‘सहस्र वर्षे इस्लामी सत्तांनी भारतावर राज्य केले. सुमारे पावणे दोनशे वर्षे इंग्रजांनी भारतात सत्ता राबवली. इंग्रजांनी या देशात एक नवी शिक्षणपद्धत कार्यवाहीत आणली. लॉर्ड मेकॉले हा त्या शिक्षणपद्धतीचा जनक. ‘भारतियांना त्यांच्या धर्माची, संस्कृतीची लाज वाटली पाहिजे, आपले जे आहे ते अल्प दर्जाचे आणि पश्चिमेकडून जे आले आहे तेवढेच भव्यदिव्य, अशी मानसिकता यातून निर्माण झाली पाहिजे’, असा प्रयत्न होता. ब्रिटन हा भांडवलवादी देश; परंतु ब्रिटिशांचे राज्य असतांना भारताच्या संस्कृती विश्वावर पुटं (पातळ थर) चढली साम्यवादी विचारसरणीची ! हा काही चमत्कार नव्हता.
या लेखात आपण संस्कृतीवर आक्रमण करणार्या मार्क्सवादाचे खरे स्वरूप आपल्यासमोर मांडणार आहोत. जगावर अधिसत्ता निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शक्तींना केवळ भूमी पादाक्रांत करून भागत नाही. जितांच्या (विजेत्यांच्या) मेंदूवर नियंत्रण मिळवल्याखेरीज अंकीत करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. जिथे संस्कृतीचा प्रवाह शतकानुशतके अव्याहतपणे वहातो आहे, अशा भारतासारख्या देशात हे घडवणे सोपे नव्हते. जेत्यांना हा प्रयोग राबवण्यासाठी या ठिकाणी विशेष शक्ती लावावी लागली. मार्क्सवादी विचारसरणी जिथे जन्मली किंवा वाढली, अशा एकाही सत्तेने भारतावर कधीही राज्य केले नाही. तरीही या देशाचा इतिहास आणि संस्कृती यांवर मार्क्सवादाचे शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झाला. वरकरणी हे विचित्र वाटू शकेल, प्रत्यक्षात हा उत्तम रणनीतीचा भाग होता.
१. शोषित-शोषक
इतिहास-संस्कृतीविषयी भारतियांच्या मनात न्यूनगंड निर्माण करण्याचे काम ब्रिटिशांनी केले. ‘भारताचा इतिहास आणि संस्कृती ब्राह्मणवादी आहे, मनुवादी आहे, भारतीय समाजात शोषक आणि शोषित असे दोन गट आहेत. त्यातील शोषक असलेला समाज हा मूळ भारतीय नाही, तो आर्य म्हणजे बाहेरून आलेला, स्थानिक द्रविडांची सत्ता बळकावून तो सत्ताधीश झाला’, हा इतिहास भारतियांच्या गळी उतरवण्याचे काम ब्रिटिशांनी केले. ‘फोडा आणि झोडा’, ही त्यांची रणनीतीच होती.
प्रा. मॅक्समुल्लर या विचारवंताने आर्यांच्या भारतावरील आक्रमणाची ‘थिअरी’ (सिद्धांत) सर्वप्रथम मांडली. पुढे ती अनेकांनी खांद्यावर घेतली. ही ‘थिअरी’ ब्रिटिशांच्या सोयीची होती. ‘मुसलमान आणि ब्रिटीश जर उपरे अन् आक्रमक आहेत, आर्यसुद्धा बाहेरूनच आलेले आहेत. त्यामुळे आम्हाला ‘चले जाव’ म्हणण्याचा अधिकार तुमच्याकडे नाही’, हे पटवण्यासाठी ही ‘थिअरी’ उपयुक्त होती. ‘भारत हा देश नसून वेळोवेळी बाहेरून आलेल्या उपर्यांची वसाहत आहे’, हे गळी उतरवण्याचा हा प्रयत्न होता. ‘लोग आते गये, कारवा बनता गया’, हे सांगण्याचा प्रयत्न होता.
समाजात जेव्हा शोषित आणि शोषक असे गट निर्माण करायचे असतात, तेव्हा भांडवलशाही विचारसरणी फार उपयोगी ठरत नाही. भांडवलवादी विचारांचा डोलारा हा स्पर्धेच्या तत्त्वावर उभा आहे, त्याला तंत्रज्ञानाची जोड असते. ‘ब्रिटिशांना भारतात स्पर्धा नको होती, तंत्रज्ञानही त्यांच्या आवश्यकतेपुरते हवे होते. सत्ता राबवण्यासाठी, ती दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यांना इथे केवळ विभाजन हवे होते. भविष्यातही भारत त्यांना एकसंघ आणि बलशाली नको होता. भारताची बलस्थाने त्यांना व्यवस्थित ठाऊक होती. एक दिवस भारताला स्वातंत्र्य द्यावे लागेल, याची त्यांना जाणीव होती. आपल्या पोलादी पकडीतून सुटका झालेला भारत कोणत्याही परिस्थितीत महासत्ता बनू नये, दुबळा आणि स्वतःच्या अंकीत रहायला हवा’, या दिशेने ब्रिटीश काम करत होते. त्यांना भारताचे तुकडे करायचे होते. त्यासाठी इथे इस्लामी कट्टरतावादाची पाळेमुळे अधिक घट्ट रुजवायची होती.
२. शरीयत आणि मार्क्स
जिथे साम्यवादी विचार आहे, तिथे इस्लाम रूजू शकत नाही. जिथे इस्लाम आहे, तिथे साम्यवादी विचारसरणीला स्थान नाही; परंतु जिथे लोकशाही नांदते, तिथे मात्र हे दोन्ही विचार एकमेकांच्या हातात हात घालून लोकशाही खणून काढण्याचे काम करत असतात. लोकशाही देशात साम्यवादी विचारसरणी इस्लामी कट्टरतावादासाठी बलवर्धकासारखे (‘टॉनिक’सारखे) काम करते, हे ब्रिटिशांना ठाऊक होते. ‘शरीयत आणि मार्क्स’ यांची वैचारिक भेसळ भारताचा पोकळ वासा बनवण्यासाठी इंग्रजांना सोयीची होती. भारतीय संस्कृतीवर चढलेली मार्क्सवादाची पुटं हा केवळ योगायोग नसून त्याच रणनीतीचाही भाग होता तो असा ! ‘अध्यात्म, संस्कृती आणि इतिहास ही त्रिसूत्री नष्ट करणे, किमान दूषित करणे’, हे त्याचे उद्दिष्ट होते. त्याखेरीज भारतीय मेंदूंवर नियंत्रण मिळवण्याची कल्पनाच अशक्य होती.
सत्तेचा पाया दृढ करण्यासाठी इतिहास-संस्कृतीत भेसळ करण्याची उदाहरणे शेकडोंनी आहेत. महाराष्ट्राने संभाजी ब्रिगेडच्या रूपाने हा प्रयोग पाहिलेला आहे. तुम्हाला एखादा भेसळयुक्त विचार समाजात झिरपवायचा असतो, तेव्हा तो विचार रेटणार्या साहित्याची, सिनेमा-मालिकांची निर्मिती करावी लागते. त्यासाठी पत्रकार, लेखक आणि कथित विचारवंत यांचा गोतावळा निर्माण करावा लागतो. सरकारी पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांना मोठेपण मिळवून द्यावे लागते. त्यांच्या कपाळावर विचारवंत असल्याचा टिळा लावावा लागतो, जेणेकरून लोक त्यांना गांभीर्याने घेतील.
३. …आणि भगवा इतिहास हिरवा झाला !
इस्लामी राजवट उलथवण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. त्यांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. हिंदु संस्कृती नष्ट करू पहाणारा कडवट इस्लामचा प्रवाह रोखण्याचे काम त्यांनी केले. पुढच्या अनेक पिढ्यांना इस्लामी आक्रमणाशी लढण्याची प्रेरणा देणारा इतिहास घडवला. हा भगवा इतिहास सत्तेची गणिते जुळवण्यासाठी अडथळा ठरत होता. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून हा इतिहास हिरव्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी विपुल प्रमाणात इतिहासाची पिवळी पुस्तके निर्माण करण्यात आली. असा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला गेला की, लोकांना प्रश्न पडावा की, छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई इस्लामी आक्रमकांशी होती कि ब्राह्मणांशी ? ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ५७ टक्के मुसलमान होते’, अशा खोट्या थापा लोकांच्या गळी उतरवण्याचे प्रयत्न करण्यात आले. राजकारणाचा खुंटा बळकट करण्यासाठी हे घडवण्यात आले. ‘ध’चा ‘मा’ करण्यात आला.
महाराष्ट्रात ब्रिगेडींनी पिवळ्या इतिहासाचे भरपूर साहित्य निर्माण केले, काही उठवळ इतिहासकारांना मोठे केले. एका छपरी नायकाने अशी एक ऐतिहासिक मालिका आणली, ज्यात ब्राह्मण कसे स्वराज्याचे शत्रू आहेत, हे ठसवण्याचा प्रयत्न केला. इतिहास-संस्कृतीत भेसळ कशी केली जाते, याचे हे अगदी अलीकडचे उदाहरण. ‘सिनेमा, मालिका, साहित्य, गीत यांच्या माध्यमातून एखादा विचार समाजाच्या सर्व स्तरांत झिरपावा’, असे प्रयत्न जगभरात झालेले दिसतात. अमेरिकेने जागतिक महासत्ता म्हणून स्वतःचा बोलबाला निर्माण करण्यासाठी हॉलीवूड, अमेरिकी माध्यमे आणि साहित्याचा अत्यंत प्रभावीपणे वापर केलेला दिसतो.
४. कला : विचार रुजवण्याचे साधन
गाणी-संगीत हे मानसिकता घडवणारे-बिघडवणारे पुष्कळ प्रभावी माध्यम आहे. गाण्यातून फक्त ‘सेक्स’ (अश्लीलता), ‘ड्रग्जचे मार्केटिंग’ (अमली पदार्थ विपणन) होत नाही, तर वैचारिक लसीकरणसुद्धा करता येते. गेल्या दोन दशकांत पंजाबमध्ये अशा प्रकारे लोक संगीत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, ज्याच्या माध्यमातून खलिस्तान, मादक द्रव्ये आणि हिंसाचार यांचा उघड प्रचार होईल. परदेशात बसून खलिस्तानचा उघड प्रचार करणार्या ‘पोएटिकल जस्टिस’सारख्या संघटना गाण्यांचे असे ‘अल्बम्स’ (ध्वनीमुद्रिका) घाऊकपणे बनावेत म्हणून पैसा ओतत असतात. त्यांना सुसज्ज ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) पुरवत असतात. ज्यांना सशक्त भारताचे वावडे आहे, अशा जागतिक महासत्ता अशा संघटनांना रसद पुरवत असतात.
काँग्रेसच्या कार्यकाळात ‘साम्यवादी विचारांची कीड व्यवस्थित पसरत जावी’, यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी संस्थांचे जाळे निर्माण करण्यात आले. काँग्रेसला केवळ सत्तेत स्वारस्य होते, त्यामुळे वैचारिक लढाई लढण्याचे काम साम्यवाद्यांनी त्यांच्या तैनाती फौजेप्रमाणे केले. या मोबदल्यात साम्यवाद्यांना जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (जे.एन्.यू.), ‘इंडियन कौन्सिल ॲाफ हिस्टॉरिकल रिसर्च’, ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’, ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’, ‘पीपल्स पब्लिशिंग हाऊस’, ‘साहित्य अकादमी’, ‘नियोजन आयोग’, ‘प्रेस ट्रस्ट ॲाफ इंडिया’, अशा अनेक संस्था बहाल करण्यात आल्या. विचारवंत, इतिहासतज्ञ, अभिनेते, गीतकार, दिग्दर्शक आदींची अशी घाऊक फौज निर्माण झाली, जे साम्यवादी विचार शिरोधार्य मानतात. ‘हिंदुत्ववादाचा किंवा राष्ट्रवादाचा विचार हा घातक आहे’, हे मानणे त्याचे पुढचे पाऊल आहे.
५. ‘हिंदु’ म्हणवून घेण्याची लाज ?
‘हिंदु’ म्हणवून घेण्याची, हिंदु कुळाचार पाळण्याची लाज वाटणे हा त्याचा परिणाम ! साम्यवादी विचाराने मानसिकता अशी बनवली, ‘हिंदूंनी त्यांच्या आई-बापावर प्रेम न करता शेजारच्या काकावर जीव ओवाळून टाकावा, त्याचा अभिमान बाळगावा’ ! साम्यवादी विचार तुम्हाला सांगतो, ‘धर्मनिरपेक्ष व्हायचे असेल, तर केवळ इस्लामचे प्रचंड कौतुक करून भागणार नाही, तर हिंदु असल्याची लाजही वाटायला हवी’, हे साहित्यात दिसले, तसेच सिनेमाच्या पडद्यावर तर भरभरून दिसले. सिनेमातील नायक आणि नायिका हिंदु तरीही दोघे ‘याल्ला याल्ला दिल ले गया…’, अशी हिरवट गाणी का म्हणतात ? उठसुठ ‘वल्ला’, ‘माशाअल्ला’, ‘सुभानअल्ला’, अशी भाषा का वापरतात ? हा प्रश्न ना गीतकाराला पडायचा, ना पटकथा लेखकाला, दिग्दर्शकाला, ना पडद्यावर झळकणार्या अभिनेत्यांना, ना ही गाणी पडद्यावर पहाणार्या प्रेक्षकांना ! न्यायालयाचे जुने प्रसंग आठवून पहा. न्यायाधीशांपासून अधिवक्त्यांपर्यंत यच्चयावत सगळे अलिगढ विश्वविद्यालयात शिकल्यासारखे उर्दू पाजळत संवाद म्हणायचे.
या देशात ‘मुघल ए आझम’ या चित्रपटाची निर्मिती झाली ते वर्ष होते १९६०. त्यानंतर ६४ वर्षांनंतर पुन्हा एका मराठी दिग्दर्शकाला वर्ष २००८ मध्ये ‘जोधा-अकबर’ हिंदी चित्रपट बनवावासा वाटला. देश स्वतंत्र झाल्याच्या ७ दशकानंतर एकही निर्माता, अभिनेते, दिग्दर्शक यांना हिंदीमध्ये भव्यदिव्य सिनेमा बनवण्याची इच्छाच होऊ नये, हे मेंदूवर साम्यवादी विचारांचे नियंत्रण असल्याचे मोठे उदाहरण ! या देशात अकबरावर, शहाजहांवर, मुमताज महलवर सिनेमे बनत रहावेत, हा साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव आहे. हिंदी सिनेमाचा पडदा मोगलमय झाला. मोगलांचे कौतुक करत राहिला. त्यांच्या उद्दामपणाला प्रेमाचे हिजाब घालून पडद्यावर आणत राहीला.
६. चित्रपटांच्या माध्यमातून जिहादी झाले सज्जन आणि संत झाले भोंदू !
‘महाराणा प्रताप, गुरुगोविंद सिंह, राजा छत्रसाल यांच्या जीवनावर एखादी भव्य मालिका बनण्याच्या आधी या देशात टिपू सुलतानवर मालिका बनावी’, हा साम्यवादी विचारांचाच प्रभाव आहे. हिंदूंच्या कत्तली घडवणार्या टिपूसारख्या क्रूरकर्म्याला देशाचे नायक बनवण्याचे षड्यंत्र रचले गेले. इरफान हबीब, रोमिला थापर, रामचंद्र गुहा आदी साम्यवादी इतिहासकारांनी ते यशस्वीही केले. ‘देशाला अखंडतेच्या सूत्रात बांधण्याच्या विचाराने भारलेल्या चाणक्यावर एखाद्या राष्ट्रवादी विचारांच्या चंद्रप्रकाश द्विवेदीने मालिका बनवावी आणि ती बंद पाडण्याची बुद्धी केंद्र सरकारला व्हावी’, हा साम्यवादी विचारांचा प्रभाव आहे.
‘चाणक्य’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय होती; परंतु या मालिकेतून संघ विचार मांडला जात असल्याचा संशय आल्यामुळे या मालिकेवर बंदी लादण्यात आली. या मालिकेचे अखेरचे काही भाग पहा, ती मालिका अक्षरश: पळवली आहे. निर्माते दिग्दर्शक चंद्रप्रकाश यांना देहलीत जाऊन तत्कालीन माहिती प्रसारण मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या अंबिका सोनी यांची मनधरणी करावी लागली होती.
भगवाधारी साधू बलात्कारी, तर भोंदू आणि इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा) देशभक्तीचे ‘आयकॉन’ (आदर्श) झाले. टिळेवाले डाकू आणि नमाज पढणारे देशाचे इमानदार झाले. सिनेमाचा नायक मंदिरात पाऊल ठेवत नाही; परंतु ‘७८६’च्या (इस्लाममधील पवित्र आकडा) बिल्ल्याचे सारखे चुंबन घेत असतो, असे बिनडोक प्रसंग पडद्यावर दाखवता आले आणि लोकांनी त्यावर टाळ्याही पिटल्या.
आपल्याकडे आतंकवादी हा मुसलमान असतो, हे दाखवण्यासाठी वर्ष १९९२ पर्यंत वाट पहावी लागली. ते धाडससुद्धा मणीरत्नम नावाच्या एका तमिळ दिग्दर्शकाने दाखवले. तोपर्यंत आतंकवादी हे मुसलमान नसायचे. ‘रोजा’ हा हिंदी सिनेमा वर्ष १९९२ मध्ये प्रदर्शित झाला, त्या आधी वर्ष १९८६ मध्ये ‘शोमन’ (संयोजक) असे बिरुद मिरवणार्या सुभाष घई या दिग्दर्शकाने ‘कर्मा’ हा सिनेमा पडद्यावर आणला होता. डॉ. डँग नावाचा एक आंतरराष्ट्रीय; परंतु काल्पनिक आतंकवादी या सिनेमात खलनायक होता. त्यात काश्मीरमधील दाखवलेला आतंकवाद पाहून आज हसू येते. वर्ष २००१ मध्ये सनी देओलचा ‘गदर’ हिंदी सिनेमा ‘ब्लॉकबस्टर’ (पुष्कळ यशस्वी) ठरला; कारण इस्लामी जिहादचा खरा चेहरा काही प्रमाणात या सिनेमात दाखवण्यात आला होता. ‘द कश्मीर फाइल्स’ हे त्याचे शिखर होते. संस्कृतीवर चढवलेली साम्यवादी पुटं पुसण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे, याचा प्रत्यय या सिनेमातून आला. त्यामुळे या सिनेमावर सर्व पुरोगाम्यांनी चवताळून टीका केली.
७. साहित्यातही सज्जन हिंदु अडगळ ठरला !
सिनेमाच्या पडद्यावर जो धुमाकुळ आहे, तो साहित्यातही आहे. ‘हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ’, अशी वैचारिक रद्दी निर्माण करणार्याला (भालचंद्र नेमाडे यांना) आपल्याकडे ‘ज्ञानपीठ’सारखे महत्त्वाचे पुरस्कार मिळतात. ‘ज्ञानपीठ’ विजेत्याकडे समाजाला वैचारिक मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य असावे; पण हे महाशय कायम चपटी (मद्याची बाटली) मारल्यासारखे बरळत असतात. अलीकडेच ब्रिगेडच्या कार्यक्रमात एका बंद पडलेल्या साप्ताहिकाचा संपादक (ज्ञानेश महाराव) प्रभु श्रीरामांच्या विरोधात बोलला. त्याच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शरद पवारांची त्यांनी तोंड भरून प्रशंसा केली. ज्याच्याकडे पोळी (जमल्यास तंगडी (मांस), चपटी आणि पाकीटही (पैसे)) मिळ्ण्याची शक्यता असते, त्यांची टाळी वाजवणे, हा अशा पत्रकारांचा स्वभावधर्म झाला आहे. तुकडा फेकणारे पवारांसारखे नेतेच अशा पत्रकारांचे मर्यादा पुरुषोत्तम बनले आहेत.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदुत्वाला झोडणे, हे काही लोकांना कर्तव्यच वाटते. ‘हिंदुत्वाच्या विरोधात बोलणे’, हाच पुरोगामीपणा मानला जातो; जातींवर बोलला, तर तुम्ही पुरोगामी ठरता; हिंदुत्वाविषयी बोलला, तर संकुचित बनता. गायीची पूजा केली, तर बावळट ठरता; कुत्रे पाळले की, भूतदयावादी आणि आधुनिक ठरता. गोमूत्राचा प्रचार करणारे गावठी आणि गोमांस खाणार्यांना खुल्या विचारांचे मानले जाते, इथपर्यंत ही साम्यवादी वैचारिक कीड पसरली आहे. जे जे आपले (हिंदूंचे) आहे, त्याची लाज वाटणे, म्हणजे नेमके हेच आहे.
आधुनिक युद्धतंत्रात एखाद्या राष्ट्राला नमवण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रांपेक्षा अधिकपणे ‘सायकॉलॉजिकल वॉरफेअर’चा (मानसिक युद्धाचा) वापर केला जातो. अशा साहित्यांची, सिनेमांची, संगीताची निर्मिती करायची की, जनमानसाच्या मेंदूवर थेट नियंत्रण निर्माण झाले पाहिजे. ब्रिटनने हे तंत्र भारताच्या विरोधात कित्येक दशके आधी वापरले. आज सामाजिक माध्यमांमुळे हे तंत्र अधिक घातक आणि प्रभावशाली झाले आहे. आज एखादा विचार एका सेकंदात लाखो लोकांपर्यंत पसरवणे शक्य आहे. या नव्या तंत्रज्ञानाला शिव्या घालून हे संकट रोखता येणार नाही. त्यासाठी ते तंत्रज्ञान आत्मसात् करून आपला इतिहास आणि संस्कृती यांचे सत्य, त्यात झालेली भेसळ सप्रमाण लोकांपर्यंत न्यावी लागेल. सुदैवाने हे होतांना दिसत आहे. सांस्कृतिक मार्क्सवादाची पुटं पुसण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे.’
लेखक : श्री. दिनेश कानजी, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक, ‘न्यूज डंका’चे संकेतस्थळ
(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’चा, दिवाळी विशेषांक, वर्ष १, ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४)
संपादकीय भूमिकाअभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदुत्वाला झोडपणे आणि ‘हिंदुत्वाच्या विरोधात बोलणे’, हाच पुरोगामीपणा रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे ! |