वर्ग चालणार आहेत. १ मे ते ३ जून या काळात उन्हाळी सुटी असणार आहे, असे शिक्षण खात्याने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांसाठी हे परिपत्रक लागू असेल, असे शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी स्पष्ट केले आहे. एप्रिलमध्ये गोव्यात कडक उन्हाळा असतो आणि यामुळे वर्ग सकाळी ८ ते ११.३० वाजेपर्यंत चालणार आहेत. १ मे ते ३ जून अशा उन्हाळी सुटीनंतर ४ जूनपासून सर्व इयत्तांचे वर्ग नेहमीच्या वेळेत चालू होणार आहेत. शाळांच्या व्यवस्थापनांनी संबंधित परिपत्रक सूचनाफलकावर लावावे, तसेच सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना याची माहिती द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठीच हा नवीन पालट लागू करण्यात आला आहे.
शैक्षणिक वर्षात पालट केल्याने होणारे लाभ
१. शालेय दिवसांची पूर्ती होण्यास साहाय्य होणार आहे.
२. वर्षभरातील सुट्या अल्प कराव्या लागणार नाहीत.
३. माध्यान्ह आहारासाठीचे आवश्यक दिवस पूर्ण होणार आहेत.
४. गोवा शालांत मंडळाचे शैक्षणिक वेळापत्रक केंद्रीय शिक्षण मंडळाच्या बरोबरीने होणार आहे.
५. शिक्षणाच्या दृष्टीने अनुत्पादक ठरणारा एप्रिल महिना उत्पादक ठरणार आहे.
६. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार लागू करण्यात येत असलेल्या या वेळापत्रकामुळे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे सुलभ होणार आहे.
शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याशी शिक्षण खाते साधणार संवाद
‘अखिल गोवा माध्यमिक शाळा शिक्षक संघटने’ने शैक्षणिक वर्ष जूनऐवजी एप्रिलमध्ये चालू करण्याचा प्रस्तावित पालट आणि शाळेच्या वेळा आठवड्याला ३९ घंट्यांपर्यंत वाढवणे यांना विरोध केला होता; मात्र हा विरोध डावलून शिक्षण खात्याने अखेर ३० जानेवारी या दिवशी यासंबंधी परिपत्रक प्रसिद्ध केले. शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर म्हणाले, ‘‘शैक्षणिक वर्षासंबंधी करण्यात आलेला पालट आणि त्याची कार्यवाही करणे यासंबंधी माहिती देण्यासाठी शिक्षण खाते शिक्षक अन् विशेषत: मुख्याध्यापक यांच्याशी संवाद साधणार आहे.’’
इयत्ता ५ वी पर्यंतचे वर्ग जूनमध्येच चालू होणार
शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर पुढे म्हणाले, ‘‘सध्या प्राथमिक इयत्तेचे (इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंत) वर्ग एप्रिलमध्ये चालू न करता ते जूनमध्येच चालू करण्याचे धोरण कायम ठेवण्यात आले आहे.’’
‘अपार आयडी’ अनिवार्य
यापुढे शाळेमध्ये पालट करतांना किंवा अन्य राज्यांत शाळेत प्रवेश घेतांना ‘अपार आयडी’ क्रमांकाचा उल्लेख करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक रहाणार आहे, अशी माहिती देणारे आणखी एक परिपत्रक शिक्षण खात्याने प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की, पाठ्यपुस्तके विनामूल्य मिळवणे, माध्यान्ह आहार आणि सरकारच्या इतर सवलती मिळवणे यांसाठी ‘अपार आयडी’ क्रमांक अनिवार्य आहे. शाळांच्या व्यवस्थापनाने विनाविलंब विद्यार्थ्यांना ‘अपार आयडी’ क्रमांक देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.’’