दुबईमध्ये लपलेला पसार गुंड प्रिन्स खान याच्याकडून धमकी; आय.एस्.आय.चाही उल्लेख !
बोधगया (बिहार) : येथील महाबोधी मंदिर बाँबने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. बोधगया मंदिर व्यवस्थापन समितीला एका पत्राद्वारे ही धमकी मिळाली आहे. धमकीनंतर पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे. धमकीच्या पत्रात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चाही (‘इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स’चाही) उल्लेख करण्यात आला आहे. या धमकीच्या पत्रात झारखंडमधील धनवाड जिल्ह्यातील वासेपूरचा कुख्यात गुन्हेगार प्रिन्स खान याच्या नावाचाही समावेश आहे. धमकी मिळाल्यानंतर गया पोलिसांचे एक पथक धनबादमध्ये पोचले आणि प्रिन्स खान याच्या घरावर धाड टाकून झडती घेतली. प्रिन्स सध्या दुबईत लपल्याची माहिती आहे. यापूर्वी महाबोधी मंदिरात जिहादी आतंकवाद्यांनी बाँबस्फोट घडवला होता.
प्रिन्स खान झारखंड राज्यातील धनबाद आणि बोकारो जिल्ह्यातील व्यावसायिकांना धमकावून खंडणी मागायचा. त्याच्यावर भूमी व्यावसायिकाच्या हत्येचा आरोप आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये तो पसार असून धनबाद पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धनबाद पोलिसांनी प्रिन्स खान याच्या विरोधात ‘रेड कॉर्नर नोटीस’ (जगभरातील पोलीसदलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर हव्या असलेल्या पसार लोकांविषयी सतर्क करण्यासाठीची नोटीस) जारी केली. तसेच त्याचे पारपत्रही रहित करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाभारतात कुणीही उठतो आणि धमकी देतो, हे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी धोकादायक आहे. याकडे अधिक गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे ! |