Dr. Omendra Ratnu : हिंदु समाजाने पाकिस्तानी हिंदूंसाठी पुढे यावे !

डॉ. ओमेंद्र रत्नू, पाकिस्तानी हिंदूंसाठी लढणारे हिंदुत्वनिष्ठ

‘विस्थापित हिंदु पुनर्वसन बोर्ड’ची स्थापना करण्याची मागणी

श्री. यज्ञेश सावंत आणि श्री. केतन पाटील, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज

‘निमित्तेकम’ संस्थेचे डॉ. ओमेंद्र रत्नू

प्रयागराज, ३० जानेवारी (वार्ता.) – क्रिकेट, बॉलीवूड (हिंदी चित्रपटसृष्टी) अशा गोष्टींत अडकलेला हिंदु समाज बलात्कार होणार्‍या हिंदु मुलींसाठी किती पुढाकार घेतो ? आज पाकिस्तानातील १ कोटी हिंदु समाज पशूसारखे जीवन जगत आहे. पाकिस्तानी हिंदूंना व्हिसा (देशात रहाण्याचा परवाना) मिळत नाही. आम्ही ठरवले आहे की, जितक्या हिंदूंना परत आणता येईल, ती आमची साधना आहे. हिंदु समाजाने पाकिस्तानी हिंदूंसाठी पुढे यावे, असे स्पष्ट वक्तव्य ‘निमित्तेकम’ संस्थेचे डॉ. ओमेंद्र रत्नू यांनी केले. ‘सनातन प्रभात’शी वार्तालाप करतांना त्यांनी पाकिस्तानी हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी सांगितले आणि भारतातील हिंदूंनी साहाय्य करावे, असे आवाहन केले.

श्री. ओमेंद्र रत्नू पुढे म्हणाले की,

पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदूंसाठी ‘विस्थापित हिंदु पुनर्वसन बोर्ड’ स्थापन करावा !

सीएए कायद्याचे स्वागत आहे; परंतु त्या कायद्याचा वर्ष २०२५ येईपर्यंत संपूर्ण लाभ झाला नाही. वर्ष २०१४ नंतर अडकलेल्या हिंदूंचे काय ? हा प्रश्‍नच आहे. कायद्यात समयमर्यादा न ठेवणे आवश्यक होते. पाकिस्तानातील हिंदू हे भिल्ल, कोळी, मेघवाई, पूर्व राजपूत अशा विविध समाजातून येतात. भारतातील त्यांच्या समाजातील लोक चांगल्या परिस्थितीत आहेत; म्हणून आज त्यांना साहाय्य करता येऊ शकते. पाकिस्तानातील १ कोटी आणि बांगलादेशातील २ कोटी हिंदूंसाठी विस्थापित ‘हिंदु पुनर्वसन बोर्ड’ अशा बोर्डाची स्थापना व्हायला हवी. त्या बोर्डाच्या माध्यमातून पाकिस्तानी, बांगलादेशी हिंदूंना भारतात जागा मिळवून देणेे, त्यांची रहाण्याची सोय करणे अशा गोष्टी करता येतील.

पाकिस्तानी अथवा बांगलादेशी हिंदू वाचले नाहीत, तर उद्या तीच परिस्थिती भारतात उद्भवेल !

पाकिस्तानातील हिंदूंची संपूर्ण गावे मुसलमान होत चालली आहेत. भारतातील हिंदूंचीच परिस्थिती बिकट आहे, असे कळल्यावर पाकिस्तानातील हिंदूंनी काय करावे ? ‘या काफिरांना काढा आणि पाकिस्तानचे नाव खराब करू नका’, अशा धमक्या आय.एस्.आय.सारख्या आम्हाला संघटना देतात. हिंदु समाज, हिंदु संघटना, हिंदु साधू-संत यांना पाकिस्तानी, बांगलादेशी हिंदूंविषयी संवेदना अल्प आहेत का ? असा प्रश्‍न पडतो.

प्रशासकीय अडचणींमुळे पाकिस्तानी हिंदूंना वाचवणे कठीण होत आहे !

सोनिया गांधी यांनी एक कायदा आणला होता. त्यामध्ये व्हिसासाठी आवेदन दिले की, ते शासन नियुक्त अधिकार्‍याकडून (गॅझेटेड ऑफिसरकडून) स्वाक्षरी करून घ्यावे लागते. पूर्वी ऑनलाईन पद्धत होती, तर आता लेखी पत्र द्यावे लागते. हे पत्र थेट पाकिस्तान येथे कसे जाणार ? यासाठी आधी हे आवेदन दुबई आणि मग दुबईवरून पाकिस्तान येथे पाठवावे लागते. माझी शासनाला विनंती आहे की, या कायद्यात दुरुस्ती व्हावी. नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर या कायद्यातून केवळ ३०-४० सहस्र हिंदूंना लाभ होईल; परंतु ३१ डिसेंबर २०१४ नंतर असलेल्या हिंदूंचे काय ? प्रशासनाने या विषयी अधिक साहाय्य करायला हवे.