|
रत्नागिरी – येथील मिरकरवाडा बंदरावर अतिक्रमण झाल्यामुळे या बंदराचे विस्तारीकरण आणि मासेमार्यांना देण्यात येणार्या सुविधांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटवण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाला दिले. यानंतर मत्स्य विभागाने यावर अतिक्रमणवर कारवाई चालू केली असून मिरकरवाड्यातील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवला जात आहे. उद्या २८ जानेवारीपर्यंत येथील सर्व अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
मंत्री नितेश राणे यांनी आदेश दिल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाने संबंधित ३१९ अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. प्रशासनाच्या या नोटिसीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर २४ जानेवारीपासून मत्स्य व्यवसाय विभागाने अतिक्रमणे हटवण्यासाठी संबंधितांना आवाहन केले. २५ जानेवारीला त्यातील काही जणांनी ही अनधिकृत बांधकामे स्वत:हून हटवली होती. त्यानंतर मात्र मत्स्य विभागाने ही अतिक्रमणे हटवण्यास २७ जानेवारीच्या पहाटेच प्रारंभ केला. अनुमाने ५०० पोलिसांच्या बंदोबस्तात जेसीबी आणि अन्य साहित्य घेऊन हे अतिक्रमण हटवण्यात येत आहे.

आजच अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात येणार ! – साहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव
या कारवाईविषयी साहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव म्हणाले की, मत्स्यविभागाच्या मिरकरवाडा बंदरातील १०.८३ हेक्टर कार्यक्षेत्रातील कित्येक वर्षे अनधिकृत बांधकामे होती. या बांधकामामुळे मासेमारांसाठी प्रस्तावित असणार्या सुविधा बंदरालगत करायच्या आहेत, त्यात अडचणी येत होत्या. त्या अनुषंगाने शासनाने हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी विभागाला कळवले होते, त्यानुसार २७ जानेवारीला हे अनधिकृत बांधकाम तोडण्याला प्रारंभ केला आहे. जवळपास ३१९ अनधिकृत बांधकामे होती. त्या सर्व अनधिकृत बांधकाम करणार्यांना विभागाकडून नोटीस देण्यात आली होती. शासनाकडून उच्च न्यायालयात याचिकाही प्रविष्ट करण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया चालू असतांना पोलीस विभागाच्या साहाय्याने ही कारवाई करत आहोत. आतापर्यंत ७० टक्के बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे. उर्वरित बांधकाम निष्कासित आजच सायंकाळी पूर्ण करण्यात येणार आहे. उर्वरित साहित्य हलवण्यासारखे जे काम राहील, ते उद्या पूर्ण करण्यात येईल. त्यानंतरच ही कारवाई संपेल.
अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम २८ जानेवारीला पूर्ण होईल ! – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
मत्स्यविभागाच्या विनंतीनुसार मिरकरवाडा येथील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला. त्यासाठी ३ दिवस या भागात आम्ही गस्त घालत होतो. ‘रुटमार्च’ आयोजित केले होते. काही अनधिकृत बांधकामे संबंधिती मालकांनी स्वतःहून काढली आहेत. आज जी कार्यवाही होतेय त्यासाठी मत्स्य विभागाची वेगळी यंत्रणा आहे. या सर्व कामासाठी २५ पोलीस अधिकार्यांसमवेत ५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ही मोहीम संपूर्ण होईपर्यंत पोलीस बंदोबस्त काढण्यात येणार नाही. कुणीही कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणू नये, याची दक्षता घेण्यात आली आहे. ‘ड्रोन कॅमेर्या’च्या माध्यमातूनही लक्ष ठेवण्यात येत आहे. उद्यापर्यंत ही मोहीम पूर्ण होईल आणि हा परिस्वर स्वच्छ होईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.