शतपैलू सावरकर

स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्‍या चरित्रावरील ‘शतपैलू सावरकर’ या शीर्षकाचे पुस्‍तक प्रा. हरिश्‍चंद्र त्र्यंबक देसाई यांनी लिहिला होता. ते पुस्‍तक ऑगस्‍ट १९८३ मध्‍ये ‘प्रबोधन प्रकाशन’, गोरेगाव, मुंबई यांनी प्रकाशित केले होते. ते पुस्‍तक इतके लोकप्रिय होते की, प्रत्‍यक्ष प्रकाशनापूर्वीच प्रथम आवृत्तीच्‍या सर्व प्रती संपल्‍या. त्‍यामुळे अडीच मासांत, म्‍हणजे त्‍याच वर्षी विजयादशमीच्‍या मुहूर्तावर पुस्‍तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली होती; मात्र सध्‍या त्‍याच्‍या प्रति उपलब्‍ध नसल्‍याने ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मंडळ, पुणे’ यांनी त्‍याचे पुनर्प्रकाशन करण्‍याचे योजिले. हा प्रकाशन समारंभ पुणे येथे ८ डिसेंबर या दिवशी पार पडला. ‘शतपैलू सावरकर’ या पुस्‍तकाचे प्रकाशन विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त, भारतीय वायूसेना) यांच्‍या हस्‍ते पार पडले, तर समारंभाचे अध्‍यक्ष श्री. सूर्यकांत पाठक होते. 

१. प्रा. हरिश्‍चंद्र त्र्यंबक देसाई यांच्‍याविषयी… 

प्राध्‍यापक हरिश्‍चंद्र त्र्यंबक देसाई हे त्‍या काळातील प्रख्‍यात लेखक असून त्‍यांनी लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्‍यासारख्‍या अनेक थोर राष्‍ट्रभक्‍तांच्‍या चरित्रांवर गोष्‍टीरूप पुस्‍तके लिहिली आहेत. स्‍वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्‍या जीवनातील प्रमुख प्रसंग घेऊन ‘शतपैलू सावरकर’ हे पुस्‍तक त्‍यांनी अप्रतिम पद्धतीने सादर केलेले आहे. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्‍यक्‍तीमत्त्व अक्षरशः शतपैलू आहे. त्‍यांच्‍या जीवनातील बरेच पैलू सर्वश्रुत नाहीत. अशा अनेक दैदीप्‍यमान पैलूंवर प्रकाश टाकून प्राध्‍यापक देसाई यांनी हे पुस्‍तक उत्तम रितीने खुलवले आहे.

२. प्रस्‍तावना आणि पुरस्‍कार

प्रा. देसाई यांच्‍या या पुस्‍तकाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची ‘अर्घ्‍य’ ही प्रस्‍तावना लाभली आहे, तसेच स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना वाहिलेल्‍या या आदरांजलीला हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्‍वहस्‍ते पुरस्‍कार देऊन गौरवले होते.

३. परिशिष्‍टे 

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी वयाच्‍या २३ व्‍या वर्षी लिहिलेला ‘वन्‍दे मातरम्’ या शीर्षकाचा लेख मुंबईच्‍या ‘विहारी साप्‍ताहिका’त वर्ष १९०६ मध्‍ये प्रकाशित झाला होता, तसेच महाराष्‍ट्रातील २० साहित्‍य संस्‍था, ८० साहित्‍यिक आणि २३ संपादक यांनी मिळून स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना २९ मे १९४३ या दिवशी मानपत्र दिले होते. या दोन्‍ही ऐतिहासिक कागदपत्रांच्‍या प्रती ‘परिशिष्‍टे’ म्‍हणून या ग्रंथात पुनर्मुद्रित करून ग्रंथाची शोभा वाढवली आहे. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या जीवनातील काही दुर्मिळ छायाचित्रे देऊन या ग्रंथाच्‍या सौंदर्यात भर घातली आहे.

४. शतपैलूंपैकी काही पैलू 

अ. बालपणाच्‍या थोरवीविषयी लिहितांना प्रा. देसाई तात्‍याराव सावरकर यांचा प्रामाणिकपणा, प्रखर बुद्धीमत्ता, समर्पक वक्‍तृत्‍व, मित्रमेळ्‍यातील नेतृत्‍व, लोकप्रियता आदींचे वर्णन करतात.

आ. ‘तात्‍याराव सावरकर यांच्‍या जीवनातील अनेक लहान लहान प्रसंग तरुणांना कसे प्रेरणादायी आहेत’, ते प्रा. देसाई लिहितात. हिंदुस्‍थानच्‍या स्‍वातंत्र्यलढ्यासाठी तात्‍याराव सावरकर यांचे योगदान तरुणांना अत्‍यंत प्रेरणादायी असून त्‍यातून त्‍यांचे लोकोत्तरत्‍व दिसते.

इ. सावरकर यांच्‍यावर गुदरलेल्‍या अनेक प्रसंगांतून त्‍यांची धैर्यशीलता दिसून येते. संबंधात येणार्‍या व्‍यक्‍तींच्‍या गुणांना प्रोत्‍साहन देणार्‍या अनेक प्रसंगांतून तात्‍यारावांची गुणग्राहकता जाणवते.

ई. प्रख्‍यात इतिहासकार आणि रियासतकार सरदेसाई यांनीच सावरकर यांना ‘इतिहास घडवणारे’, असे विशेषण दिले होते.

५. सावरकर यांचे उल्लेखनीय पैलू

अस्‍पृश्‍यता निवारक, शुद्धीकार्याचे प्रणेते, विज्ञाननिष्‍ठ समाजसुधारक, भाषाशुद्धीचे पुरस्‍कर्ते, संस्‍कृतनिष्‍ठ हिंदीचे कैवारी, नागरी लिपीचे सुधारक, संस्‍कृत भाषाप्रभु, हिंदु राष्‍ट्रध्‍वजाचे भाष्‍यकार, राष्‍ट्रीय कालदर्शकाचे दिग्‍दर्शक, अनुकरणीय आचार्य, साधूशील महाजन, विरळा स्‍थितप्रज्ञ, अद्वितीय राजनीतीपटू, विवेकशील नेता, लोकोत्तर द्रष्‍टा, स्‍वातंत्र्यसंरक्षक, उपयुक्‍ततावादी तत्त्वज्ञ, हिंदु महासभेचे धुरंधर, निष्‍कलंक आरोपी, वत्‍सल पिता इत्‍यादी.

अशा शतकोत्तर पैलू असणार्‍या अशा प्रगल्‍भ स्‍वातंत्र्यसेनानीला शतशः वंदन !

(‘शतपैलू सावरकर’ या पुस्‍तकाचा परिचय)