जर कंत्राटदार काम करत नसेल, तर आम्ही त्याला बुलडोझरखाली फेकून देऊ ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेतून दिली चेतावणी  

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी देहली – राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (आर्.एल्.पी.चे) खासदार हनुमान बेनीवाल यांनी लोकसभेत देहली-मुंबई द्रुतगती मार्गावरील त्रुटी सांगितल्या. या महामार्गावर १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. एकट्या दौसामध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर उत्तर देतांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अपघातातील मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच ‘आम्ही ४ कंत्राटदारांना उत्तरदायी ठरवले आहे आणि त्यांना नोटीस देऊन कठोर कारवाई करू, असे बजावले आहे. संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. मी जाहीर सभेत म्हटले आहे की, जर कंत्राटदार काम करत नसेल, तर आम्ही त्याला बुलडोझरखाली फेकून देऊ, लक्षात ठेवा. रस्ते पूर्णपणे दुरुस्त केले जातील. आम्ही कुणाशीही तडजोड करत नाही’, असे म्हटले.