Trump Warns BRICS Countries : ‘ब्रिक्‍स’ देशांनी नवीन चलन आणल्‍यास त्‍यांना अमेरिकी बाजारपेठेत उत्‍पादने विक्री करण्‍यास बंदी घालू ! – डॉनल्‍ड ट्रम्‍प

डॉनल्‍ड ट्रम्‍प यांची चेतावणी

(ब्रिक्‍स म्‍हणजे भारतासहित ९ देशांची संघटना)

डॉनल्‍ड ट्रम्‍प

वॉशिंग्‍टन (अमेरिका) – भारतासह ब्राझिल, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्‍त, इथिओपिया, इराण आणि संयुक्‍त अरब अमिराती या देशांचा सहभाग असणार्‍या ब्रिक्‍स देशांकडून नवीन चलन आणण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. हे चलन अमेरिकेच्‍या डॉलरला दुर्बल करण्‍याच्‍या उद्देशाने आणण्‍यात येण्‍याच्‍या प्रस्‍तावावरून अमेरिकेचे नवनर्वाचित राष्‍ट्राध्‍यक्ष डॉनल्‍ड ट्रम्‍प यांनी चेतावणी दिली आहे. ट्रम्‍प यांनी पोस्‍ट करत म्‍हटले आहे की, ‘ब्रिक्‍स’ देश डॉलरपासून दूर जाण्‍याचा प्रयत्न करत आहेत. आम्‍हाला या देशांकडून वचन हवे आहे की, ते नवीन ‘ब्रिक्‍स’ चलन निर्माण करणार नाहीत किंवा शक्‍तीशाली अमेरिकी डॉलरच्‍या जागी इतर कोणत्‍याही चलनाला समर्थन देणार नाहीत, अन्‍यथा त्‍यांना १०० टक्‍के आयात शुल्‍काला सामोरे जावे लागेल किंवा त्‍यांना अमेरिकी बाजारपेठेत उत्‍पादनांची विक्री करणे विसरून जावे लागेल.

१. अमेरिकी डॉलर जागतिक व्‍यापारात आतापर्यंत सर्वाधिक वापरले जाणारे चलन आहे. विकसनशील देशांचे म्‍हणणे आहे की, ते जागतिक आर्थिक व्‍यवस्‍थेतील अमेरिकेच्‍या वर्चस्‍वाला कंटाळले आहेत. अमेरिकी डॉलर आणि युरोपचे ‘युरो’ या चलनांवरील जागतिक अवलंबित्‍व अल्‍प करून ब्रिक्‍स देशांना त्‍यांचे आर्थिक हित अधिक चांगल्‍या पद्धतीने पुढे चालवायचे आहे.

२. गेल्‍या वर्षी पार पडलेल्‍या ‘ब्रिक्‍स’ परिषदेत सदस्‍य देशानी स्‍वत:चे चलन चालू करण्‍याविषयीच्‍या चर्चेसह या परिषदेतील देशांसाठी परस्‍पर व्‍यापार आणि गुंतवणूक यांसाठी एक समान चलन निर्माण करण्‍याचा प्रस्‍ताव दिला होता.

‘ब्रिक्‍स’ चलनासाठी कोणतीही योजना नाही ! – डॉ. जयशंकर यांचे स्‍पष्‍टीकरण

ब्रिक्‍स चलनाविषयी भारताची कोणतीही योजना नाही, असे स्‍पष्‍टीकरण भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी दिले आहे.

संपादकीय भूमिका

जो देश किंवा जागतिक संघटना अमेरिकेला तिची स्‍पर्धक वाटते, त्‍यांना संपवण्‍यासाठी किंवा त्‍यांची गळचेपी करण्‍यासाठी अमेरिका विविध कृती करते. ट्रम्‍प यांनी दिलेल्‍या चेतवणीवरून हे दिसून येते. असा देश भारताचा कधीतरी भारताचा मित्र होऊ शकतो का ?