केरी (गोवा) येथील ‘पॅराग्लायडिंग’ अनधिकृत : प्रशासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे अपघात

प्रतिकात्मक छायाचित्र

(‘पॅराग्लायडिंग’ : ‘पॅराशूट’द्वारे हवेत उड्डाण करण्याचा एक क्रीडा प्रकार)

पेडणे – कायद्याची कार्यवाही करणार्‍या सरकारी यंत्रणांनी केरी येथील अनधिकृत ‘पॅराग्लायडिंग’ क्रीडा प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे १८ जानेवारीला पुणे (महाराष्ट्र) येथील पर्यटक शिवानी दाबळे (वय २६ वर्षे) यांच्यासह ‘ऑपरेटर’ सुमन नेपाळी याचाही मृत्यू होण्याची घटना घडली आहे. पर्यटन खात्यानेही ‘हे ‘पॅराग्लायडिंग’ अवैध होते’, असे म्हटले आहे. केरी पठारावरील हा उपक्रम पर्यटन विभागाच्या अनुमतीविना सार्वजनिकरित्या होत होता. अशा अनधिकृत गोष्टीवर कारवाई करण्यात स्थानिक पोलीस पूर्णत: अपयशी ठरले. या प्रकरणी सध्या ‘पॅराग्लायडिंग’ आस्थापनाचे मालक शेखर रायझादा यांच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे.

स्थानिकांच्या मागण्या आणि पंचायतीचा ठराव यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

येथील स्थानिक ग्रामस्थांनी या पठारावरून होणार्‍या ‘पॅराग्लायडिंग’ला विरोध करतांना आतापर्यंत अनेक तक्रारी संबंधित प्रशासनाकडे केल्या होत्या. त्याचप्रमाणे केरी पंचायतीनेही काही महिन्यांपूर्वी केरी पठारावरून ‘पॅराग्लायडिंग’ करण्यास मनाई करणारा ठराव पारित केला होता. दोघांच्याही मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. हा धोकादायक प्रकार आता बंद करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अशा घटनेचा राज्याच्या पर्यटन उद्योगावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

संपादकीय भूमिका

पोलिसांना हे अनधिकृत जीवघेणे प्रकार दिसत नाहीत कि त्यांचे हे प्रकार करणार्‍यांशी आर्थिक हितसंबंध होते ?