Prayagraj Mahakumbh Stampede : महाकुंभपर्वात चेंगराचेंगरी : परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर अमृत स्नान पार पडले !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

  • ३० जण ठार आणि ६० जण घायाळ

  • पंतप्रधान मोदी यांनी घेतला आढावा

  • प्रशासनाने परिस्थिती आणली नियंत्रणात

प्रयागराज, २९ जानेवारी (वार्ता) – मौनी अमावास्येनिमित्त अमृत स्नानासाठी येथील त्रिवेणी संगमावर २८ जानेवारीला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास प्रंचड गर्दी होऊन झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जण ठार आणि ६० जण घायाळ झाले. घायाळांना प्रयागराजमधील स्वरूपाणी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनेनंतर तो परिसर वगळता अन्य ठिकाणाहून भाविकांचे स्नान चालू होते. चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाने काही घंट्यांत परिस्थिती नियंत्रणात आणली.

चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाच्या विनंतीवरून सर्व १३ आखाड्यांनी मौनी अमावास्येचे अमृतस्नान प्रथम रहित करण्याची घोषण केली; परंतु काही घंट्यांनंतर परिस्थिती अटोक्यात आल्यानंतर स्नान करण्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाविकांना आवाहन

या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘भाविकांनी संगम नोजवर जाण्याचा आग्रह न धरता जवळच्या घाटावर स्नान करावे, तसेच भाविकांनी पोलीस आणि महाकुंभमेळा प्रशासन यांना सर्वतोपरी साहाय्य करावे’, असे आवाहन केले. संगम नोजवरच खरा त्रिवेणी संगम आहे, अशी भाविकांची समजूत असल्याने सर्वच भाविक स्नानासाठी तेथे जाण्याचा प्रयत्न करतात. याच ठिकाणी आखाडेही स्नानासाठी येत असल्याने प्रचंड गर्दी होते.

चेंगराचेंगरीचा घटनाक्रम !

१. संगमक्षेत्री भाविकांनी रात्रीपासूनच केलेले प्रचंड गर्दी, हे होते. मौनी अमावास्येच्या अमृत स्नानाचा मुहुर्त पहाटे ५.३३ ते ६.१५ असा होता. तो गाठण्यासाठी भाविक रात्रीपासूनच त्रिवेणी संगमाचे ठिकाण असलेल्या ‘संगम नोज’वर (स्नान करण्याचे मुख्य ठिकाण) भाविक रात्री तेथेच झोपले.

२. भाविक आणि आखाडे यांना स्नानासाठी जाण्याचे मार्ग वेगवेगळे होते. भाविकांच्या स्नानाच्या मार्गावर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास प्रचंड गर्दी झाली. भाविक स्नानाला जायची घाई करत होते, तर पोलीस त्यांना निश्‍चित केलेल्या मार्गाने जाण्याची सूचना करत होते.

३. अशात प्रचंड गर्दीमुळे रेटारेटी होऊन तेथील बॅरेकेडींग (तात्पुरता अडथळा) तुटले आणि बॅरीकेडींच्याजवळ झोपलेल्या भाविकांना तुडवत रेटा पुढे गेला. त्यामुळे प्रचंड आरडाओरड होऊन चेंगराचेंगरी झाली अन् एकच खळबळ उडाली.

एन्.एस्.जी. कमांडोंचे साहाय्य

या दुर्घटनेनंतर एन्.एस्.जी. कमांडोंनी संगम तीरावर पदभार स्वीकारला. संगमाच्या परिसराच्या काही भागांत भाविकांना प्रवेशबंद करण्यात आला. गर्दी आणखी वाढू नये; म्हणून प्रयागराज शहरातही भाविकांच्या येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी शहराला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला सतर्कतेची चेतावणी दिली आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधानांनी घातले लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दूरभाष करून घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि आवश्यक त्या उपाययोजनांविषयी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४ वेळा भ्रमणभाष करून घटनेची माहिती घेतली आहे. अधिकारी हेलिकॉप्टरमधून महाकुंभ क्षेत्रावर लक्ष ठेवत आहेत. ही घटना घडल्यानंतर ७० हून अधिक अ‍ॅम्बुलेन्स संगम तटावर पोचल्या. यामध्ये मृत आणि घायाळ झालेल्या भाविकांना रुग्णालयात नेण्यात आले. संगम तटावर भाविकांना प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे. गर्दी अधिक वाढू नये यासाठी प्रयागराज जिल्ह्यांतील विविध गावांतून येणार्‍या भाविकांना येण्यास रोखण्यात आले आहे. तेथे प्रशासनाला सतर्क रहाण्याची सूचना करण्यात आली.

रेल्वे मंत्रालयाच्या वतीने ३६० रेल्वे चालू करण्याची योजना !

रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, विविध रेल्वे स्थानकांवरून प्रयागराज येथे येण्यासाठी ३६० रेल्वे चालू करण्याची योजना केली आहे. सध्यातरी कोणतीही रेल्वेगाडी रहित केलेली नाही. तशी योजनाही नाही.

प्रयागराज येथे ९ कोटी भाविक येणार !

महाकुंभाच्या निमित्ताने प्रयागराज शहरात एकूण ९ कोटी भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. संगमसमवेत ४४ घाटांवर रात्रीपर्यंत ८ ते १० कोटी भाविकांनी स्नान केले. २८ जानेवारी या दिवशी ५ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगम येथे स्नान केले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ६० सहस्रांहून अधिक सैनिक तैनात आहेत.

चेंगराचेंगरीतील १४ जणांची केंद्रीय चिकित्सालयात भरती ! – डॉ. मनोज कौशिक, मुख्य वैद्यकीय अधीक्षक

चेंगराचेंगरीत घायाळ झालेल्यांपैकी १४ जणांना येथील केंद्रीय चिकित्सालयात भरती करण्यात आले आहे. त्यातील निम्म्या रुग्णांना प्राथमिक उपचार करून सोडून दिले आहे. ३ जणांचा अस्थिभंग झाला होता. त्यांना शासनाच्या ‘स्वरूपराणी वैद्यकीय महाविद्यालया’त पाठवले आहे. अद्याप काही जण केंद्रीय चिकित्सालयात उपचार घेत आहेत, असे केंद्रीय चिकित्सालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज कौशिक यांनी ‘सनातन प्रभात’शी बोलतांना सांगितले.

इतर घडामोडी…

१. पोलिसांनी रांग लावून भाविकांची गर्दी अल्प करून भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. पोलीस ध्वनीक्षेपकांवर उद्घोषणा करून भाविकांना रस्त्यांचा मार्ग सांगत होते.

२. जुना आखाड्याचे महंत चेतन गिरी यांनी सांगितले की, पोलीस, प्रशासन भाविकांचे संरक्षण करण्यासाठी तत्परतेने कृती करत आहेत.

सनातन धर्माची अपर्कीती करण्याचा प्रयत्न केला जात आहे ! – श्री रवींद्र पुरी महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष

भाविकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. सनातनची अपर्कीती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेमुळे आम्ही पुष्कळ दुःखी आहोत. आमच्यासमवेत सहस्रों भाविक आहेत. भाविकांच्या हिताचा विचार करून आखाड्यांतील संतांनी स्नान न करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्याऐवजी वसंत पंचमीच्या दिवशी त्रिवेणी संगम तटावर स्नान करू. संगम घाटावर पोचण्याच्या प्रयत्नातून ही घटना घडली आहे. याऐवजी ज्या ठिकाणी पवित्र गंगा नदीचे ठिकाण आहे, तेथे भाविक स्नान करू शकतात.