Digital Arrest Scam Mastermind : डिजिटल अरेस्ट’ प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक

अटक करण्यात आलेला आरोपी

कोलकाता (बंगाल) – कोलकाता पोलिसांनी ‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळ्यातील मुख्य आरोपीच्या बेंगळुरू येथून अटक केली. चिराग कपूर असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात ९३० प्रकरणे असून त्याने कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचे निष्पन्न झाले आहे. कोलकाता येथील रहिवासी देबश्री दत्ता यांच्या नावाचा गैरवापर करून एक पार्सल पाठवले गेले. त्यात अमली पदार्थ आढळल्याचा बनाव एका कथित अधिकार्‍याने व्हिडिओ कॉलद्वारे केला होता. कायदेशीर कारवाईची धमकी देऊन घोटाळेबाजांनी दत्ता यांची ४७ लाख रुपयांंची फसवणूक केली. या प्रकरणाचे अन्वेषण करतांना पोलिसांनी कपूर याला अटक केली. त्याच्यासहित अन्य १० जणांनाही अटक केली.

चिराग कपूर ‘चिंतक राज’ या नावाने बेंगळुरूच्या जे.पी. नगर भागात रहात होता. स्वतःला सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणवणारा कपूर मागच्या ७ महिन्यांपासून ही टोळी चालवत होता. धाड टाकलेल्या घरातून काही उपकरणे जप्त करण्यात आली असून त्याची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे.

‘डिजिटल अरेस्ट’ म्हणजे काय ?

गुन्हेगारांची टोळी पीडितांना पोलीस, अमंलबजावणी संचालनालय (ईडी), सीबीआय, आयकर विभाग, सैन्याधिकारी असल्याची बतावणी करतात. देशविघातक कृत्ये, बेकायदेशीर वस्तू, अमली पदार्थ, बनावट पारपत्र, आतंकवाद्यांशी आर्थिक व्यवहार केल्याचे सांगून ‘डिजिटल अरेस्ट’ (ऑनलाईन अटक) केल्याचे सांगतात. यात पीडित व्यक्तीला २४ घंट्यांपर्यंत त्याच्याच घरात व्हिडिओ कॉलवर बंदिस्त रहायला सांगितले जाते. सायबर गुन्हेगार व्हिडिओ कॉलवर कुठल्या तरी पोलीस ठाणे किंवा सीबीआय यांसारख्या यंत्रणांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवतात. त्यामुळे पीडित व्यक्तीचा विश्‍वास बसतो. पीडित व्यक्ती खरेच तिला ‘डिजिटल अरेस्ट’ झाल्याचे मानू लागते. सायबर गुन्हेगार त्यांच्याकडे खंडणीची मागणी करतो. पैसे न दिल्यास प्रत्यक्षात अटक करण्याची भीती दाखवतो. त्यामुळे अनेक जण याला बळी पडतात आणि पैसे देऊन सुटका करून घेतात.