‘माझिया मराठीचे नगरी’ मराठीतील परकीय शब्‍दांमुळे झालेले दुष्‍परिणाम !

मराठी भाषेला अभिजात (समृद्ध) भाषेचा दर्जा मिळाल्‍याच्‍या निमित्ताने सद्यःस्‍थितीत तिचे संवर्धन व्‍हावे, या दृष्‍टीकोनातून मराठी भाषेवरील विविध प्रकारचे आघात, त्‍यांच्‍यामुळे झालेले परिणाम अन् उपाययोजना या मालिकेतून आपण पहात आहोत. यामध्‍ये ‘मराठी भाषेत झालेला परकीय शब्‍दांचा भरमसाठ वापर’ याविषयीची काही सूत्रे मागील भागात पाहिली. आज त्‍याच्‍या पुढील भाग पाहू.

आजकाल बहुतांश भारतीय इंग्रजीमिश्रित त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या भाषा बोलतात; जणू इंग्रजी शब्‍द भारतीय भाषांचा किंवा मराठी भाषेचा इतका अविभाज्‍य घटक झाले आहेत. बहुतेकांना वाटते की, इंग्रजी शब्‍द जो अर्थ प्रवाहित करतो, त्‍याला मराठीत दुसरा शब्‍द नाही किंवा त्‍याच्‍या वापराविना त्‍यांना त्‍यांचे म्‍हणणे मांडता येणार नाही. प्रत्‍यक्षात अनेक भारतीय भाषा, तसेच मराठी भाषा ही संस्‍कृतोद़्‍भव भाषा असल्‍याने अनेक भारतीय भाषांत, तसेच मराठीत इंग्रजीसाठी अनेक प्रतिशब्‍द आहेत किंवा निर्माण केले जाऊ शकतात. ‘एका शब्‍दाचे विविध अर्थ प्रवाहित करणारे अनेक प्रतिशब्‍द असणे’, हे मुळात संस्‍कृतचे वैशिष्‍ट्यच आहे. उलट कित्‍येक मराठी शब्‍द असे आहेत, ज्‍यांना मिळताजुळता शब्‍द इंग्रजीत मिळणे काहीसे अवघड होऊ शकते.

१. इंग्रजी शब्‍द पूर्णतः अंगिकारले आणि त्‍याचे मराठीकरण केले !

काही परकीय शब्‍द इतके घट्ट रुळले आहेत की, ते इंग्रजी आहेत, असे वाटतच नाही; उदा. ‘चप्‍पल’ हा शब्‍द इंग्रजी आहे’, हे किती जणांना ठाऊक आहे ? अगदी सुप्रसिद्ध कोल्‍हापुरी चप्‍पलही त्‍यात आली. ‘चपला’ हे मराठी अनेकवचन मराठीजनांनी केले आणि ‘वाहणा’ किंवा ‘पादत्राणे’ हे शब्‍द आता जणू लुप्‍त झाले.

सौ. रूपाली वर्तक

२. मालिका, विज्ञापने आणि चित्रपट यांतील सरमिसळ भाषेचा मोठा दुष्‍परिणाम !

प्रामुख्‍याने मराठी आणि हिंदी मालिकांमधील संवादाचा मराठी भाषिकांवर प्रचंड दुष्‍प्रभाव झाला आहे. एका सुप्रसिद्ध हिंदी मालिकेतील पात्रे ‘अ‍ॅक्चुअली’ हा इंग्रजी शब्‍द अगदी खटकेल एवढे वेळा वारंवार म्‍हणत असत. अलीकडच्‍या काळात भारतीय किंवा मराठी माणसे संवाद साधतांना अनेकदा हा शब्‍द वापरतात. ‘अ‍ॅक्चुअली’ या शब्‍दाच्‍या ऐवजी ‘खरेतर’, ‘खरोखर’, ‘खरेच’, ‘अगदी’, ‘नक्‍कीच’, ‘वास्‍तविक’, ‘होय’, ‘हो ना’, ‘मग काय’ आदी अनेक विविध भावछटा प्रदर्शित करणारे शब्‍द मराठीत आहेत; परंतु या सार्‍यांसाठी हा एकच शब्‍द वापरला जातो.

३. परकीय शब्‍दांचे आक्रमण केवळ भाषेवर नव्‍हे, तर संस्‍कृतीवर !

अ. इंग्रजी चित्रपट पाहूनही इंग्रजी भाषाशैलीचा परिणाम मराठी भाषिकांवर झाला आहे. इंग्रजीत एखाद्याचा परिचय करून घेतांना ‘हॅलो’ म्‍हणतात, तसेच ‘एखाद्याला बोलावण्‍यासाठी’, ‘हाक मारण्‍यासाठी’ किंवा एखाद्याला ‘एखाद्या गोष्‍टीची जाणीव करून देतांना’ही ‘हॅलो’ शब्‍द वापरतात. त्‍याच धर्तीवर इंग्रजाळलेले मराठी भाषिक किंवा भारतीय ‘हॅलो’ हा शब्‍द वापरतात. यामध्‍ये कुठेतरी समोरच्‍या व्‍यक्‍तीविषयीची आदरभावना न्‍यून झालेली असते किंवा तुच्‍छता वाढलेली असते. ‘भाषेच्‍या अंगिकाराने आपण संस्‍कृती किंवा वृत्ती कशी अंगिकारतो ?’, याचे हे एक उत्तम उदाहरण म्‍हणावे लागेल. आपल्‍या संस्‍कृतीत समोरच्‍याशी आदराने बोलण्‍याची पद्धत आहे. ‘अरे तुरे’ची भाषाशैली ही इंग्रजी आहे.

आ. इंग्रजीत लहान-मोठ्या सर्वांनाच ‘यू’ (‘तू’, ‘तुम्‍ही’) हे सर्वनाम आहे. मराठीत तसे नाही. सर्वांनाच एकेरी संबोधणे, हे भारतीय संस्‍कृतीत बसत नाही. थोरा-मोठ्यांविषयी एकेरी उल्लेख केल्‍याने त्‍यांच्‍याविषयीचा आदरभावही आपसूक न्‍यून होतो.

इ. ‘त्‍या बाई’ऐवजी ‘ती मॅम’ असे झाल्‍यावर शिक्षिकेकडे पहाण्‍याचा दृष्‍टीकोन पालटू शकतो.

उ. कित्‍येक मराठी कुटुंबांत आई-वडील ‘मम्‍मी-पप्‍पा’ आणि ताई ‘दिदी’ झाली आहे. ‘आई’चा पदर ‘मम्‍मी’ला नाही आणि ‘बाबां’ची सर ‘पप्‍पा अन् डॅडीं’ना नाही.

ऊ. मुले आणि युवा यांच्‍यामध्‍ये भावना व्‍यक्‍त करण्‍यासाठी ‘वाऽऊ’ (पुष्‍कळ छान), ‘दॅट्‍स इट’ (कृतीचा झाल्‍याचा आनंद व्‍यक्‍त करणारा इंग्रजी भाषेतील शब्‍दप्रयोग), ‘डन’ (झाले, करतो), ‘येऽस’ (सकारात्‍मक किंवा होकारात्‍मक भावना आणि आनंद व्‍यक्‍त करणारा इंग्रजी भाषेतील शब्‍दप्रयोग) या शब्‍दांना पर्याय नाही कि काय ? असे वातावरण निर्माण झाले आहे.

ए. ‘पूल’ हे अलीकडच्‍या काळात बांधले गेले; परंतु तो शब्‍द मराठीच असल्‍यासारखा प्रचलित झाला आहे. ‘सेतू’ शब्‍द हा इतिहासकालीन किंवा पुराणकालीनच उल्लेखापुरता मर्यादित राहिला.

४. आधुनिकतेच्‍या भ्रामक कल्‍पनांमुळे इंग्रजीचा वापर

‘हाय’ आणि ‘बाय’ला मराठीत ‘नमस्‍कार’, ‘रामराम’, ‘हरि ॐ’, ‘जय श्रीराम’ असे अतिशय सर्वांगसुंदर पर्याय असतांना ते वापरणे, म्‍हणजे काहीतरी प्रतिगामी असणे किंवा कालसुसंगत आधुनिक नसणे, असा सर्वसाधारण समज झाला आहे. ‘मॅडम’ आणि ‘सर’ हे इतके सर्वसामान्‍य आहे की, कुणी ‘बाई’ किंवा ‘ताई’ अथवा ‘गुरुजी’ किंवा ‘काका’ म्‍हटले, तर त्‍याची थट्टा केली जाते. त्‍यामुळे काही दशकांपूर्वी मराठीत ‘बाई’ हे आदराने संबोधले जाणारे विशेषण आता काळाच्‍या पडद्याआड गेले आहे.

५. परकीय शब्‍दांच्‍या वापराने संवेदनशीलता जाऊन कृत्रिमता येणे

शिष्‍टाचार पाळण्‍यासाठी सर्रास वापरल्‍या जाणार्‍या ‘सॉरी’ (क्षमस्‍व) आणि ‘थँक्‍यू’ (धन्‍यवाद) आणि ‘एक्‍सक्‍युज मी’ (क्षमा करा) या शब्‍दांच्‍या अतिरेकी वापरामुळे त्‍यांतील क्षमायाचनेची किंवा कृतज्ञतेची भावना नष्‍ट होऊन त्‍यात केवळ कृत्रिमता आली आहे.

६. अर्थानुरूप मराठी शब्‍द !

‘बेडशीट’ला ‘पलंगपोस’ असा असणारा मराठी शब्‍द काळाच्‍या पडद्याआड जात चालला आहे. मूळ फारशी भाषेतील ‘चद्दर’ शब्‍दावरून ‘चादर’ शब्‍द झाला असावा; परंतु पांघरायचे ते ‘पांघरूण’ आणि अंथरायचे ते ‘अंथरूण’ हे मराठी शब्‍द किती सयुक्‍तिक आहेत, हे लक्षात येईल. यावरून मराठी शब्‍दांची अर्थानुरूप सहजसुलभताही प्रतीत होते, तसेच ‘लिहिणारी ती लेखणी’, असा सुंदर शब्‍द असतांना ‘पेन’ शब्‍द हवा कशाला ?’, असे आपल्‍याला वाटत नाही.

परकीय शब्‍द नाकारणे म्‍हणजे संकुचितता नव्‍हे !

जिथे परकीय शब्‍दाला प्रतिशब्‍द उपलब्‍धच नाही, तिथे इंग्रजी शब्‍द वापरणे, हे एकवेळ समजू शकतो; जसे ‘मिनिट’, ‘तिकीट’ इत्‍यादी. भारतीय भाषांसह मराठीने ‘बस’, ‘रेल्‍वे’, ‘रिक्‍शा’, ‘ट्रक’, ‘टेम्‍पो’ हे अगदी सहजतेने अंगिकारले. आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित शब्‍द स्‍वीकारण्‍यास त्‍यांनी कधीच खळखळ केली नाही; परंतु जिथे मराठी किंवा अन्‍य भारतीय भाषांतील प्रतिशब्‍द अस्‍तित्‍वात आहेत, तिथे आवर्जून स्‍वभाषेतील शब्‍दांचा वापर झाला पाहिजे. परकीय शब्‍द नाकारणे म्‍हणजे संकुचितता नव्‍हे. – सौ. रूपाली वर्तक

७. परकीय शब्‍दांंच्‍या संदर्भातील अपसमज

परकीय शब्‍दांच्‍या संदर्भातील अपसमज दूर केले गेले पाहिजेत. ‘परकीय शब्‍दांनी भाषा समृद्ध होते’, असा एक मोठा (अप)समज शासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आहे. कदाचित तो पसरवला गेलेलाही असू शकतो. हा एक प्रकारचा खोटा समज किंवा अपसमज (‘नॅरेटिव्‍ह’प्रमाणे) आहे. या समजामुळे परकीय शब्‍दांच्‍या वापरासाठी होणार्‍या कट्टर विरोधाची धार अल्‍प होते आणि परकीय शब्‍दांना केवळ आपण नाईलाज म्‍हणून स्‍वीकारत नाही, तर कुरवाळत रहातो. एकदा का कुठल्‍याही गोष्‍टीची कट्टरता अल्‍प झाली की, तिच्‍यात अन्‍य गोष्‍टी शिरण्‍यास वाव मिळतो आणि त्‍यावर बंधने घातली गेली नाहीत, तर आज ‘इंग्रजीमिश्रित मराठी’ अशी जी एक तथाकथित आधुनिक भाषा सिद्ध झाली आहे, तशी ती होते. म्‍हणूनच स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्‍हटले होते, ‘बाटग्‍या अतिरेकापेक्षा सोवळा अतिरेक बरा’, हे किती सार्थ होते, हे आता कालौघात लक्षात येते. त्‍यांनी निर्माण केलेले मराठी प्रतिशब्‍द काहींना पुष्‍कळ अवघड वाटल्‍याने त्‍यांच्‍यावर टीका झाली होती. स्‍वातंत्र्यवीर सावरकर एकदा ‘हंस पिक्चर्स’ या चित्रपटनिर्मिती करणार्‍या संस्‍थेत भेट देण्‍यासाठी गेले, तिथे चित्रपटाची निर्मिती होत असतांना वापरले जाणारे इंग्रजी शब्‍द पाहून ते व्‍यथित झाले. त्‍यांनी चित्रपटनिर्मितीच्‍या तंत्रज्ञानाशी संबंधित मराठी शब्‍दनिर्मिती केली. आज मराठी चित्रपटसृष्‍टीत ते शब्‍द सहज रुळले आहेत. ही खरी भाषावृद्धी आणि भाषासमृद्धी आहे !

(क्रमशः पुढच्‍या शनिवारी)

– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.१.२०२५)

परकीय शब्‍दांच्‍या वापराने भाषा संकुचित होईल !


१. सध्‍या तरुण मुले एखादा तरुण किंवा तरुणी सुंदर आहे, हे सांगण्‍यासाठी ‘किलिंग’ (‘घायाळ करणारा/री’) हा शब्‍द सर्रास वापरतात. मराठीत मुलांसाठी ‘सुंदर’, ‘राजपुत्रासारखा’, ‘राजबिंडा’, ‘देखणा’, ‘सुस्‍वरूप’, ‘तेजस्‍वी’, ‘रूपवान’, तर मुलींसाठी ‘सुंदर’, ‘बावनखणी’, ‘आरसपानी’, ‘लावण्‍यवती’, ‘देखणी’ यांसारखे शब्‍द आहेत, तसेच ‘सात्त्विक’, ‘मोहक’ अशीही काही अन्‍य विशेषणे आहेत. असे अनेक शब्‍द सौंदर्याचे वर्णन करण्‍यासाठी असतांना प्रत्‍येक वेळी ‘किलिंग’ शब्‍द कशासाठी ?

सुश्री सुप्रिया नवरंगे

२. सध्‍या तरुणांकडून एखादा पदार्थ, पोषाख, स्‍वभाव या सार्‍यांसाठीच ‘ऑसम’  असा शब्‍दप्रयोग केला जातो; उदा. ‘हा पिझ्‍झा किती ‘ऑसम’ आहे !’. ‘ऑसम’ या शब्‍दाचे ‘प्रभावी’, ‘छान’, ‘अप्रतिम’, ‘प्रशंसाकारक’, ‘विस्‍मयकारक’, ‘महान’, ‘अद़्‍भुत’, असे अनेक अर्थ आहेत. पोषाख, स्‍वभाव आणि पदार्थ आदी अनेक गोष्‍टींसाठी हा एकच शब्‍द विशेषण म्‍हणून वापरला, तर ‘नेमका कुठल्‍या अर्थाने वापरकर्त्‍याने त्‍या शब्‍दाचा वापर केला आहे ?’, हे कदाचित कळू शकणार नाही. पदार्थ ‘रुचकर’, ‘स्‍वादिष्‍ट’, ‘चविष्‍ट’ असू शकतो. पोषाख ‘आकर्षक’, ‘अप्रतिम’, ‘सुंदर’ असू शकतो आणि स्‍वभाव ‘चांगला’ किंवा ‘वाईट’ असू शकतो. स्‍वभावात ‘षड्‍रिपू’ही येतात. त्‍यामुळे तो रागीट, शांत इत्‍यादी प्रकारचाही असू शकतो; पण सर्वच गोष्‍टींना सरसकट ‘ऑसम’ म्‍हटले, तर जो तो त्‍याला हवा तो अर्थ घेईल, तसेच त्‍यातून मोठा भाषिक गोंधळही निर्माण होईल.

३. मी ‘फ्रजायल’ (थंड) झालो आहे’, असे अलीकडे तरुणांमध्‍ये म्‍हटले जाते. मन ‘सुन्‍न’ होते आणि बुद्धी ‘कुंठीत’ होते. ‘काही सुचेनासे झाले आहे’, असेही म्‍हटले जाते. या सर्वांना एकच ‘फ्रजायल’ विशषेण कसे चालेल ? आपल्‍याकडे सगळे एकातच गुंडाळले न जाता प्रत्‍येकाला समर्पक विशेषणे आहेत.

४. ‘धिस इज रिडिक्‍युलस’ (‘हे हास्‍यास्‍पद आहे’), हा वाक्‍यप्रयोग अनेक अर्थांनी वापरला जातो. मग ते ‘हास्‍यास्‍पद’ असू दे, ‘कंटाळवाणे’ असू दे, ‘राग येणारे’ असू दे, नाही तर ‘निराशाजनक’ असू दे. या वेगवेगळ्‍या भावना आहेत. त्‍या सर्वांसाठी हा एकच शब्‍दप्रयोग केला, तर समजणार्‍यांनी काय समजावे ?

५.  ‘परकीय शब्‍दांनी भाषा समृद्ध होते’, असे काहींना वाटते; परंतु परकीय शब्‍द वरील प्रकारे अयोग्‍य पद्धतीने वापरले गेल्‍याने भाषा समृद्ध होत नसून उलट तिचा संकोच होत आहे. अर्थाच्‍या विविध छटा दर्शवणार्‍या स्‍वभाषेतील वेगवेगळ्‍या शब्‍दांऐवजी एकच आणि तोही परकीय शब्‍द वापरण्‍याची सवय समाजाला लागत आहे.

६. अशा प्रकारे परकीय शब्‍दांचा केलेला वापर हा काही वेळा हास्‍यास्‍पदही ठरू शकतो. एवढेच नव्‍हे, तर त्‍यातून हुशारी प्रगट होण्‍याऐवजी अज्ञानाचेच केविलवाणे प्रदर्शन होऊ शकते !

– सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.