कार्यक्रमाच्या ३ दिवसांच्या काळात सरकारी नियमांचे उल्लंघन होऊ नये ! – न्यायालय
पणजी, २० डिसेंबर (वार्ता.) – धारगळ, पेडणे येथे २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत ‘सनबर्न’ इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक कार्यक्रमाच्या आयोजनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सशर्त मान्यता दिली आहे. ‘सनबर्न’च्या आयोजनाला स्थगिती देण्याची याचिकादाराची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. उच्च न्यायालय यासंबंधी अंतिरिम निवाडा २१ डिसेंबर या दिवशी देण्याची शक्यता आहे.
याविषयी अधिक माहिती देतांना ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम म्हणाले, ‘‘सनबर्न’च्या आयोजनाला उच्च न्यायालयाने सशर्त मान्यता दिली आहे. ‘सनबर्न’च्या वेळी ध्वनीप्रदूषण आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये, याची सरकार अन् आयोजक यांनी नोंद घ्यावी, तसेच आयोजनस्थळी उच्च पदावरील पदाधिकार्यांनी उपस्थिती लावावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. ‘कार्यक्रमाच्या ३ दिवसांच्या काळात सरकारी नियमांचे उल्लंघन होऊ नये’, असे न्यायालयाने म्हटले आहे.
धारगळ पंचायतीच्या ग्रामसभेत ‘सनबर्न’ला विरोध करणारा ठराव संमत झाला होता आणि यासंबंधी याचिका न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती. याविषयी बोलतांना ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम म्हणाले, ‘‘ग्रामसभांना मर्यादित अधिकार देण्यात आले आहेत. अशा स्वरूपाचे निर्णय हे ग्रामसभेने नव्हे, तर पंचायत मंडळाने घेणे आवश्यक असते.’’