पुणे – नवीन इमारतीमध्ये विद्युत् संयंत्र (इलेक्ट्रिक डीपी) उभारून विद्युत्पुरवठा चालू करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब सावंत (वय ५१ वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी ३९ वर्षीय ठेकेदाराने तक्रार प्रविष्ट केली. तक्रारदार शासन मान्यताप्राप्त विद्युत् ठेकेदार आहेत.
तक्रारदाराने इलेक्ट्रिक डीपी उभारून विद्युत्पुरवठा करून देण्यासंदर्भातील कामाची धारिका संमतीसाठी बंडगार्डन विभागातील कार्यकारी अभियंता भाऊसाहेब सावंत यांच्याकडे दिली होती; मात्र सावंत यांनी या धारिकेवर कार्यवाही करण्यासाठी आणि मांजरी येथील नवीन इमारतीसाठी उभारलेल्या डीपीवर वीज भार संमत करण्याचा मोबदला म्हणून ५ लाख रुपयांची लाच मागितली; मात्र तडजोडीअंती २ लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात दिलेल्या तक्रारी अन्वये सापळा रचून सावंत यांना कह्यात घेतले. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण पोलीस निरीक्षक विरनाथ माने करत आहेत. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
संपादकीय भूमिका :भ्रष्टाचाराने पोखरलेली ही व्यवस्था सुरळीत होण्यासाठी अशाच कारवाईची आवश्यकता आहे. |