माजी राज्यपाल दिवंगत एस्.एम्. कृष्णा आणि विधान परिषदेचे दिवंगत सदस्य दिनकरराव जाधव यांना दोन्ही सभागृहांत श्रद्धांजली !

माजी राज्यपाल एस्.एम्. कृष्णा

मुंबई, १६ डिसेंबर (वार्ता.) – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास १६ डिसेंबरपासून प्रारंभ झाला. विधानसभेत आणि विधान परिषदेत ‘वन्दे मातरम्’ने आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास प्रारंभ झाला.

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित मंत्री आणि शेखर निकम, मनोज जामसुतकर, वरुण देसाई या नूतन सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल दिवंगत एस्.एम्. कृष्णा आणि विधान परिषदेचे दिवंगत सदस्य दिनकरराव भाऊसाहेब जाधव यांना विधानसभा आणि विधान परिषद येथे श्रद्धांजली वहाण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माजी राज्यपाल एस्.एम्. कृष्णा आणि माजी विधानसभा सदस्य दिनकरराव जाधव यांच्या दुःखद निधनाविषयी विधानसभेत शोक प्रस्ताव मांडला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी माजी राज्यपाल एस्.एम्. कृष्णा, माजी विधान परिषद सदस्य दिनकरराव जाधव यांच्या दुःखद निधनाविषयी शोक प्रस्ताव मांडला.

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नागरी (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र शासकीय कर्मचार्‍यांच्या स्थानांतराचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणार्‍या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र झाडे तोडण्याविषयी नियमन सुधारणा विधेयक, हैद्राबाद इनामे आणि रोख अनुदाने रहित करण्याविषयी (सुधारणा) विधेयक आणि श्री सिद्धीविनायक गणपति मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी) सुधारणा विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मान्य करण्यात आली.