गोव्यात रेव्ह पार्ट्यांसाठी आणला जाणारा २ कोटी रुपयांचा अमली पदार्थ देहली येथे कह्यात

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, २९ डिसेंबर (वार्ता.) – ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ गोव्यात होणार्‍या रेव्ह पार्ट्यांसाठी आणले जाणारे २ कोटी रुपये किमतीचे ‘मलाना क्रिम’ (चरस) हा अमली पदार्थ पोलिसांनी देहली येथे कह्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी देहली आणि हिमाचल प्रदेश येथून गोव्यात वास्तव्यास असलेल्या २ पोर्तुगीज नागरिकांसह एकूण ३ जणांना कह्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या अन्वेषणानुसार हे संशयित विदेशी नागरिक गोव्यात भेट देणार्‍या इतर विदेशी नागरिकांना अमली पदार्थ विक्री करत होते आणि हे अमली पदार्थ पुढे गोव्यातील रेव्ह पार्ट्यांमध्ये विकले जात होते.

१२ डिसेंबर या दिवशी संशयित गोपाळ चव्हाण हा ‘मलाना क्रिम’ हा अमली पदार्थ घेऊन हिमाचल प्रदेशमधून देहली येथे येत होता. हा अमली पदार्थ पुढे गोव्यात पाठवायचा होता. याविषयी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून गोपाळ चव्हाण याला कह्यात घेऊन त्याच्याकडून ३ किलो ६८४ ग्रॅम उच्च दर्जाचे ‘मलाना क्रिम’ (मूल्य २ कोटी रुपये) हा अमली पदार्थ कह्यात घेतला. संशयित गोपाळ चव्हाण याला अमली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन लागले होते आणि तो पुढे अमली पदार्थांची वाहतूक करण्याच्या व्यवसायात गुंतला होता. गोव्यात अमली पदार्थांची वाहतूक करण्यासाठी त्याला प्रतिकिलो ५० सहस्र रुपये मिळत होते. संशयित गोपाळ चव्हाण सप्टेंबर २०२४ पासून प्रतिमास गोव्यात अमली पदार्थांचा पुरवठा करत होता. पोलीस आयुक्त (गुन्हे विभाग) विक्रम सिंह म्हणाले, ‘‘या प्रकरणी जेल्म सावियो फर्नांडिस आणि त्याचा साथीदार जार्डन फुर्तादो (दोघेही पोर्तुगीज नागरिक) यांना कह्यात घेण्यात आले. संशयित जेल्म सावियो फर्नांडिस हा गोव्यात रहात होता आणि तो हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन चरस घेऊन त्याची पुढे गोवा आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये विक्री करत होता. संशयित जार्डन फुर्तादो हा अमली पदार्र्थांची गोव्यातील रेव्ह पार्ट्यांमध्ये विक्री करत होता.’’