उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आरोप
सिंधुदुर्गनगरी – महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मुलींप्रमाणेच मुलांनाही विनामूल्य शिक्षण दिले जाईल. जीवनावश्यक ५ वस्तूंचे भाव स्थिर ठेवू. गरिबांसाठी २५ लाख रुपयांची वैद्यकीय सेवा, महिलांसाठी स्वतंत्र महिला पोलीस ठाण्यांची निर्मिती, महिलांना प्रतिमहिना ३ सहस्र रुपये, अशा विविध योजना राबवू. हे सगळे देवाचे नाही, तर उद्योगपतींचे भक्त आहेत. सरकारमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांचे भक्त असून सहस्रो एकर भूमी धारावीच्या माध्यमातून सरकारने अदानी यांना दिली आहे. त्यामुळे त्यांच्यापासून महाराष्ट्राला आणि कोकणाला वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करा, असे आवाहन महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी येथे आयोजित जाहीर सभेत केले. या वेळी ठाकरे यांनी महायुतीच्या कारभारासह युतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांवरही टीका केली.
महाविकास आघाडीचे सावंतवाडी मतदारसंघातील उमेदवार राजन तेली, कुडाळ-मालवण मतदारसंघातील उमेदवार वैभव नाईक आणि कणकवली मतदारसंघातील उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सावंतवाडी, मालवण आणि कणकवली येथे जाहीर सभा झाल्या. या सभांमध्ये ठाकरे यांनी या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन केले.
सावंतवाडी येथील सभेत बोलतांना ठाकरे म्हणाले, ‘‘कोकण आपले आयुष्य आहे, ते गुंडांच्या हाती जाऊ देणार नाही. आपली मुले कुणाचे नोकर म्हणून जगता कामा नये. शिवाजी महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला ऊन, वारा, पाऊस, लाटा यांचा सामना करून देखील तसाच उभा आहे; मात्र राजकोट येथील महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सत्ताधारी म्हणतात तो वार्याने कोसळला !’’
या वेळी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
इन्सुली तपासणी नाक्यावर उद्धव ठाकरे यांचा ताफा सपासणीसाठी थांबवला !सावंतवाडी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचार्यांसह निवडणूक आयोगाने सुरक्षेच्या दृष्टीने सिद्धता केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमांवर जिल्ह्यात येणार्या वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. १३ ऑक्टोबर या दिवशी जिल्ह्यात आलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील पोलीस तपासणी नाक्यावर पोलिसांनी तपासणीसाठी थांबवला होता. या वेळी त्यांनी ठाकरे यांच्या वाहनाची पहाणी केली आणि अन्य वाहनांची तपासणी केली. यापूर्वी महाराष्ट्रात २ ठिकाणी ठाकरे यांच्याकडील बॅगांची तपासणी हेलिपॅडवरच करण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. यातील एका घटनेचा व्हिडिओ स्वत: ठाकरे यांनी बनवला असून तो सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. |