Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभातील गंगानदीच्या पाण्याची प्रतिदिन होत आहे पडताळणी !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज, २५ जानेवारी (वार्ता.) : त्रिवेणी संगमासह गंगानदीच्या घाटांवर आतापर्यंत १० कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. सहस्रो साधू-संत यांनीही स्नान केले आहे. या पाण्यात भाविक फुले, नारळ, दिवे अर्पण करत आहेत. काही निर्माल्यही गंगेत सोडले जात आहे. गंगेत कचरा होऊ नये; म्हणून प्रशासनाकडून वेळच्या वेळी नदीतील पाने, फुले आणि कचरा काढला जात आहे. यासह पाण्याची प्रतिदिन पडताळणीही होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रतिदिन वेगवेगळ्या घाटांकडील पाण्याचे परीक्षण करण्यात येत आहे. गंगेतील कचरा ‘गंगा सेवादूतां’चा चमू वेळच्या वेळी काढत आहे.

रोजच्या रोज नदीपात्रातील कचरा काढला जात आहे

पाणी नेहमी स्नानासाठी योग्य रहाण्यासाठी विविध तंत्रांचा अवलंब करण्यात येत आहे. शौचालयांतील मल भूमीच्या खालच्या थराला टेकू नये म्हणून त्यावर तात्कालीक प्रक्रिया करण्यात येत आहे. यासाठी विविध तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. शौचालये वेळच्या वेळी स्वच्छ करण्यात येत आहेत. नाले, गटारी यांचे पाणी नदीच्या पाण्यात मिसळू नये म्हणून ते तात्पुरते रोखण्यात येत आहे. या पाण्यावर पुन्हा प्रक्रिया करण्यात येत आहे.