‘श्री. प्रदीप चौहान यांना संगीतातील राग आणि भजने गातांना आलेल्या विविध अनुभूती, तसेच त्यांना ईश्वराकडून संगीत साधनेविषयी मिळालेले ज्ञान येथे दिले आहे.
श्री. प्रदीप चौहान यांचा परिचय
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2025/01/29233021/2025_Pradeep_Chauhan_C.jpg)
‘श्री. प्रदीप चौहान हे पलवल, हरियाणा येथे रहातात. त्यांनी मुंबई येथील शास्त्रीय गायक श्री. विनायक प्रभु यांच्याकडून ४ वर्षे संगीताचे शिक्षण घेतले. पूर्वी ते शाळेत संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. आता त्यांची संगीतातून साधना करण्याची इच्छा आहे.
त्यांची श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा आहे. ते ईश्वराच्या चरणांशी समर्पित भावाने गायनसेवा करत आहेत. सध्या ते संगीतातून साधना शिकण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रामध्ये १५ दिवस आले आहेत.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.१.२०२५)
१. राग ‘तोडी’ आणि त्या रागातील भजने गातांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
१ अ. मुंबई येथे एका कुटुंबासह रहात असतांना औदुंबराच्या वृक्षाखाली बसून संगीत साधना करणे आणि तेथील वातावरणात सहजतेने ध्यान लागणे : ‘मी मुंबई येथे एका कुटुंबासह रहात होतो. तिथे औदुंबराचे झाड होते. त्या झाडामध्ये दत्तगुरूंची मूर्ती निर्माण झाली आहे. मी त्या वृक्षाच्या खाली बसून संगीत साधना करत असे. तेथे सभोवती फुलझाडे असल्याने तेथील वातावरण चैतन्यमय होते. मी तेथे संगीत साधना करत असतांना ‘माझे कधी ध्यान लागायचे ?’, ते माझ्या लक्षातही यायचे नाही. तिथे संगीत साधना करायला मला ऊर्जा मिळत होती.
१ आ. मी माझ्या गायनाचा आरंभ एखाद्या रागाची बंदीश गाऊन करत असे आणि त्याच रागातील भजन म्हणून त्यातून आनंद घेत असे. अशा प्रकारे तेथे माझा संगीताचा सराव आणि साधना एकत्रच होत असे.
१ इ. दुपारच्या वेळी दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर राग तोडीतील बंदीश आणि भजन म्हणत असतांना मूर्तीच्या वर असलेला दिवा आपोआप चालू होणे अन् भजन संपल्यावर दिवा बंद होणे : एक दिवस दुपारच्या वेळी मी दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर राग ‘तोडी’ आणि त्याच रागातील ‘गुरुविण नाही कोणी रे’ हे भजन म्हणत होतो. त्या मूर्तीच्या वर दिवा होता. त्या वेळी दुपार असल्याने दिवा बंद होता; मात्र मी भजन म्हणत असतांना दिवा लुकलुक करत आपोआप लागला.
मी भजन म्हणत असेपर्यंत तो दिवा चालू होता. माझे भजन म्हणून झाल्यावर दिवा आपोआप बंद झाला. माझे भजन म्हणून झाल्यावर मी ‘दिव्याचे बटन चालू आहे का ?’, ते पाहिले असता ‘दिव्याचे बटन बंद आहे आणि त्या दिव्याचा प्लगही खाली लोंबत आहे’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा ‘दत्तगुरूंच्या कृपेचीच ही प्रचीती आहे’, असे मला वाटले.
२. राग ‘चारूकेशी’ आणि त्या रागातील भजन गातांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
२ अ. वडिलांना शेतीच्या कामात साहाय्य करण्यासाठी गावी जाणे आणि वेळ मिळाल्यास शेतात ‘हार्माेनियम’वर श्री स्वामी समर्थांची भजने म्हणत असतांना भावस्थिती अनुभवणे : माझे वडील शेतकरी आहेत. मी मुंबई येथे रहात असतांना माझ्या वडिलांना शेतीच्या कामात साहाय्य करण्यासाठी गावी जात असे. मी शेतात जातांना ‘हार्माेनियम’ (पेटी) समवेत नेत असे. तिथे वेळ मिळाला की, मी श्री स्वामी समर्थांची भजने म्हणत असे. मी भजने गात असतांना भावस्थिती अनुभवत असतांना मला वेळेचे भान रहात नसे.
कलाकाराने कलेला आध्यात्मिक साधनेची जोड देण्याचे महत्त्व
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2024/05/26213529/2023_June_Tejal_Patrikar_H_C.jpg)
‘साधना आणि ईश्वराची आराधना करतांना भाव हा महत्त्वाचा घटक आहे. कलाकाराचा ‘कलेप्रती समर्पित भाव असणे आणि कलेला भावपूर्ण साधनेची जोड देणे’, यांमुळे कलाकाराच्या गायनातही आर्तता येते. या आर्ततेमुळे ‘ईश्वर कलेच्या माध्यमातून आपल्या जवळच आहे’, अशी अनुभूतीही साधकाला येते. श्री. प्रदीप चौहान यांना आलेल्या अनुभूतींतून हे लक्षात येते. त्यासाठी कलाकाराने कलेला आध्यात्मिक साधनेची जोड देणे आवश्यक आहे.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.१.२०२५)
२ आ. गुरुकृपेची आलेली अनुभूती
२ आ १. शेतातील मुगाची कापणी झाल्यावर काही धान्य वडिलांनी पेठेत नेणे आणि उर्वरित धान्य पेठेत नेण्याआधी वातावरण ढगाळ होऊन ‘पाऊस येणार’, असे वाटणे : आमच्या शेतात मूग लावले होते. एकदा मुगाची कापणी झाल्यावर माझे वडील एक ‘ट्रॅक्टर ट्रॉली’ घेऊन धान्य विकायला पेठेत गेले. मी नंतर दुसर्या खेपेत उर्वरित मुगाची कापणी करून ते पेठेत नेणार होतो. तेवढ्यात वातावरण ढगाळ झाले. ‘आता पाऊस येणार’, अशी लक्षणे दिसत होती.
आम्हाला काळजी वाटू लागली. पाऊस आल्यास त्या पिकाची हानी होणार होती.
२ आ २. श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करून ‘चारूकेशी’ रागातील भजन म्हणणे आणि ‘वडिलांनी पेठेत अन् अन्यत्र पाऊस पडत आहे’, असे सांगणे; मात्र शेतात पाऊस न पडणे : तेव्हा माझ्यासमोर ‘हार्माेनियम’ (पेटी) होती. मी श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करून राग चारूकेशीमधील एक भजन गायला लागलो. मी हे भजन म्हणत असतांना माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. माझे डोळे बंद होते. मी काही वेळानंतर डोळे उघडल्यावर माझ्या लक्षात आले, ‘पाऊस आला नाही.’ तेव्हा मी वडिलांना भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘तुम्ही काळजी करू नका. इकडे शेतात पाऊस आला नाही.’’
तेव्हा वडिलांनी सांगितले, ‘‘पेठेत आणि घराच्या परिसरात सगळीकडे पाऊस आहे.’’ तेव्हा माझ्या डोळ्यांतून आणखी अश्रूधारा वाहू लागल्या. मला श्री गुरूंच्या कृपेची अनुभूती आली. ‘गुरूंना शरण गेल्यास गुरु सर्व भार वहातात’, याचीच मला प्रचीती आली.
३. ईश्वराकडून मिळालेले ‘संगीत आणि साधना’ यांविषयी ज्ञान
मी गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रामध्ये संगीतातून साधना शिकण्यासाठी आल्यावर ‘संगीतातून साधना’ याविषयीचे पुढील विचार मला आपोआप सुचले.
अ. संगीताला साधनेची जोड दिल्यावर संगीत मनातून चित्तामध्ये जाण्याचा प्रवास सहजतेने होतो. त्यामुळे आपल्यावर गुरुकृपा होण्यासह ईश्वरप्राप्तीच्या दिशेने आपली वाटचाल होते.
आ. साधकाची साधना चांगली असेल, त्याचे मन निर्मळ असेल, त्याच्या मनात कुठलीच इच्छा नसेल आणि त्याचा गुरूंप्रती शरणागतभाव असेल, तर त्याला संगीतातून साधनेचा मार्ग सोपा आहे.
इ. कलियुगात गुरुकृपा होणे आवश्यक आहे; कारण ईश्वर सूक्ष्म आहे, त्याला जाणणे अतिशय कठीण आहे. ‘ईश्वराला जाणणे’, हे गुरुकृपेनेच शक्य आहे.
ई. कलियुगात गुरु लाभणेही कठीण आहे; मात्र आपण स्वतःत गुरुप्राप्तीच्या तळमळीची ज्योत लावली, तर गुरु आपोआप त्यांच्यापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात आणि ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवणारेही गुरुच आहे.
उ. आपण आपल्या मनाला वाटेल तसा विचार करतो आणि तसे वागतो; मात्र ‘गुरूंना आपल्यासाठी कुठला मार्ग आवश्यक आहे’, हे सर्व ठाऊक असते. आपल्याला सूक्ष्म स्तरावरील अनुभवायचे असल्यास त्यासाठी गुरुकृपाच हवी.
माझ्या मनात अशा प्रकारचे विचार यापूर्वी कधी आले नव्हते. ‘मी गोवा येथे आल्यावर माझ्या मनात हे विचार येणे’, ही ‘माझ्यावरील गुरुकृपाच आहे’, असे मला वाटले.’
– श्री. प्रदीप चौहान, पलवल, हरियाणा. (१९.१.२०२५)
|