Prayagraj Kumbh Mela 2025 : ‘अलाहबाद’चे ‘प्रयागराज’ झाल्यानंतर होणार पहिलाच महाकुंभमेळा !

प्रयागराज कुंभमेळा २०२५

प्रयागराज (उत्तरप्रदेश), १७ डिसेंबर (वार्ता.) –  ‘अलाहबाद’ शहाराचे नाव पालटून ते ‘प्रयागराज’ झाल्यानंतर यंदाचा म्हणजे १३ जानेवारी २०२५ पासून होणारा पहिलाच महाकुंभमेळा आहे. ‘अलाहबाद’ शहराचे नाव पालटून ते प्रयागराज करण्याचा निर्णय उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने १६ ऑक्टोबर २०१८ या दिवशी घेतला. वर्ष २०१९ मध्ये प्रयागराज येथे अर्धकुंभमेळा (प्रत्येक ६ वर्षांनी होणारा कुंभमेळा) झाला होता; परंतु यंदाचा कुंभमेळा हा १२ वर्षांनी येणारा मोठा कुंभमेळा आहे. यंदाच्या महाकुंभमेळ्याला ४० कोटी भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.

४४३ वर्षांनंतर गुलामगिरीचे प्रतीक नष्ट झाले !

प्राचीन काळापासून प्रयागराजचे नाव ‘प्रयाग’ असे होते. साधरण वर्ष १५७५ मध्ये मोगल शासक अकबर याने ‘प्रयाग’ नाव पालटून ‘अलाहबाद’ असे केले. तेव्हापासून ते ‘अलाहबाद’ असेच होते. देशाच्या स्वातंत्र्यानंरतही त्यात पालट करण्यात आला नाही. वर्ष २०१७ मध्ये प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा गोरखपूर मठाचे महंत योगी आदित्यनाथ हे उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर एकाच वर्षात म्हणजे १६ ऑक्टोबर २०१८ या दिवशी ‘अलाहबाद’ हे नाव पालटून ‘प्रयागराज’ असे केले. ४४३ वर्षांनंतर गुलामगिरीचे प्रतीक नष्ट झाले. त्यामुळे देशभरातील साधू-संतांसह समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांनी समाधान व्यक्त केले. यानंतर प्रथमच महाकुंभमेळा होत असल्याने साधू-संत, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यासह भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या कुंभमेळ्याला ‘महाकुंभमेळा’ असे का म्हटले जात आहे ?

प्रयागराज येथे प्रत्येक १२ वर्षांनंतर पूर्ण कुंभमेळा भरतो. यापूर्वी वर्ष २०१३ मध्ये पूर्ण कुंभमेळा झाला होता. असे १२ मोठे कुंभमेळे पूर्ण झाल्यानंतर जो कुंभमेळा येतो, त्याला ‘महाकुंभमेळा’ म्हणतात. असा योग प्रयागराजमध्ये १४४ वर्षांनंतर येत आहे. त्यामुळे यंदाच्या कुंभमेळ्याला ‘महाकुंभमेळा’ असे म्हटले जात आहे. त्यादृष्टीने योगी सरकार आणि प्रशासन यांनी यंदाचा कुंभमेळा भव्य-दिव्य करण्यासाठी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर ‘अगोदरचे सर्व कुंभमेळे विसरून जाल, इतका यंदाचा कुंभमेळा भव्य-दिव्य करू’, अशा शब्दांत भाविकांना आश्‍वत केले आहे.

केंद्र सरकारने रेल्वे तिकीटावरील अधिभार हटवल्यानंतरचाही पहिला मोठा कुंभमेळा !

प्रयागराज येथील महाकुंभमेळा हा रेल्वे तिकीटावरील अधिभार (अधिकचे शुल्क) हटवल्यानंतरचा हा पहिला मोठा कुंभमेळा आहे. त्यामुळे हिंदूंना यंदाच्याही कुंभमेळ्याला येण्यासाठी अधिकचे शुल्क भरावे लागणार नाही. १२ डिसेंबर २०१८ या दिवशी केंद्र सरकारने रेल्वे तिकिटांवरील अधिभार रहित करून कोट्यवधी हिंदूंना दिलासा दिला होता. त्यापूर्वी रेल्वे विभागाकडून प्रत्येक कुंभमेळ्यात अधिभार आकारला जात होता. त्यामुळे कुंभमेळ्याला येण्यासाठी हिंदूंना रेल्वेच्या नेहमीच्या भाड्यापेक्षा अधिक भाडे द्यावे लागत होते. या विरोधात हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०१५ मध्ये नाशिक येथे झालेल्या पूर्ण कुंभमेळ्याच्या वेळी मोठे आंदोलन केले होते.