थोडक्यात महत्त्वाचे

बिबट्यापासून वाचण्यासाठी सौरकुंपण !

कल्याण – ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात बिबट्याचा वावर वाढत आहे. त्यामुळे संवेदनशील एकांतात असलेले शेतशिवार आणि माळरान येथील घरांभोवती सौरकुंपण लावण्याचा पथदर्शी प्रकल्पाचा प्रस्ताव शहापूर वनविभागाने सिद्ध केला आहे. शासनाकडून आवश्यक पूर्तता झाल्यावर प्रकल्पाची कार्यवाही केली जाईल. कुंपणाच्या आत सौरपट्ट्या बसवल्या जातील. त्यातून वीजनिर्मिती होईल. बिबट्याचा स्पर्श सौरकुंपणाला झाला की, वन्यजीव किंवा बिबट्याला विजेचा धक्का बसेल आणि सौर यंत्रणेवरील भोंगा वाजेल. बिबट्या पळून जाईल आणि भोंग्यामुळे शेतकरी जागा होईल.


पनवेल येथे प्रदूषण वाढले !

पनवेल – येथे धूलिकण आणि वाढते प्रदूषण यांमुळे ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पालिकेच्या दवाखान्यातून विनामूल्य उपचार केले जात आहेत; पण खासगी दवाखान्यांतही रुग्णसंख्या अधिक आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पालिकेने सर्व दवाखाने आता पूर्णवेळ म्हणजेच सकाळी १० ते रात्री १० पर्यंत चालू ठेवले आहेत.


फडके (डोंबिवली) रस्त्यावर वाहनकोंडी !

डोंबिवली – येथील फडके रस्त्यावर प्रतिदिन संध्याकाळी रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, चारचाकी वाहने उभी असतात. अनेक वाहनचालक तेथे वाहने उभी करून खरेदीसाठी जातात. त्यामुळे प्रतिदिन सायंकाळी येथे वाहनकोंडी होते.

संपादकीय भूमिका : यावर प्रशासन काय मार्ग काढणार आहे ?


दादर येथे फलाट क्रमांक पालटले !

मुंबई – दादर रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक पालटण्यात आले आहेत. दादर स्थानकातून मेल गाड्यांनाही थांबे देण्यात येतात. त्यामुळे अनेकदा प्रवाशांचा गोंधळ होतो. अशातच दोन्ही मार्गांवरही समान फलाट क्रमांक असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. तो टाळण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मध्य रेल्वेने दादर स्थानकावर रात्री १२ वाजल्यापासून लागू केला आहे.


लाचखोर पोलीस कर्मचारी अटकेत !

पारोळा – अपघाताच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी १५ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा फरार आहे. हिरालाल पाटील आणि प्रवीण पाटील अशी त्यांची नावे आहेत. ३० सहस्र रुपयांची लाच त्यांनी मागितली होती; पण तडजोडीअंती १५ सहस्र रुपये देण्याचे ठरले. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरील कारवाई केली.

संपादकीय भूमिका : अशा लाचखोरांना निलंबितच करायला हवे !