छत्रपती संभाजीनगर – राज्य सरकारची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे. सरकारवर ८ लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. सरकारने घोषणा केलेल्यांची कार्यवाही अद्याप बाकी आहे. छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा विभागातील भ्रष्टाचार्यांना सरकारने संरक्षण दिले आहे, असा आरोप करून केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क रहित करावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २४ डिसेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
ते पुढे म्हणाले की, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात संख्याबळ अल्प असतांनाही आम्ही चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचा आवाज अधिवेशनात उठवण्याचा प्रयत्न केला. सरकारची नियत केवळ निवडणूक लढवणे होती. निवडणुकीला लालूच दाखवलेली आहे. निवडणुकीच्या काळात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या हप्त्याची रक्कम १ सहस्र ५०० रुपयांवरून २ सहस्र १०० करण्याची घोषणा करण्यात आली; मात्र पुरवणी मागण्यांमध्ये या रकमेचा समावेश नाही. भाजपने लोकसभेत २ वेळा विरोधी पक्षनेता दिला नव्हता. त्यामुळे महाराष्ट्रातही देतील की नाही, याविषयी शंका आहे. त्यामुळे याविषयी सावध पावले उचलत आहोत.