
प्रयागराज, ३० जानेवारी (वार्ता.) – येथे सेक्टर क्रमांक ७ मध्ये लावण्यात आलेल्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कक्षाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने हा कक्ष जिज्ञासूंचे विशेष आकर्षण बनला आहे. कोणतीही कृती धर्मशास्त्राच्या आधारे केल्याने होणारे आध्यात्मिक लाभ, सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा शरीर, मन अन् बुद्धी यांवर होणारा परिणाम, आध्यात्मिक स्तरावर उपाय केल्याने सकारात्मकतेत होणारी वाढ या गोष्टी जाणून घेण्याविषयी अनेक जिज्ञासूंमध्ये कुतूहल दिसून आले. अनेक जिज्ञासूंनी माहिती देणार्या फलकांची छायाचित्रे काढली. ‘स्वस्तिक’, ‘ॐ’ यांसारखी आध्यात्मिक चिन्हे कशी सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करतात ?, गोमूत्राचा उपयोग केल्याने शरिरातील चक्रांवर होणारा सकारात्मक परिणाम, सात्त्विक अलंकार परिधान करण्यामागील अध्यात्मशास्त्र’, अशा अनेक विषयांची माहिती देणार्या फलकांसह कुंभस्नान केल्यानंतर भाविकांवर होणारे सकारात्मक परिणाम, मीठ-पाण्याचे उपाय, वाहनशुद्धी यांविषयीचे व्हिडिओ जिज्ञासूंना पुष्कळ भावले.
क्षणचित्रे
१. या प्रदर्शनकक्षाला भेट दिल्यानंतर ४९ जिज्ञासूंनी ऑनलाईन सत्संगाची मागणी केली.
२. श्री. रजनीश पांडे यांनी कक्षाला भेट दिल्यानंतर ‘प्रदर्शन कक्षातील वातावरणात पुष्कळ सात्त्विकता जाणवते, तसेच येथील माहिती सांगणारे साधक पुष्कळ नम्र आहेत’, असे सांगितले.
३. श्री. अभिषेक पांडे यांनी सर्व फलकांची माहिती घेतल्यानंतर ते त्यांच्या कुटुंबातील १२ जणांना घेऊन आले आणि त्या सर्वांनाही प्रदर्शन दाखवले.
४. ओडिशा येथील सौ. अनुसया स्वैन यांनी कक्षातील फलकांची माहिती सांगणार्यांचा व्हिडिओ सिद्ध केला. ‘तो व्हिडिओ घरी सर्वांना दाखवणार’, असे त्यांनी सांगितले.
५. सैन्यदलातील सैनिकांनी प्रदर्शनस्थळी येऊन गंगा नदीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती घेतली.