सनबर्न महोत्सवात अमली पदार्थ सेवन केलेल्या ५ जणांना अटक

धारगळ (गोवा), ३१ डिसेंबर (वार्ता.) – धारगळ येथील सनबर्न महोत्सवामध्ये अमली पदार्थ सेवन करून नाचणार्‍या ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी घातक अमली पदार्थांचे सेवन केल्याचे चाचणीतून सिद्ध झाले आहे. या विषयी अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक टिकम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थ सेवन केल्याच्या संशयावरून या ५ जणांना कह्यात घेऊन त्यांची चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये पाचही जणांनी अमली पदार्थ घेतल्याचे सिद्ध झाले. ५ जणांपैकी एकाने कोकेन हा घातक अमली पदार्थ, तर इतरांनी गांजा आणि इतर काही पदार्थ सेवन केले होते, असे आढळून आले. तात्काळ चाचणी संचाद्वारे त्यांची चाचणी करण्यात आली, तसेच मूत्राचे नुमनेही घेण्यात आले. सनबर्नमध्ये अमली पदार्थांचा वापर केला जाऊ नये, यासाठी अमली पदार्थ विरोधी पथक तिथे कार्यरत होते. टेक्सास (अमेरिका), भाग्यनगर, चेन्नई, मध्यप्रदेश येथील नागरिक आणि स्थानिक कुंकळ्ळी येथील नागरिक यांनी अमली पदार्थ सेवन केले होते.

संपादकीय भूमिका 

  • सनबर्न महोत्सवात अमली पदार्थांचे सेवन होते, हे अख्ख्या जगाला ठाऊक आहे, तरी अशा महोत्सवाला अनुमती का दिली जाते ?
  • अमली पदार्थ विरोधी पथकाने केवळ संशयावरून कह्यात घेतलेल्या सर्व ५ जणांनी अमली पदार्थ सेवन केल्याचे आढळले आहे, तर या महोत्सवात सहभागी सर्वांचीच चाचणी केल्यास किती जणांनी अमली पदार्थ सेवन केले असेल, याची कल्पना येते !