सांगली – बेदाणा निर्यातीवरील जाचक मूल्यवर्धित करासह अन्य सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्यासमवेत एक विशेष बैठक आयोजित केली जाईल, अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ सनदी लेखापाल आणि अधिकोषांचे अधिकारी यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे ‘जी.एस्.टी. कौन्सिल’चे सदस्य आहेत.
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘समृद्ध महाराष्ट्र आणि समृद्ध भारत यांसाठी श्री. सुधीर गाडगीळ यांना विजयी करणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हळद बोर्डाची सांगली शाखा चालू करणे, विमानतळ उभारणे आणि मोठे उद्योग येथे आणणे यांसंदर्भात केलेल्या घोषणा सांगलीच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. हळद बोर्ड आणि विमानतळ यांमुळे सांगलीतील हळद, बेदाणा, द्राक्षे, डाळिंबे आणि फळभाज्या यांची निर्यात शक्य होणार आहे.’’
आमदार श्री. सुधीर गाडगीळ म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत आज येथे झालेली ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. डॉ. सावंत ‘जी.एस्.टी. कौन्सिल’चे सदस्य असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवणे शक्य होणार आहे.’’ या प्रसंगी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पवार, सौ. नीता केळकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश ढंग यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.