रात्री उशिरापर्यंत दुमदुमला हरिनामाचा गजर !
पिंपरी (जिल्हा पुणे) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२९ व्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या अंतर्गत आळंदी कार्तिकी वारीची सांगता ‘श्रीं’च्या पालखी, छबिना मिरवणुकीने हरिनाम गजरात रात्री उशिरा झाली. देवस्थानाच्या वतीने मानकर्यांना नारळ प्रसाद वाटप आणि आळंदी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद, दूध प्रसाद वाटप उत्साहात करण्यात आले.
या प्रसंगी ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’चे प्रमुख विश्वस्त अधिवक्ता राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाबसाहेब, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळ्याचे मालक ऋषिकेश आरफळकर, श्रींचे सेवक पुजारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक, मानकरी, वारकरी, भाविक, तसेच आळंदीकर ग्रामस्थ आणि सहस्रो भाविक उपस्थित होते.
हरिनाम गजरात पालखीची नगरप्रदक्षिणा !
सांगता दिनी ‘श्रीं’च्या पहाटेच्या पूजेत पवमान अभिषेक आणि दुधारतीनंतर भाविकांना महापूजा आणि दर्शन यांसाठी ‘श्रीं’चा गाभारा खुला करण्यात आला. दुपारी परंपरेने नैवेद्यास ‘श्रीं’चे दर्शन बंद ठेवण्यात आले. महानैवेद्यानंतर भाविकांना संजीवन समाधी दर्शनास गाभारा खुला झाला. परंपरेने माऊलींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. मानकरी, फडकरी यांना नारळ प्रसाद आणि समाधी दर्शन होऊन यात्रेची सांगता झाली.
दर्शनरांगेत भाविकांना विनामूल्य प्रसाद सेवा !
माऊली देवस्थानच्या वतीने कार्तिकी यात्राकाळात दर्शनबारीच्या रांगेतील भाविकांना विनामूल्य खिचडी प्रसाद वाटप सेवा देण्यात आली. पिण्याचे शुद्ध पाणी वाटप सेवा करण्यात आली. मंदिरात दहीहंडी काल्याची कीर्तन सेवा उत्साहात झाली. ‘श्रीं’ची ‘छबिना ग्राम प्रदक्षिणा मिरवणूक’ हरिनाम गजरात सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत रात्री दीड घंटा उशिरा झाली.