रुग्णाईत असतांना साधिकेने अनुभवलेली संत आणि गुरुदेव यांची कृपा ! 

‘साधिकेला ‘हात, पाय, तोंड’ यांच्याशी संबंधित (एक विषाणूजन्य संसर्गजन्य आजार) आजार झाल्यावर तिच्या लक्षात आलेले ‘नामजपादी उपाय करण्याचे महत्त्व’ आणि ‘देव साधकांचे प्रारब्धभोग कसे सुसह्य करतो !’, या संदर्भात तिला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. (सौ.) मनीषा पाठक

१. तळहात आणि तळपाय यांवर फोड येऊन त्या ठिकाणी वेदना होणे, दुसर्‍या दिवशी फोडांच्या आकारात वाढ होणे, पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी अन्य साधिकेला साधिकेच्या समवेत रुग्णालयात पाठवणे

‘२०.११.२०२४ या दिवशी माझे तळहात आणि तळपाय यांवर अकस्मात् काही फोड येऊन मला त्या ठिकाणी वेदना होऊ लागल्या. त्या रात्री त्या फोडांच्या आकारात वाढ झाली. दुसर्‍या दिवशी त्या फोडांचा आकार आणखी मोठा झाला. तेव्हा मी पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या संत) यांना माझ्या शरिरावर आलेले फोड दाखवले. त्या वेळी पू. ताई पुष्कळ महत्त्वाच्या सेवांमध्ये व्यस्त होत्या. मी त्यांना माझे हात दाखवल्यावर ‘हे काहीतरी वेगळे आहे’, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांच्या सेवा लगेच थांबवून साधक आधुनिक वैद्यांना संपर्क केला. त्यांनी समन्वय करून मला एका आधुनिक वैद्यांकडे उपचारांसाठी जाण्याचे नियोजन केले. माझ्या तळपायांवरही फोड आल्याने मला नीट चालताही येत नव्हते.

पू. मनीषाताईंनी लगेच रिक्शा बोलावून एका साधिकेला माझ्या समवेत रुग्णालयात पाठवले. आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘सध्या या आजाराची साथ चालू आहे; पण तुम्ही लवकर आल्याने वेळेत उपचार चालू होतील. काळजीचे कारण नाही.’’

२. पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी तत्परतेने सर्व उपचार आणि नामजपादी उपाय मिळवून देणे 

मी सेवाकेंद्रात परत आल्यावर पू. ताईंनी मला नामजप सांगितला. त्यांची आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करण्यातील तत्परता पाहून ‘गुरुदेव संतांच्या माध्यमातून प्रत्येक साधकाची कशी काळजी घेतात आणि अशी प्रीती केवळ आपले संतच करू शकतात’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली. पू. मनीषाताईंनी तत्परतेने सर्व नियोजन केल्याने मला वेळेत उपचार आणि नामजपादी उपायही मिळाले.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय सांगणे 

पू. ताईंनी सद्गुरु गाडगीळकाकांना नामजपाविषयी विचारून घेतले. त्या वेळी सद्गुरु काकांनी मला ‘ ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ असा नामजप करायला सांगितला.

३ अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपामुळे झालेले लाभ

१. सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेला नामजप मी प्रतिदिन १ ते १.१५ घंटा असा ७ दिवस केला. मी नामजप करत असतांना फोडांची संख्या वाढणे पूर्णपणे थांबले, तसेच मला वेदना, कंड किंवा दाह, असा कोणताही त्रास जाणवत नव्हता.

२. मी ७ दिवसांनी पुन्हा आधुनिक वैद्यांना दाखवल्यावर त्यांनी फोड पूर्ण बरे होईपर्यंत मला वेगळे रहायला सांगितले. मी औषधे घेत होते आणि नामजपादी उपायही करत होते. त्यामुळे मला या आजाराचा काही त्रास होत नव्हता; परंतु माझ्या शरिरावरील फोड सुकत नव्हते आणि उणावतही नव्हते. त्या वेळी पू. मनीषाताईंनी सद्गुरु गाडगीळकाकांना माझी स्थिती सांगितली आणि ‘आणखी काही करायला हवे का ?’, असे विचारून घेतले.

कु. प्राची शिंत्रे

३. सद्गुरु काकांनी माझ्यासाठी नामजपादी उपाय करून मला ‘महाशून्य’ हा नामजप करायला सांगितला. मला ‘महाशून्य’ हा नामजप डोक्याच्या डाव्या बाजूला एक तळहात ठेवून आणि मणिपूर चक्रावर दुसरा तळहात ठेवून प्रतिदिन २ घंटे करायचा होता. मी हा नामजप चालू केल्यावर दुसर्‍याच दिवशी सर्व फोड सुकू लागले आणि गतीने सर्व फोड बरे होऊ लागले. नंतर ४ – ५ दिवसांतच सर्व फोड बरे झाले.

४. ‘गुरुदेवांनाच साधकांनी साधनेत पुढे जावे’, याची तळमळ अधिक असते’, हे लक्षात येणे

मला हा त्रास होण्यापूर्वी अनेक दिवस माझा १ घंटाही नामजप होत नव्हता; परंतु मला उपायांसाठी दिलेल्या नामजपामुळे माझा ३ घंटे नामजप होऊ लागला. त्यानंतरही माझ्याकडून नामजपादी उपाय पूर्ण होण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. ‘माझ्या व्यष्टी साधनेची घडी बसावी’, यासाठीच हे देवाचे नियोजन आहे. ‘गुरुदेवांनाच साधकांनी साधनेत पुढे जावे’, याची तळमळ अधिक असते’, हे माझ्या लक्षात आले. मागील काही मासांमध्ये समष्टी सेवा करतांना माझे व्यष्टी साधना आणि स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करण्याच्या प्रक्रियेकडे पुष्कळ दुर्लक्ष झाले होते. या कालावधीत ‘देवाने मला ‘व्यष्टी साधना वाढवण्यासाठी, तसेच समष्टी सेवेचे देवाला अपेक्षित असे चिंतन होण्यासाठीच’ हा अवधी दिला आहे’, याची प्रकर्षाने जाणीव झाली.

या आजारपणामुळे माझी व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा यांवर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. माझ्या मनाच्या स्थितीत पुष्कळ सकारात्मक पालट झाला. माझ्याकडून स्वतःमधील स्वभावदोष आणि अहंचे पैलू, यांचे चिंतन होऊ लागले.

५. कृतज्ञता 

‘देव माझे प्रारब्ध किती सुसह्य करत आहे’, याची मला जाणीव होऊन मला सतत कृतज्ञता वाटत होती. ‘माझे प्रारब्ध तर नष्ट होत आहे; मात्र गुरुदेव मला त्याची झळ काहीच लागू देत नाहीत’, हे केवळ माझे गुरुदेवच करू शकतात’, असे माझ्या लक्षात आले. या आजाराच्या कालावधीत गुरुदेव सूक्ष्मातून सतत समवेत असल्याची मला अनुभूती घेता आली. ‘मला घडवण्यासाठी विविध साधक आणि संत यांच्या माध्यमातून देव साहाय्य करत आहे’, हे प्रत्येक क्षणी मला अनुभवता आले. त्याबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. प्राची शिंत्रे, पुणे (१९.१२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक