भारत सरकार प्रिया हिची सुटका होण्यासाठी शक्य ते सर्व साहाय्य करणार !
सना (येमेन) – येमेनचे अध्यक्ष रशाद महंमद अल-अलिमी यांनी केरळमधील एका परिचारिकेला पतीची हत्या केल्याच्या प्रकरणी देण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला संमती दिली आहे. त्यानंतर भारत सरकार निमिषा प्रिया हिला या प्रकरणात सुटका होण्यासाठी शक्य ते सर्व साहाय्य करणार असल्याचे नुकतेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.
निमिषा प्रिया हिला वर्ष २०१७ मध्ये तलाल अब्दो महदी याच्या हत्येच्या प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रियाला तो शिवीगाळ करायचा आणि तिचा छळ करायचा. महदी याने तिच्यावर केलेल्या छळाचा सूड घेण्यासाठी तिने हत्या केल्याचे सांगितले जाते. प्रियाने त्याच्या कह्यात असलेले स्वत:चे पारपत्र (पासपोर्ट) परत घेण्यासाठी त्याला गुंगीचे औषध दिले होते.
येमेनच्या अध्यक्षांनी संमती दिल्यानंतर आता एका महिन्याच्या आत मृत्यूदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाऊ शकते. भारतीय दूतावासाने निमिषा प्रियाच्या वतीने लढण्यासाठी एका अधिवक्त्याची नेमणूक केली होती. तिच्या पतीच्या कुटुंबाला किती रक्कम दिली गेली पाहिजे, याच्या वाटाघाटी करण्यासाठी प्रियाची आई येमेनला गेली आहे.