Active Terrorists In J&K : जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जवळपास ११९ जिहादी आतंकवादी !

यावर्षी ६१ आतंकवाद्यांना करण्यात आले ठार !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जवळपास ११९ जिहादी आतंकवादी आहेत. यातील ७९ आतंकवादी काश्मीर भागात आहेत, तर ४० आतंकवादी जम्मू भागात घुसले आहेत. ११९ आतंकवाद्यांपैकी बहुतांश पाकिस्तानी आतंकवादी आहेत. त्यांपैकी ९५ आतंकवादी पाकिस्तानचे आहेत. काश्मीरमध्ये ६१ पाकिस्तानी आतंकवादी आहेत, तर ३४ पाकिस्तानी आतंकवादी जम्मूमध्ये आहेत. यासह काश्मीरमध्ये १८ स्थानिक आतंकवादी आणि जम्मूमध्ये ६ स्थानिक आतंकवादी आहेत. यावर्षी आतापर्यंत येथे ६१ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.

पाकिस्तान गरीब आणि अशिक्षित मुलांचा वापर आतंकवादी कारवायांसाठी करत आहे. पाकिस्तानी अधिकारी आणि गुप्तचर संघटना बेरोजगार अन् निरक्षर मुलांना भारतात घुसवून त्यांना आतंकवादी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. अ‍ॅप्स आणि सामाजिक माध्यमे यांच्या माध्यमांतून मुलांना आतंकवादी बनण्यास प्रवृत्त केले जात आहे. पाक मुलांना अल्प खर्चात आतंकवादी बनण्याचे प्रशिक्षण देऊन भारतात घुसखोरी करत आहे. अशा निरक्षर मुलांना मासिक १० ते १५ सहस्र रुपये मानधन दिले जात आहे.

संपादकीय भूमिका

भारतीय सुरक्षादलांनी या सर्वांना जरी ठार केले, तरी त्यांच्यामागून दुसरे आतंकवादी त्यांची जागा घेण्यासाठी आणि कारवाया करण्यासाठी सिद्ध असणार आहेत, हेच यातून सिद्ध होते. गेली ३५ वर्षे काश्मीरमध्ये हेच चालू आहे. ही साखळी तोडण्यासाठी आणि मुळावर घाव घालण्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता असणार्‍या पाकला नष्ट करणे हाच एकमेव उपाय आहे. भारत इस्रायलकडून आदर्श घेऊन असे धाडस कधी दाखवणार ?