South Korea Plane Crash : दक्षिण कोरियामध्ये विमानाचा मोठा अपघात : १७९ जणांचा मृत्यू  

मुआन (दक्षिण कोरिया) – येथील विमानतळावरील धावपट्टीवर उतरत असणार्‍या ‘बोईंग ७३७-८०० जेट’ या विमानाचा अपघात होऊन त्यात १७९ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. ही दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, याचा शोध घेतला जात आहे.

प्राथामिक अंदाजानुसार विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने विमान धावपट्टीवरून घसरले आणि विमानाचा स्फोट झाला, असे सांगितले जात आहे. काहींच्या म्हणण्यानुसार विमानाला पक्षी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. या विमानात १८१ जण प्रवास करत होते. त्यांपैकी १७५ प्रवासी आणि ६ कर्मचारी होते. यांतील केवळ २ जण बचावले आहेत. हे विमान थायलंडमधील बँकॉक येथून निघाले होते. दक्षिण कोरियाच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विमान अपघात असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी या विमान अपघातावर शोक व्यक्त केला आहे.