पुणे – अभिनेते सैफ अली खान यांच्यावर झालेले आक्रमण पहाता आपल्या आजूबाजूला वावरणारे फेरीवाले बांगलादेशी असू शकतात, हे लक्षात येते. बांगलादेशींचे संकट आपल्या दारापर्यंत पोचले असून नागरिकांनी सतर्क रहावे. संशयितांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असे आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पुणे पोलिसांच्या पश्चिम प्रादेशिक विभागांकडून विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला ३ कोटी ८४ लाख रुपयांचा ऐवज ३०० तक्रारदारांना परत करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
श्री. पाटील म्हणाले की,
१. बांगलादेशी घुसखोरांचा पुणे-मुंबईमध्ये वावर आहे. पुण्यातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या अनुषंगाने शहरातील समस्या वाढत आहेत.
२. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. अशा वेळी नागरिकांना स्वत:चे दायित्व झटकून टाकता येणार नाही. एखादा फेरीवाला किंवा मजूर बांगलादेशी असल्याचा संशय आल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी.
३. घुसखोरांना शोधून त्यांची मायदेशी रवानगी करणे, तसेच घुसखोरी रोखणे, यांसाठी केंद्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
४. पुणे-मुंबईतील घुसखोरांच्या विरोधात कारवाई चालू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.