Bangladeshi Infiltrators In Ratnagiri : नाखरे (तालुका रत्नागिरी) येथे चिरेखाणीवर काम करणार्‍या १३ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

रत्नागिरीत आतंकवादविरोधी पथकाची कारवाई

रत्नागिरी – तालुक्यातील नाखरे गावातील चिरेखाणीवर अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या १३ बांगलादेशी घुसखोरांना आतंकवादविरोधी पथकाने १२ नोव्हेंबरला पहाटे अटक केली. हे १३ जण जून २०२४ पासून वैध कागदपत्रांविना, तसेच भारत-बांगलादेश सीमेवरील प्रांताधिकार्‍यांच्या लेखी अनुमतीविना भारतात अवैधरित्या प्रवेश करून पावस येथील आसिफ सावकार यांच्या नाखरे गावातील कालरकोंड वाडी चिरेखाणीजवळ रहात होते. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणी अधिक अन्वेषण पूर्णगड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे करत आहेत.

नाखरे चिरेखाणीवर प्रतिवर्षी मराठवाडा येथून किंवा कर्नाटक राज्यातून कामगार येत असत; मात्र यावर्षी वेगळ्या ठिकाणाहून कामगार आल्याने ग्रामस्थांना शंका आली. त्यानंतर ग्रामस्थांनी ही माहिती गावातील पोलीस पाटीलांमार्फत पोलिसांना दिली.

वहिद रियाज सरदार, रिजाउल हुसेन करीकर, शरिफूल हौजीआर सरदार, फारूख महंमद जहीर अली मुल्ला, हमिद मुस्तफा मुल्ला, राजू अहमद हजरतली शेख, बाकि बिल्लाह अमीर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मोबारक अली, आलमगिर हूसेन, महंमद शाहेन सरदार, महंमद नुरुझमान मोरोल, महंमद नुरहसन सरदार आणि महंमद लालूट मोंडल (सर्व  रहाणार ढाका, बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्या १३ बांगलादेशींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात आतंकवादविरोधी पथकाचे पोलीस नाईक रत्नकांत शिंदे यांनी तक्रार दिली.

संपादकीय भूमिका

  • जागोजागी बांगलादेशी घुसखोरांना शिस्तबद्धपणे वसवले जाणे, हे भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजित षड्यंत्रच होय !
  • बांगलादेशींची वाढती घुसखोरी रोखण्यासाठी अशा घुसखोरांसमवेत त्यांना आश्रय देणार्‍यांवरही पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे !