
‘काँग्रेस ही भाजप, रा.स्व. संघ आणि भारतीय संघराज्य यांच्या विरोधात लढत आहे’, असे विधान राहुल गांधी यांनी देहलीत काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाच्या उद़्घाटनाच्या कार्यक्रमाच्या वेळी केले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य सरकारे, म्हणजेच पर्यायाने भारतियांनी लोकशाही पद्धतीने निवडून संसदेत पाठवलेले नेते आदी म्हणजे संघराज्य ! संसदेचे विरोधी पक्षनेते असलेले गांधी यांनी केलेल्या वक्तव्याने संसदेतील स्वतःच्या अस्तित्वावरही घाला घातला आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेली आजच्या काँग्रेस पक्षाची आणि भारतियांना अंधारात ठेवून केलेली सर्व देशविरोधी, भारतद्वेषी आणि लोकशाहीविरोधी वाटचाल संपूर्णतः स्वतःच उघड केली आहे. काँग्रेस आता भारताच्या अस्तित्वाला विरोध करणारे तिचे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) स्पष्ट करत आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी देशाची सर्वोच्च संस्था असलेल्या संसदेतील विरोधी पक्ष म्हणून स्वतःच्या भारतविरोधी भूमिकेचा भयानक नमुना दाखवला असून स्वतःचा देशद्रोहीपणा उघड केला आहे. काँग्रेस आता भारताशी लढणार्या विविध शक्तींच्या गटात सामील झाली आहे, ज्यामध्ये माओवाद्यांपासून इस्लामी आणि शत्रुत्ववादी परदेशी शक्ती यांचा समावेश आहे. निवडणुकांमध्ये जनतेने काँग्रेसला वारंवार नाकारले, हे पचवू न शकलेल्या राहुल यांनी त्यांचा ‘भारतविरोधी’ चेहरा आणि ‘जॉर्ज सोरोस पुरस्कृत डीप स्टेट’, तसेच ‘नक्षली’ मनोवृत्ती स्वतःहून समोर आणली आहे. हे एका अर्थाने बरेच झाले ! राहुल गांधी यांनी त्यांची लढाई भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय संघराज्य यांच्या विरोधात असल्याचे अन् भाजपने भारतातील प्रत्येक सरकारी-असरकारी संस्था कह्यात घेतली असल्याचे म्हटले. देशात २१ मास आणीबाणी लादून भारताला स्वतःला हवे तसे वाकवणार्या इंदिरा गांधी यांच्या ‘गांधी’ नसलेल्या नातवाचे वक्तव्य आणि मुख्य हेतू निराळा नाही, हे अनेक देशभक्तांनी अनेकदा समोर आणले; पण आज स्वतः राहुल तेच बरळले, हे बरेच झाले.
‘जनसंघाने भारतीय लोकशाहीच्या विरोधात संपूर्ण क्रांतीचा उद़्घोष केला होता’, असे सांगून राहुल गांधी यांची पाठराखण करणारे काँग्रेसी इंदिरा गांधी यांनी भारतावर लादलेली आणीबाणी आणि त्या काळात भारतातील सर्व शासकीय संस्थांचा भारतियांच्या विरोधात केलेला वापर ते विसरले आहेत. राहुल गांधी यांचे नेहमीप्रमाणे ‘बालीश’ विधान म्हणून दुर्लक्ष करण्यासारखे निश्चितच नाही. ‘श्रीराममंदिराच्या स्थापनेनंतर भारताला खरे स्वातंत्र्य लाभले’, या प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या विधानावर राहुल यांनी ही गरळ ओकली. संसदेच्या विरोधी पक्ष नेत्याचे हे विधान भारताला तोडण्याचे थेट आव्हान आणि काँग्रेसींना कार्यवाही दिशा देणारे असल्याने त्याचा केवळ विरोध अपेक्षित नसून राहुल यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यासारखे आहे.
काँग्रेसने लोकशाही अस्थिर करण्यासाठी आणि देशात अराजकता पसरवण्यासाठी निवडणुकांच्या वैधतेवर वारंवार आरोप केले आहेत. त्यांनी न्यायव्यवस्था आणि भारताची सुरक्षायंत्रणा यांच्या विश्वासार्हतेवर नेहमीच आक्रमण केले. या वेळी तर त्यांनी थेट भारतीय संघराज्याचे समर्थन करणार्या संस्थांनाच लक्ष्य केले. विरोधी पक्ष म्हणून सरकारी पक्षाच्या कामकाजावर केली जाणारी टीका, राजकीय, सामाजिक मतभेद आदी लोकशाही सूत्रांनुसार कृती अथवा विचार प्रकट करणे आणि राष्ट्रविरोधी प्रचार करणे यांच्यातील अस्पष्ट रेषा राहुल गांधींनी स्पष्ट केली. देश नक्षलवादाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतांना नक्षलवादाच्या ‘अजेंड्या’वर पाऊल टाकत ‘देशाला पुन्हा एकदा नक्षलवादाच्या भोवर्यात अडकवण्याचा प्रयत्न करणारा विरोधी पक्षनेता देशाला नको आहे’, हे भारतियांनी ठणकावून सांगायला हवे. राहुल गांधी यांचे वक्तव्य इस्लामी आतंकवाद्यांच्या गटांच्या हेतूशीही साम्य दर्शवणारे आहे, हेही तितकेच गंभीर ! ‘भारतीय राज्याच्या प्रत्येक शाखा काफीर मुसलमानेतरांच्या नियंत्रणाखाली असल्याने आतंकवाद आणि हिंसाचार यांचा वापर करणे न्याय्य आहे’, या आतंकवादी मानसिकतेची ‘री’ ओढली आहे. राहुल गांधी यांनी भारतविरोधी वक्तव्ये सातत्याने विदेशातील अनेक मंचांवर केलेली आहेत, ज्यात त्यांची लोकशाही व्यवस्था, न्यायव्यवस्था यांविषयीची विधाने आहेत.
एकनिष्ठ भारतियांनी हे करावे !
भारतविरोधी प्रचार काँग्रेस समर्थित साम्यवादी विचारसरणीचा मुख्य भाग होता, जो आता काँग्रेसने मुख्य प्रवाहात आणला आहे. शतकानुशतकांच्या संघर्षानंतर भारतीय त्यांचे स्वतःचे सार्वभौम राज्य निर्माण करू शकले आहेत, जे बाह्य आक्रमणे आणि अंतर्गत अराजकता या दोन्हींपासून लोकांना वाचवत हिंदूंनी टिकवून ठेवलेले आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी भारतविरोधी शक्तींच्या तालावर नाचत आहेत. राहुल गांधी यांच्या विधानाचा विपर्यासही करता येणार नाही, इतके ते स्पष्ट आहे. सरसंघचालकांच्या विधानाला विरोध म्हणून हे विधान करतांना राहुल यांनी भारतीय संस्कृती आणि श्रद्धा यांच्याविषयीचा तिरस्कार उघड केला. भारत हा केवळ एक देश किंवा राज्यांचा संघ नाही, तर एक संस्कृती आहे. ‘भारतीय संस्कृती’ ही कधी तरी उदयास आलेली नसून ती प्राचीन आहे. भारतीय संघराज्यावर काँग्रेसने केलेले हे आक्रमण स्वाभाविकपणे हिंदु संस्कृतीवर केले आहे. अयोध्येतील श्रीराममंदिराच्या स्थापनेनंतर काँग्रेसने राजकीय विवेक गमावला आहे. शतकानुशतके भारताला कह्यात घेण्यात अयशस्वी ठरलेल्या असंख्य आक्रमकांप्रमाणे राहुल गांधी आणि काँग्रेस यांचेही प्रयत्न तितकेच निष्फळ ठरतील. या परिस्थितीत भारतियांना हे ठरवायचे आहे की, ते देशासमवेत आहेत कि राहुल गांधी यांच्यासमवेत ?
नुकतेच ‘हिंडेनबर्ग’ हे आस्थापन बंद केल्याची घोषणा तिच्या संस्थापकांनी केली. याच हिंडेनबर्गच्या अहवालांचा काँग्रेसने सातत्याने आधार घेत भारत सरकार, संस्था, उद्योग यांना लक्ष्य केले. ‘अमेरिकेत डॉनल्ड ट्रम्प यांचे शासन येण्यापूर्वीच ‘हिंडेनबर्ग’ने स्वतःवरील कारवाई टाळण्यासाठी गाशा गुंडाळला’, असे म्हणता येईल. आता राहुल गांधींना कुणाचा आधार उरलेला नसल्याने त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडून भारतियांना योग्य निर्णय घेण्याची संधीच दिली आहे. भारताचे एकनिष्ठ नागरिक म्हणून भारतियांनी राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी एकमुखाने केली पाहिजे आणि भारतीय संघराज्याचा आधार असलेल्या न्यायसंस्थांनी संसदेच्या विरोधी पक्षनेत्याच्या या विधानाची स्वतःहून नोंद घेत त्यांच्यावर कारवाई करून भारतीय संघराज्याच्या संस्थांचे असलेले कर्तव्य पार पाडले पाहिजे !
देशाचे एकनिष्ठ नागरिक म्हणून भारतियांनी राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी केली पाहिजे ! |