पंचगंगा नदीजवळ असलेले महादेवाचे मंदिर एका रात्रीत गायब झाल्याची चौकशी करा ! – सुशील भांदिगरे

पोलीस निरीक्षक श्रीराम कणेकर यांना निवेदन देतांना सुशील भांदिगरे (डावीकडे), तसेच अन्य

कोल्हापूर, १२ जानेवारी (वार्ता.) – शहरतील जुना बुधवार पेठेतील पंचगंगा नदीजवळ खर्डेकरांची पेरूची बाग आहे. येथे मोठ्या पादुका, तसेच महादेवाची पिंड असलेले मंदिर होते. हे मंदिर अचानक येथून गायब झाले आहे. या संदर्भात महापालिकेशी पत्रव्यवहार केला असता महापालिकेने ‘याविषयी माहिती नाही’, असे उत्तर दिले. ‘हे मंदिर गायब करणार्‍यांची चौकशी करून गुन्हा नोंद करावा’, या मागणीचे निवेदन अन्याय निवारण समितीचे सुशील भांदिगरे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्रीराम कणेकर यांना दिले. हेच निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच कोल्हापूर पुरातत्व विभाग यांना प्रत्यक्ष, तर मुंबई येथील भारतीय पुरातत्व विभाग यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आले आहे.

पंचगंगा नदीजवळ पूर्वी असलेले महादेवाचे मंदिर
मंदिराच्या जागेवर आता असलेले भग्नावशेष

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ६ महिन्यांत हे मंदिर गायब झाले असून याचा अवशेषही शिल्लक ठेवण्यात आलेला नाही. या घटनेमुळे असंख्य हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा प्रकारे जर पुरातन मंदिरे गायब झाली, तर कोल्हापूरचा इतिहासच समाप्त होईल. तरी या प्रकरणी सखोल अन्वेषण व्हावे आणि तात्काळ गुन्हा नोंद होऊन कारवाई व्हावी. या वेळी अनिल पाटील, धीरज रुकडे, शशिकांत हळदकर, रणजित शिंदे, विजय नाईक, विराज पाटील यांसह अन्य उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

इस्लामी पाकिस्तान आणि बांगलादेश येथेही मंदिरे गायब होतात अन् आता तीच गत भारतात होत असल्याचे दिसत आहे. हे हिंदूंसाठी लज्जास्पद !