
मुंबई – शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिरक महोत्सवी वाढदिवस ‘श्री एकनाथ आध्यात्मिक सेवा वर्ष’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ‘शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेने’कडून याविषयी घोषणा करण्यात आली आहे. ९ फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा ६० वा वाढदिवस असून त्यानिमित्त आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या नेतृत्वात वर्ष २०२५ मध्ये ३६ जिल्ह्यांत विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेतील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सहभागी होतील. राज्यातील ६ सहस्र मंदिरांत वर्षभर कीर्तनातून शासकीय योजना आणि शिंदे यांच्या आध्यात्मिक क्षेत्रातील कार्याचा प्रसार होईल.
अक्षय महाराज भोसले म्हणाले की, राज्यातील ६० सहस्रांपेक्षा अधिक विद्यार्थी वर्गास ई-प्रणालीद्वारे आध्यात्मिक आणि पारंपरिक शिक्षण मिळणार आहे. त्यात १ सहस्र कीर्तनकारांचा समावेश असेल. राज्यभर तालुका, जिल्हा, विभाग निहाय श्री एकनाथ भजन स्पर्धा आणि श्रीराम कथा यांचे आयोजन करण्यात येईल. आध्यात्मिक क्षेत्रातील प्रभावी कार्यातून शिवसेनेचे १ लाख सभासद सहभागी होतील. श्री एकनाथ आध्यात्मिक संवाद महाराष्ट्र दौरा काढण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील भजन मंडळास संत साहित्य भेट देण्यात येईल. ‘श्री एकनाथ आध्यात्मिक सेवा वर्षा’त राज्यात विभागनिहाय आध्यात्मिक अधिवेशने घेण्यात येणार आहेत.