प्रयागराज महाकुंभपर्व २०२५
प्रयागराज – येथे १३ जानेवारीपासून चालू होणार्या महाकुंभपर्वानिमित्त प्रयागराजमधील त्रिवेणी संगमासह अयोध्या, वाराणसी आणि चित्रकूट धामही सजणार आहे. या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सरकारने विशेष योजना आखली आहे. प्रयागराजमधील त्रिवेणी संगम परिसर, अयोध्येतील श्रीराममंदिर परिसर, वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर परिसर आणि चित्रकूटमधील कामदगिरी प्रदक्षिणा मार्ग येथील विकासकामांवर विशेष लक्ष दिले जात आहे. या ठिकाणी वाहतूक व्यवस्था, गृहनिर्माण सुविधा, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थापन आदींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधा विकसित करण्यात येत आहेत.
या सर्व धार्मिक स्थळांसाठी राज्याच्या नगरविकास विभागाने अनुमाने ६५ कोटी रुपयांचा निधी संमत केला असून या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.