सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाचा सोहळा पहातांना पुणे जिल्‍ह्यातील साधकांना आलेल्‍या अनुभूती

४ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या भागात आपण ब्रह्मोत्‍सवासाठी जातांना आणि प्रत्‍यक्ष ब्रह्मोत्‍सव सोहळा पहातांना काही साधकांना आलेल्‍या अनुभूती अन् शिकायला मिळालेली सूत्रे पाहिली. आता आपण साधकांच्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे यांचा पुढील भाग पाहूया.       

(भाग ४)

याच्या आधीचा लेख (भाग ३) वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/860429.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

८. सौ. गीता देशपांडेे

अ. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या कार्यक्रमाच्‍या ठिकाणी गेल्‍यावर मला माझ्‍या हातावर पुष्‍कळ दैवी कण आल्‍याचे आढळले.

आ. कार्यक्रम चालू होण्‍यापूर्वी मी प्रार्थना करत असतांना ‘व्‍यासपिठावर सूक्ष्मातून गुलाबाच्‍या पाकळ्‍यांची वृष्‍टी होत आहे’, असे मला दिसले. त्‍यानंतर कार्यक्रमाच्‍या वेळी सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या रथावर पुष्‍पवृष्‍टी होतांना पाहिल्‍यावर ‘हे तर देवाने मला आधीच दाखवले आहे’, असे माझ्‍या मनात आले आणि पुष्‍कळ कृतज्ञता वाटली.’

९. सौ. रश्‍मी महाजन

अ. ‘ब्रह्मोत्‍सवाच्‍या कार्यक्रमाला बसमधून जातांना ‘मी गरुडावर बसले आहे आणि तो मला आकाशातून अलगद घेऊन जात आहे’, असे मला वाटत होते. तेव्‍हा आपोआपच माझ्‍याकडून ‘गरुडगमनतव..’, हे भक्‍तीगीत भावपूर्ण म्‍हटले गेले.

आ. मला मधूनच वेदमंत्र ऐकू येत होते. त्‍यामुळे वातावरण अत्‍यंत पवित्र झाले होते. मला पूर्ण प्रवासात ‘ॐ’ चा नाद स्‍पष्‍टपणे ऐकू येत होता. ‘तो नाद सतत चालू आहे आणि घाटातून जातांना डोंगरदरीतूनही तो नाद ऐकू येत आहे’, असे मला वाटत होते. तो नाद ऐकतांना माझे मन एकाग्र होत होते. तेव्‍हा ‘डोळे उघडू नयेत आणि तो नाद ऐकतच रहावा’, असे मला वाटत होते.

इ. माझी प्रकृती उष्‍ण असल्‍याने मला उकाड्याचा नेहमीच पुष्‍कळ त्रास होतो; पण कार्यक्रमस्‍थळी प्रचंड उष्‍मा असतांनाही मला उकाड्याचा थोडाही त्रास झाला नाही.

ई. मला गुरुदेवांनी परिधान केलेला हार आणि मुकुट सूर्यासारखे तेजस्‍वी अन् प्रकाशमान दिसत होते.

उ. ‘गुरुदेवांचा रथ मैदानात मार्गक्रमण करत असतांना तो भूमीला टेकलेलाच नाही’, असे मला दिसत होते. ते पाहून मला पुष्‍कळ आश्‍चर्य वाटले. मी पुनःपुन्‍हा पाहिले, तरी मला तसेच दिसत होते.’

१०. श्री. तेजस कार्येकर 

अ. ‘रथात बसलेल्‍या प.पू. गुरुदेवांना पाहिल्‍यावर मला लहानपणापासून माझ्‍याकडून झालेल्‍या चुका आणि मी इतरांना दिलेला त्रास आठवला. ‘आपण प.पू. गुरुदेवांच्‍या दृष्‍टीसमोर उभे रहाण्‍याच्‍यासुद्धा पात्रतेचे नाही’, असा विचार माझ्‍या मनात येत होता आणि मला पुष्‍कळ रडू येत होते. ‘असे असूनही प.पू. गुरुदेव दर्शन देऊन मला आपलेसे करत आहेत’, या विचाराने मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटत होती.’

११. सौ. वत्‍सला भोसले

अ. ‘ब्रह्मोत्‍सवासाठी गोव्‍याला जाण्‍यापूर्वी घरात पुष्‍कळ पाहुणे आले होते, तसेच मला शारीरिक त्रासही होत होता. तेव्‍हा ‘मला इतक्‍या लांबचा प्रवास झेपणार नाही’, असा विचार माझ्‍या मनात आला. त्‍याच वेळी ‘गुरुदेवांचा एवढा मोठा उत्‍सव आहे, तर आपल्‍याला नक्‍कीच जायला मिळेल’, असा मला विश्‍वास वाटत होता.

आ. गोव्‍याला जायला निघायच्‍या आदल्‍या दिवशीच माझ्‍या घरी आलेले सर्व नातेवाईक गेले, तसेच माझा शारीरिक त्रासही नाहीसा झाला. त्‍यामुळे मी गुरुदेवांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या सोहळ्‍यासाठी जाऊ शकले. गुरुदेवांच्‍या कृपेनेच मला ही अनुभूती आली.’

१२. सौ. विजया हरिभाऊ लोखंडे   

अ. ‘ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी रथारूढ झालेल्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (प.पू. गुरुदेव) यांना पाहून ‘आपण श्री जगन्‍नाथाची रथयात्रा पाहिली नाही; पण जगन्‍नाथरूपी गुरुमाऊलींना रथारूढ पहाता आले’, असे मला वाटले. त्‍या वेळी ‘रथासमोर असणार्‍या दिंडीत स्‍वतः सहभागी आहे’, असे वाटून माझे देहभान हरपले.

आ. ‘प्रत्‍यक्ष विष्‍णुलोकात नारायणाचा हा सोहळा पहात आहे’, असे मला वाटून माझ्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू येत होते. मला स्‍थिरता, चैतन्‍य, आनंद आणि शांती एकाच वेळी अनुभवता आले.

इ. गुरुदेवांनी सर्व साधकांना जवळून दर्शन दिले आणि सर्व साधकांचे त्रास हरण केले. मला माझ्‍या संपूर्ण देहात एक पोकळी जाणवत होती. प्रत्‍यक्षात मला गुडघेदुखी आणि पाठीचे स्नायू सतत दुखण्‍याचा त्रास आहे; परंतु सोहळ्‍याला गेल्‍यावर माझा पाठीचा त्रास ८० टक्‍के उणावला. ही अनुभूती मला गुरुकृपेने आली. त्‍याबद्दल श्री गुरुदेवांच्‍या चरणी कृतज्ञता !’

१३. सौ. धनश्री कर्वे

अ. ‘ब्रह्मोत्‍सवासाठी गोव्‍याला जातांना प्रवासाला आरंभ झाल्‍यावर काही वेळाने बसमध्‍ये तांत्रिक बिघाड झाला. त्‍या वेळी ‘गाडी दुरुस्‍त होण्‍यासाठी किमान २ घंटे तरी थांबावे लागणार’, असे चालकाने सांगितले. ही अडचण पू. (सौ.) मनीषाताईंना सांगितल्‍यावर त्‍यांनी ‘जय गुरुदेव, जय गुरुदेव ।’ असा नामजप करायला सांगितले. नामजप करायला आरंभ केल्‍यानंतर २ घंट्यांऐवजी गाडीचे काम ३० मिनिटांतच पूर्ण झाले. त्‍यानंतरचा आमचा पुढचा संपूर्ण प्रवास निर्विघ्‍नपणे झाला.

आ. ओरोस (सिंधुदुर्ग) येथे सौ. जयश्री परांजपे यांच्‍या घरी ५० साधकांसाठी अंघोळ आणि अल्‍पाहार यांची व्‍यवस्‍था केली होती. तेव्‍हा अवघ्‍या दीड घंट्यातच सर्व साधकांचे आवरून झाले.

इ. सौ. पराजंपे यांना ‘आपत्‍काळाच्‍या दृष्‍टीने हे घर बांधले आणि आता सर्व साधकांची इथे व्‍यवस्‍था झाली’, या विचाराने पुष्‍कळ आनंद होत होता. ‘जणूकाही गुरुदेवच साधकांच्‍या माध्‍यमातून घरी आले आहेत’, असे त्‍यांना वाटत होते. त्‍यांनाही ब्रह्मोत्‍सवासाठी गोव्‍याला जायचे होते; पण तरीही सर्वांचे करतांना त्‍यांची कुठेही घाई गडबड झाल्‍याचे दिसले नाही.

ई. गोवा राज्‍याच्‍या सीमेवर आमच्‍या बसला ५ मिनिटांतच सीमा पार करण्‍याची अनुमती मिळाली. ‘गुरुदेवच आपल्‍याला घेऊन जात आहेत’, असेच मला अनुभवायला येत होते. ब्रह्मोत्‍सवाला जातांना प्रत्‍येक क्षण केवळ अनुभूतींचाच होता. यासाठी गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

१४. श्री. सुमित खामणकर 

अ. ‘संपूर्ण प्रवासात देवच माझ्‍या समवेत आहे’, हे मला जाणवत होते. ब्रह्मोत्‍सवाच्‍या काळात मी आजारी असतांनाही सोहळ्‍याला जाण्‍यासाठी गुरुदेवांनीच मला शक्‍ती दिली.

आ. कार्यक्रमाच्‍या स्‍थळाकडे जातांना कमानीतून प्रवेश करतांना ‘मी साक्षात् ब्रह्मलोकाच्‍या कमानीतून प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले.

इ. ब्रह्मोत्‍सवाच्‍या ठिकाणी पुष्‍कळ उष्‍णता जाणवत होती; परंतु गुरुदेवांचे आगमन होताच तिथे गार वारा मोठ्या प्रमाणात येत होता.

सर्व सूत्रांसाठी दिनांक : १३.३.२०२४            (क्रमश:) 

याच्या नंतरचा लेख (भाग ५) वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/861077.html

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक