झारखंड येथील पू. स्वामी क्षमापरानंद सरस्वती यांचे आशीर्वचन !

प्रयागराज, २६ जानेवारी (वार्ता.) – सनातनचे धर्मशिक्षण प्रदर्शन पाहून एक आशा निर्माण झाली आहे. या सुंदर प्रदर्शनाचा सरकार, तसेच मेळा अधिकारी यांनी अधिकाधिक प्रसार करावा. सरकारने या प्रदर्शनाचा प्रसार केल्यास हा कुंभ एक ‘परिवर्तनाचा कुंभ’ होईल. हे प्रदर्शन पुष्कळ चांगले आहे. तुम्ही जे काही धर्मकार्याचे व्रत घेतले आहे, ते यशस्वी होण्यासाठी मनातील ज्योत प्रज्वलित करा, असे उद्गार देवघर (झारखंड) येथील स्वामी क्षमापरानंद सरस्वती यांनी सनातन संस्थेच्या सेक्टर ९ येथील प्रदर्शनकक्षाला भेट दिल्यावर काढले.
पू. स्वामी क्षमापरानंद सरस्वती यांनी पुढे सांगितले की, ‘तुमच्या प्रदर्शनात स्त्री-पुरुष यांनी कसे कपडे घालावेत’, अशा स्वरूपाचे फलक आहेत. आई-बहीण हे त्याप्रमाणेच दिसले पाहिजेत. अभिनेत्रींप्रमाणे त्यांनी कदापि वस्त्र परिधान करू नये. तुमचे कार्य चांगले आहे. ‘सनातन काय आहे ?’ हे प्रत्येक राज्यात जाऊन समजावले पाहिजे. आपल्या पृथ्वीची निर्मिती ही ॐकार तरंगांतून झाली आहे. समुद्राच्या किनार्यावर गेल्यावर काही वेळाने तेथे ॐ कार ध्वनी ऐकू येतो. म्हणजेच प्रत्येक घटक ॐकाराने व्याप्त आहे.