पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगाव येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचा सोहळा नुकताच २ डिसेंबर या दिवशी पार पडला. कार्तिक कृष्ण त्रयोदशीला माऊलींच्या मुखकमलावर या दिवशी झालेला किरणोत्सव सध्या मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. अध्यात्म विवेकी ज्ञानेश्वरदादा कोल्हापूरकर हे निरुपणाच्या माध्यमातून सूर्यदेवाला विनंती आणि ज्ञानोबारायांना प्रार्थना करत होते, ‘जर आमचा हा संकल्प सत्य आणि योग्य असेल, तर आजचा हा किरणोत्सव सोहळा निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे.’ आणि काय आश्चर्य ! संपूर्ण आठवडाभर आकाशात ढग असतांना ढगांचा पडदा काही मिनिटे बाजूला सरकला अन् सूर्यकिरण मंदिरात प्रकटले. ढगांच्या काळोखात किरणोत्सव होणे, म्हणजेच ‘विज्ञान जिथे थांबते, तेथून अध्यात्म चालू होते’, याची प्रचीती भाविकांना या वेळी घेता आली.
अभंग संपतो ना संपतो, तोच ज्ञानेश्वरदादांनी ‘ज्ञानोबामाऊली तुकाराम’ या जयघोषाचा गजर चालू केला, त्याला प्रतिसाद देत जमलेल्या भाविकांनी टाळ्या वाजवत मोठमोठ्याने हा जयघोष म्हणायला आरंभ केला. या जयघोषाने आपेगावचा संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. प्रत्येकाच्या चेहर्यावर भावरस संचार करू लागला होता. भक्तीरसात तल्लीन झालेला प्रत्येक भाविक भक्ताची प्रसन्नचित्त मूर्ती गजराच्या माध्यमातून ‘निसर्गदेवतेला जणू काही आवाहन करत आहे’, असे वातावरण सिद्ध झाले. ज्ञानेश्वरदादा मंदिराच्या पायरीवर बसून माऊलींचा गजर करत होते. त्यांच्यासहित सर्वांनी या वेळी साक्षात् माऊलींच्या दिव्यत्वाचा अनुभव घेतला. संत ज्ञानेश्वर माऊलींनी दुपारी १ च्या आसपास इंद्रायणीकाठी समाधी घेतली होती. तीच वेळ साधत आपेगाव येथील मंदिरातही माऊलींच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडावेत, यासाठी वास्तूशास्त्रज्ञ महेश साळुंके आणि खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर गेल्या २ वर्षांपासून सूर्यकिरण अन् पृथ्वीचे भ्रमण यांचा अभ्यास करत आहेत. या क्षणासाठी खगोलशास्त्रज्ञ अन् वास्तूविशारद यांनीही केलेल्या तपस्येचे फळच जणू या दिवशी मिळाले. आयुष्यभर विज्ञानात रममाण असणारेही साक्षात् माऊलींच्या दिव्यत्वाचा अनुभव घेत होते. राज्यभरात पाऊस आणि ढगाळलेले वातावरण असतांना केवळ न केवळ माऊलींच्या समाधीच्या क्षणांना काही मिनिटेच दाटलेल्या ढगांतून सूर्य दिसणे आणि माऊलींच्या मुखकमलावर सूर्यकिरण पडले, हा अध्यात्मातील चमत्कारच म्हणावा लागेल !
शास्त्रज्ञांनी केलेले मोजमाप, पृथ्वीच्या भ्रमणाचा अभ्यास, सिद्ध केलेली यंत्रणा निसर्गापुढे हतबल होऊ शकते; पण भक्ती कधीच हतबल होत नाही. भक्ताच्या भोळ्या भक्तीसाठी ईश्वराला यावेच लागते, हे यावरून सिद्ध होते. देव भावभक्तीचा भुकेला आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने भगवद़्भक्तीत रममाण व्हावे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे